तिन्हिसांजेला हृदयी माझ्या एक गझल तेजाळत असते!

तिन्हिसांजेला हृदयी माझ्या एक गझल तेजाळत असते!
कातर वेळी मनही माझे आठवणींना चाळत असते!!

स्वप्नामध्ये तरी तुझ्या मी, सांग कसे राजरोस येऊ?
तेथे सुद्धा वर्दळ असते! कैक फुलांची पाळत असते!

शेर पेश करताना देती दाद, कुणी करतात वाहवा.....
पण लिहिताना लिहिणाऱ्याला एक वेदना जाळत असते!

तिच्या लाघवी लावण्याचा पौर्णिमेसही वाटे हेवा!
अलीकडे ती कुंतलामधे रोज चांदणे माळत असते!!

प्रेमविवाहांमधे कुठेही प्रेमच आता उरले नाही;
हल्लीची ही पिढीच सगळी पैशांवरती भाळत आहे!

तशी गाठ दररोजच पडते, व्यक्ती हसते, ओळख देते!
मनापासुनी कोण भेटते? कुणी कुणाला टाळत असते!!

सुनी सुनी होतातच घरटी, जशी पाखरे उडून जाती.....
उरते मागे फक्त आठवण, तीच घरी रेंगाळत असते!

भिजत घोंगडे पडले माझे, झाली त्याला बरीच वर्षे....
श्वासांच्या दोरीवर माझ्या अहोरात्र ते वाळत असते!

प्राण किती चुपचाप सोडला, तेव्हा झाली जागी दुनिया....
अता ऐकतो की, दुनिया ती मलाच नित कवटाळत असते!

हयातभर मायेची पाखर मायबाप घालती मुलांवर!
वृद्धत्वाला ज्यांच्या आता वृद्धाश्रम सांभाळत असते!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१