उठला दुरावा दोन टोकाच्या मनांचा...

उठला दुरावा दोन टोकाच्या मनांचा
पाऊसही पडला हिशेबी आसवांचा

बोलाविताना हातचा राखून होती
तो बांध फुटला भेटल्यावर काळज्यांचा

होतीस तू इतकी जवळ? कळलेच नाही...
मी घेतला आस्वाद माझ्या भाकऱ्यांचा

उपहास, चेष्टा, वल्गना मी जोजवीतो
आहे तुझा, आहे तसा मी वेदनांचा

चमकून जाते वीज कडकड सांजवेळी
धिक्कार होतो आजही प्रेमी जनांचा

धरणे नको बांधू प्रवाही भावनांवर
सुटलाय केंव्हा प्रश्नही निष्कासितांचा

गोडी कशी देऊ मनाच्या वावरातुन
जळलाय सारा ऊस माझ्या भावनांचा

नाते कसे जुळते पहा विराहातसुद्धा
प्रत्येक अश्रू होत होता पापण्यांचा

नाती नव्याने रंगवा, सजवा कितीही ..
राहून जातो माग ढलपे पोपड्यांचा

शत्रूस केले ठार, पण जखमा चिघळल्या
सोसू न शकलो वार साधा आतल्यांचा

तुटल्यावरी कोठे पुन्हा जुळतात नाती ?
नसतेच जीवन खेळ पत्ते-बंगल्यांचा

न्यायालयी फिर्याद केली फसविल्याची
झालो सखा मी हेलपाटे घातल्यांचा

बोलू नका, रागे भरा की वाद घाला...
तोडू नका विश्वास अपुल्या माणसांचा

स्वातंत्र्य जे होते हवे मागू न शकलो
वर्षाव जो झाला गुलाबी बंधनांचा

ठेवीत नाही नोंद आता भेटल्याची
भोगीत आहे त्रास पूर्वीच्या खुणांचा

वाहूनही अस्तित्व नसणे चूक नाही
सागर किनारी थांग असतो का नद्यांचा ..?

मैत्री नि प्रेमाची कशी तूला करू मी ?
श्रुंगार जो केलास दोन्ही पारड्यांचा

चुकणार निश्चित मार्ग अन बुडणार नौका
राखू न शकली मान जर ठरल्या दिशांचा

माणूस आहे एवढे आहे पुरेसे
भक्तीत यावा प्रश्न का संबंधितांचा ?

दुथडी भरे जो आमची पिकवून सोने
जमवीत आहे मेळ पुढच्या तारखांचा

बांधून मंडप काय मोठे साध्य होते..?
हृदयांत गाभारा असे ज्या देवतांचा...

माणूस जगतो की कुणी जगवीत असते...
की खेळ आहे फक्त हलत्या बाहुल्यांचा ..?

होतास प्रामाणिक तसा अजुनी रहा तू..
होतो अजय, केंव्हा विजय खोटारड्यांचा

-------------------------------------------------

मद्यालये भरली रिकाम्या माणसांनी
काबाडकष्टी राहिला मालक भुकांचा

हृदयांत मी आहे तुझ्या, चिंता कशाला..?
का उठविला तू प्रश्न नसत्या स्मारकांचा ?

स्वातंत्र्य, समता काय असते हे समजले..
पाहून अश्रू जाळलेल्या पुस्तकांचा ...

बघ, उंच गझलांची सुरू झाली कहाणी
संयम किती तगडा असे या वाचकांचा