शब्दब्रह्माचाच मी आहे पुजारी!
मी तुझ्या दारातला आहे भिकारी!!
जाहले पाहून जे पाहू नये ते.....
माझिया डोळ्यांसही आली शिसारी!
तो दुरावा, अन् तुझा त्यावर अबोला....
शस्त्र हे आहे तुझे अगदी दुधारी!
वाटतो, जातो तिथे, आनंद कोणी;
तर, कुणाची सावली सुद्धा विषारी!
का न व्हाव्या दंगली अन् जाळपोळी?
भाषणे असतात नेत्यांची विखारी!
केवढा गोंगाट! हे कळणार कोणा?.....
फुंकतो प्राणांतुनी कोणी तुतारी!
हात शिवशिवतात, हृदयी रक्त उसळे!
डाव खेळायास सळसळतो जुगारी!
दुर्विचारांनी न जावो जन्म वाया;
व्हायचा माणूस केव्हा सद्विचारी?
दुर्दशेला तूच तुझिया फक्त कारण;
कोण तारी वा कुणाला कोण मारी?
चार गाऱ्हाणी कुठे मांडून झाली!
जाहला त्याच्यातला जागा पुढारी!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१