मंत्री आणि उमरावसाहेबांचे भूत-प्रथमाध्याय

मंत्री सुहासराव देशमुखांनी जेव्हा ती जुनी हवेली विकत घेतली तेव्हा जवळजवळ सर्वांनी त्यांना मूर्खात काढले. ती जागा झपाटलेली आहे हे सर्वज्ञात होते. खुद्द हवेलीचा मालक आणि उमराव घराण्याचा शेवटचा वारस पण त्यांना याबाबतीत धोक्याचा इशारा देऊन गेला होता. 
'वारसाहक्क असूनही या हवेलीत आम्ही कधीच राहिलेलो नाहिये. अनेक वर्षांपूर्वी माझी चुलत आजी म्हणजेच विलासपूर संस्थानाच्या सरदाराची पत्नी इथे मुक्कामाला होती. ती कपडे बदलत असताना तिच्या खांद्यावर एका सापळ्याने मागून हात ठेवले. किंचाळून ती बेशुद्ध पडली. या धक्क्यातून ती कधीच सावरली नाही. आमच्या परिवारातल्या बऱ्याच लोकांनी उमरावसाहेबांचं भूत प्रत्यक्ष पाहिलंय. त्या प्रसंगानंतर हवेलीत रहायला नोकरचाकर पण तयार नव्हते.' शेवटचे उमरावसाहेब सांगत होते.


'माफ करा उमरावसाहेब, पण आपण सर्व एकविसाव्या शतकात वावरणारे सुशिक्षित लोक आहोत. माझा या गोष्टींवर काडीचाही विश्वास नाही.' मंत्रीसाहेब म्हणाले.


'तुमच्यासारखे  तथाकथित सुधारक लोक भूताचं अस्तित्व मानायला तयार नसले तरी भूत किंवा अमानवी शक्ती जगात अस्तित्वात आहेत यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि उमरावसाहेबांचं भूत जवळजवळ तीन शतकं त्या हवेलीत आहे. मरणापूर्वी ते कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला दिसतंच.' शेवटचे उमरावसाहेब जरा परखडपणेच म्हणाले.


'भूत नावाची गोष्ट जगात नाही. आणि हा निसर्गाचा नियम आहे. तो तुमच्या गावापुरता आणि हवेलीपुरता बदलणारा नाही.' मंत्रीसाहेब त्यांचे प्रसिद्ध मंत्रीछाप हास्य करत म्हणाले.


'मंत्रीसाहेब हे लक्षात ठेवा कि ही मुंबई नाही. तुम्हाला ज्या गोष्टी माहिती नाहीत त्या जगात अस्तित्वातच नाहीत असं समजू नका. ठिक आहे, तुम्हाला भूताबरोबर राहणं मंजूर असेल तर अवश्य त्या हवेलीत रहा, पण नंतर म्हणू नका कि मी सांगितलं नाही.' शेवटचे उमरावसाहेब निर्वाणीच्या स्वरात म्हणाले.


अशाप्रकारे काही दिवसांनी मंत्रीसाहेब आपल्या कुटुंबासह हवेलीत दाखल झाले. मंत्रीसाहेबांच्या पत्नी सौ वत्सलाबाई देशमुख या मध्यमवयाकडे झुकणाऱ्या आणि चेहऱ्यावर अजूनही तारुण्यातल्या सौंदर्याच्या खुणा बाळगून होत्या. वत्सलाबाईंचा उत्साह या वयातही सळसळता होता. थोरला मुलगा जितेश एक देखणा तरुण होता. नृत्यात प्रवीण होताच आणि आता तो रुपेरी पडद्यावर जाण्याच्या दृष्टीने हालचाली करत होता. मुलगी अमिता हुशार आणि चित्रकलेत चांगली होती. सर्वात धाकटी जुळी मुलं होती मितेश आणि रितेश,त्यांना त्यांच्या खोडकर स्वभावामुळे सर्व राहू केतू म्हणायचे.


सकाळच्या प्रसन्न वातावरणात ते सर्व हवेलीपाशी पोहचले. त्यांचं स्वागत करायला हवेलीची जुनी नोकराणी चंदा होती. चंदाने त्या सर्वाना अदबीने आत नेले. दिवाणखान्यात चहा तयार होता. वत्सलाबाई फिरुन खोली पाहत होत्या. अचानक त्या थबकल्या. 'चंदा, बघ इथे कसलातरी लालसर डाग पडला आहे.' 
'हो इथे रक्त सांडलं होतं.'- चंदा
'भयंकर. पण मला माझ्या नव्या घरात रक्ताचा डाग नकोय आणि तो आताच्या आता गेला पाहिजे.' -वत्सलाबाई.
'हा डाग असा जात नाही. १५७५ मधे याच जागी उमरावसाहेबांनी त्यांच्या पत्नीचा खून केला. हा रक्ताचा डाग तेव्हापासून आहे आणि तो जात नाही. हा डाग पहायला जवळच्या गावातली लोकं पण येतात.'


जितेश पुढे आला. 'हॅ, काहीतरीच. असा कसा जात नाही?आता लायझॉलने जरा पुसला कि जाईल.'
'नाही, हा डाग पुसायचा प्रयत्न केला तर अनर्थ होईल.' चंदा म्हणाली आणि घाबरुन त्याच्याकडे पाहतच राहिली. जितेशने तितक्यात सामानातून उचकून लायझॉलची बाटली बाहेर काढली आणि तो ते त्या डागावर टाकून जोरजोरात घासत होता. काही मिनीटात डाग नाहिसा झाला.
'बघ, मी म्हटलं होतं ना, लायझॉलने डाग जाणारच.' जितेश म्हणाला. तितक्यात जोरात वीज कडाडली. चंदा घाबरुन बेशुद्ध पडली.


'आता हिचं काय करायचं गं आई?' जमिनीवर पडलेल्या चंदाकडे पाहत जितेश म्हणाला.
'हिचं काय? पगारातून बेशुद्ध पडलेल्या वेळेचे पैसे कापायचे. परत बेशुद्ध पडणार नाही.' वत्सलाबाई म्हणाल्या. आणि चंदा पटकन शुद्धीवर आली. चंदाने पुष्कळ संगायचा प्रयत्न केला कि इथे भूत आहे, पण जितेश आणि वत्सलाबाईंनी तिला समजावून झोपायला पाठवले आणि दोघे आराम करायला आपापल्या खोल्यांकडे गेले. दिवस सुरळीतपणे पार पडला.


रात्रभर विजा कडाडत होत्या. सकाळी ते सर्व उठले आणि पाहतात तर रक्ताचा डाग परत त्याच जागी होता. खुद्द मंत्रीमहाशयांनी रात्री नीट कडीकुलपं लावली होती. देशमुख कुटुंबाची भूताच्या अस्तित्व नसण्याबद्दलची ठाम मते डळमळत होती...   


त्या रात्री मंत्रीसाहेबाना एका विचित्र आवाजाने जाग आली. त्यांनी उशाशी ठेवलेली चाळिशी लावली आणि ते जिन्यावर आले. आणि ...


त्यांच्यासमोर उमरावसाहेबांचे भूत उभे होते. त्याचे डोळे लाल निखाऱ्यांसारखे चमकत होते. कपडे राजेशाही पण जुने होते. आणि त्याच्या हातात जुनाट गंज लागलेल्या जड साखळ्या होत्या, त्या करकरत होत्या.


मंत्रीसाहेब म्हणाले, 'हे बघा, तुम्ही जे कोणी असाल ते, माझ्या घरात मी तुम्हाला असा अपरात्री फिरुन आमची झोपमोड करु देणार नाही. आणि तुम्हाला फिरायची इतकी हौसच असेल तर हे कॅस्ट्ऱॉल इंजिन ऑइल साखळ्याना लावा म्हणजे त्या असा आवाज करणार नाहीत.' आणि मंत्रीसाहेब शांतपणे ती कॅस्ट्ऱॉल इंजिन ऑइलची बाटली जमिनीवर ठेऊन परत झोपायला निघून गेले.


भूत काही क्षण संतापाने थरथरत उभं राहिलं आणि ती बाटली लाथाडून जिन्यावरुन उतरु लागलं. त्याच्या अंगातून हिरवा प्रकाश येत होता. भूत जिन्याच्या शेवटच्या पायरीपर्यंत आलं आणि तितक्यात......


जिन्यावर राहू केतू अवतरले आणि त्यांनी मोठी उशी भूतावर नेम धरुन फेकून मारली!! उमरावसाहेबांचं भूत बावचळलं आणि आपली अदृश्य व्हायची कला आठवत अदृश्य झालं. घर परत शांत झालं आणि राहू केतू झोपायला निघून गेले..


आपल्या गुप्त खोलीत येऊन भूताने सुटकेचा निश्वास सोडला आणि ते ताळ्यावर येऊ लागलं. भूताच्या ३०० वर्षांच्या उजळ कारकिर्दीत पहिल्यांदाच त्याला असा नामुश्कीचा प्रसंग आणि अपमान सहन करावा लागला होता. भूताच्या डोळ्यासमोरुन त्याचे ३०० वर्षातले कर्तृत्व सरकून गेले..


कधीकाळी विलासपूरची सरदारपत्नी भूताला पाहून किंचाळून बेशुद्ध पडली होती.. कधीकाळी एका आचाऱ्याने आत्महत्या केली होती स्वयंपाकघराच्या खिडकीवर टकटक करणारा हिरवा हात बघून.. कधीकाळी घरी आलेली एक श्रीमंत पाहुणी रात्री खुर्चीत एका सांगाड्याला बसलेलं पाहून सहा महिने अंथरुणाला खिळून होती.. घरातली प्रत्येक मोलकरिण पडद्यामागे भूताला पाहून नोकरी सोडून पळून गेली होती..भूताला हे सर्व सन्मान आठवले. 'घाबरवणं हीदेखील एक कला आहे' यावर भूताचा विश्वास होता आणि या कलेची जोपासना भूताने मेहनतीने आणि चिकाटीने ३०० वर्षे करुन या कलेत प्राविण्य मिळवलं होतं.. त्यासाठी निरनिराळ्या वेशभूषा अभ्यासपूर्वक केल्या होत्या..


आणि आज हे पाच दिडशहाणे मुंबईकर त्याच्या कर्तृत्वाला लायझॉलने धुवून त्याच्या अंगावर उशा फेकून मारत होते. भूत भयंकर संतापले. आजवरच्या इतिहासात कोणत्याच भूताला इतकी अपमानास्पद वागणूक नव्हती मिळाली. या अपमानाचा सूड घ्यायचाच हा निर्धार करुन भूत आराम करु लागलं.


सकाळी गप्पांत प्रमुख विषय हाच होता. कॅस्टऱॉल इंजिन ऑइलची देणगी भूताने अव्हेरल्यामुळे मंत्रीमहाशय चिडले होते. राहू केतू उशीचा प्रसंग रंगवून सांगत होते. मंत्रीमहाशय हसू दाबत म्हणाले, 'कितीही झालं तरी ते भूत ३०० वर्षं इथे राहतं आहे. त्याच्यावर उशा फेकून मारणं हे चांगले संस्कार नाहीत. अर्थात, त्याला जर कॅस्ट्रॉल ऑइलचा वापर करायचा नसेल तर आमचा नाईलाज आहे आणि आम्हाला त्याच्या गंजलेल्या साखळ्या हिसकावून घ्याव्या लागतील. किती आवाज येतो!!' आणि सर्वजण खो खो हसू लागले.


तो आठवडा तसा शांततेत गेला आणि काहीही विशेष प्रसंग घडला नाही. पण तो जमिनीवरचा डाग मात्र रोज पुसला तरी रोज परत अवतरत होता. आणि डागाचा बदलणारा रंग पण विचीत्रच होता. एक दिवस डाग विटकरी, एक दिवस पिवळा, एक दिवस नारिंगी, एक दिवस जांभळा. आणि शुक्रवारी तर चक्क पोपटी रंगाचा डाग होता!! डागाचा बदलता रंग देशमुख कुटुंबाचा चेष्टेचा विषय बनला होता. पण अमिता मात्र आता तो डाग पाहून अस्वथ होत होती..ज्या दिवशी डागाचा रंग हिरवा झाला त्यादिवशी ती खूपच अस्वस्थ आणि घाबरलेली दिसत होती.


रविवारी रात्री अचानक 'धडाड!!' आवाजाने सर्व जागे झाले. बघतात तर काय, जिन्याच्या कोपऱ्यात ठेवलेला लोखंडी पुतळा खाली पडला होता आणि पुतळ्याला ठेचकाळलेलं भूत कळवळून गुडघा दाबत खुर्चीवर बसलं होतं. ही संधी साधून राहू केतू त्यांच्या गलोली घेऊन आले आणि त्यांनी भूतावर खड्यांचा वर्षाव केला. तितक्यात मंत्रीमहोदय जुनं पिस्तुल घेऊन आले आणि भूतावर ते रोखत गरजले, 'हँडस् अप!!' भूत चिडून जाऊ लागलं. जाता जाता जितेशच्या हातातली मेणबत्ती विझवायला ते विसरलं नाही. 


जिन्यावर सुरक्षित जागी आल्यावर भूताने ठरवलं कि आज आपल्या सुप्रसिद्ध रौद्र हास्याचा पहिला प्रयोग करायचा यांना घाबरवायला. हे हास्य घाबरवण्याच्या परिक्षेत नेहमी हमखास यशस्वी ठरलं होतं. एका उमरावाचा काळा विग हे हास्य ऐकून पांढरा झाला होता. भूताने जास्तीत जास्त आवाज वाढवून एक भयानक रौद्र हास्य केलं.


इतक्यात खोलीचं दार उघडून वत्सलाबाई डोळे चोळत बाहेर आल्या आणि त्रासिक आवाजात म्हणाल्या, 'तुमची तब्येत खराब झालेली दिसतेय. पोटात वायू आहे आणि डोकं पण ठिकाणावर नाही.अपचन वगैरे झालं असेल तर हे इनो फ़्रुटसॉल्ट पाण्यातून घ्या आणि झोपा. असा रात्री अपरात्री दंगा करु नका. हे सभ्य माणसाचं घर आहे.' भूत परत अंगातून हिरवा प्रकाश सोडून आपली एखादी भितीदायक वेशभूषा घेणार तितक्यात जिन्यावर पावलांचे आवाज ऐकू आले आणि ते घाबरुन राहू केतूच्या हातात परत सापडण्याआधी अदृश्य झालं..


परत काही दिवस भूताने फरशीवरच्या डागाव्यतीरिक्त आपलं अस्तित्व दाखवलं नाही. पण भूत आता जबरदस्त आणि भक्कम योजना आखत होतं. मुख्य बदला त्याला जितेश आणि राहू केतूवर घ्यायचा होता. जितेशने त्या डागाचा लायझॉल फासून रोज अपमान केला होता. 'एकदा या मुलांना घाबरवलं कि आपलं काम आपोआप होईल.' भूताने विचार केला. राहू केतूंचे पलंग एकमेकांशेजारी थोडं अंतर ठेऊन होते. दोन पलंगाच्या मधोमध हिरव्या रंगाचं भयानक प्रेत बनून काही मिनीटं उभं राहिलं तरी घाबरवण्याचं काम फत्ते होणार होतं.त्या दोघांची दातखीळ बसणार होती... अमिताशी भूताचं जास्त शत्रुत्व नसल्याने तिला जास्त घाबरवायचं नाही असं भूताने ठरवलं. तिला काय, थोडेफार पडदे वगैरे हलवून आणि रात्री विकटहास्य करुन पण घाबरवता येईल. 


रात्री सर्वत्र निजानीज झाली. आणि भूत कामगिरीवर बाहेर निघालं. वादळी वारं होतं.. बाहेर घुबडाच्या घुत्कारण्याचा आवाज येत होता..  


(भाग २ वेळ मिळाल्यावर येत आहे. माझ्या आवडत्या आंग्ल कथेचा हा स्वैर अनुवाद आहे. मूळ कथेचा दुवा भाग दोन मधे देण्यात येईल. अर्थातच मूळ कथा वाचण्यात जी गंमत आहे ती अनुवादात नाही. तरी चालवून घ्यावे.)