फिनिक्सच्या राखेतून उठला मोर


"काय डेंजर वारा सुटलाय...!" ह्या नाटकामुळे सर्वतोमुखी नाव झालेले लेखक
जयंत पवार यांची "महाराष्ट्र टाईम्स" च्या २००२ दिवाळी अंकातील
"टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन" ही कथा वाचली तेव्हा किती विलक्षण ताकदीच्या
लेखकाची ही चित्रमय कथा आपण वाचत आहोत या विचाराने मी खूप आनंदित झालो
होतो. पुढे याच कथेवर याच नावाने रंगमंचावर नाटकही आले, पण ती नाटकरूपी
ट्रेन कोल्हापूरापर्यंत पोचू न शकल्याने मग जयंत पवारांचा लिखित
माध्यमाद्वारेच पाठलाग करण्याचे मनोमनी ठरविले.

२००४ ची परत म.टा. दिवाळी अंकातीलच 'साशे भात्तर रुपयांचा सवाल" आणि
ऋतुरंग दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली "जन्म एक व्याधी' या कथांनी पवारांना
आजच्या पिढीतील कथाकारांच्या साहित्यिकांच्या पंगतीत अगदी बोकिलांसमवेत
बसविले. तितक्या प्रतिभेचे ते निश्चितच आहेत हे त्यांचे नाटक आणि कथाविश्व
जरूर सिद्ध करतात.

व्यंकटेश माडगुळकरांनी 'माणदेशी माणसं' आपल्या प्रतिभेने चितारली. त्या
चित्रांनी सार्‍या मराठी साहित्यविश्वाला एक अनोखी भेट देवून ग्रामीण
कथासाहित्य म्हणजे फक्त चंद्रकांत सूर्यकांत जयश्री गडकर लीला गांधी दादा
साळवी यांच्यातील घराणेशाही, पाटीलकी, पैलवानकी, तमाशाबाजी एवढ्यापुरतीच
मर्यादित नसून ग्रामीण भागातील जीवनाचा अस्सलपणा म्हणजे नेमकी काय बाब आहे
याचे प्रत्ययकारी चित्रण त्या व्यक्तिरेखांतून समोर आणल्याचे आपण पाहिले.
जयंत पवार हा लेखक माडगुळकरांच्याच पोतडीतेल 'महानगरी संस्कृती'चा
प्रतिनिधी मानला जाईल. सतीश काळसेकर यांच्याशी असलेली त्यांची मैत्री आणि
लोकवाङ्मय गृह यांच्या चळवळीशी नेहमी निगडीत राहिलेल्या जयंत पवारांना
त्यामुळे मुंबई एक महानगर म्हणून कशी दिसते, त्यातही विशेषत: कामगार वस्ती,
चाळसंस्कृती, त्याचबरोबर तिथे मिळेल त्या असेल त्या परिस्थितीत रहाणाऱ्या
माणसांच्या धडपडीतील जगण्याचा वेध समर्थपणे कसा घेतला जाईल याची आस लागली
आणि ती त्यानी नेमकेपणाने आपल्या कथाभांडारात घेतल्या आहेत.

या जीवनावर बेतलेल्या एकूण सात कथांवर लोकवाङ्मय गृहाने "फिनिक्सच्या
राखेतून उठला मोर" या शीर्षकाचा कथासंग्रह प्रसिद्ध केला आणि आनंदाची बातमी
म्हणजे आज याच कथासंग्रहाला यंदाचा 'साहित्य अकादमी' चा पुरस्कार लाभला
आहे. त्याबद्दल लेखक जयंत पवार यांचे आणि लोकवाङ्मय गृहाचे हार्दिक अभिनंदन
आपण सार्‍यांनी करणे अगत्याचे ठरेल.

वर उल्लेख केलेल्या चार कथांशिवाय "चंदूच्या लग्नाची गोष्ट", "एका
लढ्याचा गाळीव इतिहास", आणि "छटाकभर रात्र तुकडा तुकडा चंद्र". पवारांच्या
कथांची शीर्षके पाहून श्याम मनोहर यांची जरूर आठवण होते, पण पवारांचे लेखन
हे काही औपराधिक नसून सत्यस्थितीचे जे चित्रण ते समोर आणतात त्याचा
अस्सलपणा मजकुरात जाणवत जातो. फिनिक्स नावाची मुंबईतील एक गिरणी आणि ती बंद
पडल्यावर झालेल्या उलथापालथी..."टेंगशे ट्रेन'चे कथानक नावाप्रमाणे एका
टेंगशेभोवती केन्द्रीभूत असले तरी ती कथा व्यथा सार्‍या प्रवाशांची होते.
यातही आजच्या घटनेतील भाष्य आणि नित्यनेमाच्या बाबीकडे पाहण्याची मानसिकता
फार सुरेखपणे चितारली गेली आहे. 'गाळीव इतिहास....आणि साशे भात्तर रुपयांचा
सवाल..." या कथा चाळीतील विविध वर्गांची संस्कृती खुलवितात. सर्वच कथांचा
इथे मुद्दाम आढावा घेत नाही, तो एवढ्यासाठी की त्या त्या कथांतील वाचन
उत्कंठता कायम राखणे मला गरजेचे वाटते.

पु.लं.च्या 'बटाट्याची चाळ" आणि पेंडशांच्या "संभूसाच्या चाळीत"; तसेच
सई परांजपे यांच्या 'कथा' चित्रपटात रंगविल्या गेलेल्या चाळी आपल्या
परिचयाच्या आहेतच. पण जेव्हा जयंत पवार 'चाळ जीवन' आपल्या कथातून रंगवितात
त्यावेळी ते केवळ उच्चवर्ग आणि कनिष्ठ वर्गातला वर्गसंघर्ष इतपत मर्यादित
चित्र रंगवित नसून त्यामागील मानसिकता प्रकर्षाने ते शब्दबद्ध करतात.

चाळ, कामगार वस्ती हे विषय आले म्हणजे दत्ता सामंतांचा तो प्रसिद्ध
'गिरणी कामगार संप' आलाच, त्याच संपाची पार्श्वभूमी असलेली कथा म्हणजे
'फिनिक्सच्या राखेतून उठलेला मोर'. ही कथा मूळातून वाचने नितांत गरजेचे
आहे, वाचल्यावरच कळेल की जयंत पवारांनी ह्याच कथेचे शीर्षक आपल्या
पहिल्यावहिल्या कथासंग्रहाला का दिले असावे.

आज जाहीर झालेल्या साहित्य अकादमीच्या पुरस्कारामध्ये संख्येच्या बाबतीत
'काव्यसंग्रहां'नी बाजी मारलेली दिसून येते. अशावेळी एरव्हीही अत्यंत
समृद्ध असलेल्या मराठी कथाविश्वातील एका प्रयोगशील कथाकाराच्या पहिल्याच
कथासंग्रहाची साहित्य अकादमीच्या एक लाखाच्या पुरस्कारासाठी निवड होते ही
घटना मराठी भाषेसाठी निश्चित्तच अभिनंदनीय आहे.

श्री.जयंत पवार याना मराठी साहित्यातील त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.