मंत्री आणि उमरावसाहेबांचे भूत-द्वितीयाध्याय

भूत जिन्यापाशी आले आणि..


भूताच्या समोर एक भयंकर आकृती उभी होती. तिचा चेहरा पांढराफटक, अंग पांढरंफटक आणि चेहऱ्यावर भयंकर हास्य थिजलेलं होतं. डोळे लालभडक होते.  त्या आकृतीच्या छातीवर काही शब्द कोरलेले होते, पण भूताने ते वाचण्याचे वेडे धाडस केले नाही. 'भूत पाहणे' हा भितीदायक अनुभव भूताला नविन असल्याने ते किंचाळून तिथून पळून गेलं आणि धापा टाकत आपल्या खोलीत पोहचलं.


सारी रात्र भूताने जीव मुठीत धरुन आपल्या खोलीत काढली. पहाट होता होता भूताने धीर करुन परत त्या भूतापाशी जाण्याचा विचार केला. 'एक से दो भले' या नात्याने त्या भूताशी मैत्री करुन आपली शक्ती वाढवता येईल या विचारात भूत जिन्यापाशी पोहचलं आणि..


रात्री भूताने पाहिलेल्या त्या भूताची रया गेल्यासारखी वाटत होती. ते कोपऱ्यात मुरगळून पडलं होतं. भूताने धावत जाऊन त्या भूताला उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्या भूताचं डोकं घरंगळून फुटलं..गुंडाळलेला पांढरा पडदा पडला आणि स्वयंपाकघरातला उंच झाडू त्यातून प्रकट झाला. शेजारी कागद चुरगळून पडला होता. त्याच्यावर लिहीलं होतं '१००% आयएसआय मार्क ओरिजिनल भूत. नकलांपासून सावधान.'


भूताने रागाने किंकाळी फोडली. राहू केतूने झाडूला कापड गुंडाळून भूताला हातोहात मूर्ख बनवलं होतं. 'या खानदानाचा सत्यनाश करेन!!!' डोळे गरागरा फिरवत भूताने भूतांच्या गाईडमधे वर्णिलेली मुद्रा करुन प्रतिज्ञा केली. आणि ते त्याच्या शवपेटीत झोपायला गेलं, कारण सकाळ व्हायची भयप्रद चिन्हं दिसू लागली होती..


दुसऱ्या दिवशी भूताला खूप थकवा आला होता. एकंदरीतच मागच्या महिन्यातील घटना आणि मानसिक ताण यामुळे त्याची प्रकृती खालावलीच होती. पुढचे पाच दिवस भूताने लोळून काढले. त्याचे फरशीवरचा डाग बनवण्याचे काम पण त्याने आता सोडून दिले होते. 'रोज लायझॉलमधे फरशीला बुडवणारे हे क्षुद्र जीव तो डाग मिळवण्याच्या लायकीचेच नाहीत.' भूत पडल्या पडल्या विचार करत होते. पण असं पडून किती दिवस राहणार? किमान आठवड्यातून दोनदा घरात वावरुन लोकांना घाबरवणं हे भूताचं कर्तव्य होतं. पण ती खोडकर कार्टी नाही म्हटलं तरी त्याला घाबरवून जात होती.


पुढचे तीन आठवडे भूत कर्तव्यपूर्तीसाठी रात्री हवेलीत फिरले. पण त्याने पूर्ण सावधगिरी बाळगली होती.  चपला काढून त्या हातात घेउन ते चाले आणि साखळ्यांनाही त्याने कॅस्ट्रॉल इंजिन ऑइल लावून व्यवस्थित आवाजरहित केले होते. पण इतकं करुनही राहूकेतूंनी एक दिवस जिन्याच्या दोन्ही बाजूना दोरी ताणून बांधून ठेवली आणि भूताने पायऱ्यांवरुन गडगडत सपशेल लोटांगण घातले. खाली ठेवलेल्या अमूल बटरच्या लादीवरुन जोरात घसरुन लंगडत लंगडत भूत खोलीत पोहचले. सूडाच्या आगीने ते जळत होते. शेवटी भूताने अनेक बक्षिसं मिळवलेला आपला 'बिनशिऱ्या' हा पोशाख काढला.


रात्री सर्व झोपल्याची खात्री करुन भूताने आपली वेशभूषा केली. राहू केतूंच्या खोलीचे दार त्याने हलकेच उघडले आणि ..


दारावर ठेवलेला पाण्याचा भरलेला जग भूताच्या अंगावर उपडा झाला आणि ते नखशिखांत भिजले. समोरुन त्याला राहू केतूंचे पोट धरधरुन हास्य ऐकू आले.  आणि भूत मागल्या पावली पळाले.


भूताची प्रकृती फारच ढासळली होती. गळ्याला मफलर बांधून ते दिवसरात्र खोलीत पडून राहायचे.


त्या दिवशी अमिता घरी उशिरा आली आणि लपतछपत मागच्या जिन्याने घरात शिरली. भूताच्या खोलीवरुन जात असताना तिने पाहिले कि दार उघडे होते. आत पडलेले भूत फारच अशक्त आणि दयनीय दिसत होते. अधूनमधून ते सांधेदुखीमुळे कण्हत होते. अमिताला दया आली. ती खोलीत शिरली.


'तुमची अवस्था बघून मला वाईट वाटतं. पण घाबरु नका, उद्या माझे भाऊ बाहेर जाणार आहेत आणि पूर्ण दिवस तुम्हाला कोणाचीच भिती नाही. पण हेही खरं कि तुम्ही जर नीट वागला असतात तर कोणीच तुम्हाला त्रास दिला नसता.'
भूताचा आवाज चढला. 'मूर्ख मुली, 'मी नीट वागायचं'?? मी नीटच वागतो आहे.हे सर्व प्रकरण सुरु तुझ्या त्या लायझॉलवाल्या भावाने केलं. आणि ती दोन नतद्रष्ट कार्टी, त्यांना मोठ्या माणसाशी, सॉरी भूताशी कसं वागायचं ते संस्कारच नाहीत. मुंबईची आगाऊ बिघडलेली पोरं!!'


'कोण बिघडलं आहे ते तुम्हाला चांगलं माहिती आहे. तुम्ही तो भिकारडा फरशीवरचा डाग रंगवायला माझ्या रंगपेटीतले रंग चोरता. आधी सर्व लाल रंगाच्या छटा चोरल्यात. मला आता सूर्योद्याचे देखावे रंगवता येत नाहीत. नंतर पिवळा.जांभळा..शेवटचा पोपटी रंगसुद्धा चोरलात. आता माझ्याकडे फक्त पांढरा आणि काळा उरलेत. काय हा मूर्खपणा? हिरव्या रंगाचं रक्त पाहिलंय का कुणी? आणि रोज रक्ताचा डाग ताजा ठेवण्याची इतकीच हौस आहे तर माझे रंग का चोरता? खरं रक्त आणता नाही येत तुम्हाला?' अमिताने चिडून सरबत्ती सुरु केली.


भूत जरा वरमले. 'मी तरी काय करणार? आजकाल रक्त मिळणं किती कठिण झालं आहे. तुझ्या त्या आगाऊ भावाने लायझॉल वापरुन मला आव्हान दिलं म्हणून मला हे सर्व करावं लागलं.'


'तुम्ही या घरातून निघून जा. आम्ही आता इथे राहतो. वाटलं तर मुंबईत जा. तिथे लोक भूत बघायला आणि घरी ठेवायला कितीही पैसे द्यायला तयार होतील. देव दूध पितो म्हणून त्यांनी कितीतरी दूध आणि वेळ वाया घालवला होता. भूतासाठी तर अजून वेडे होतील.'


'आता या उतारवयात मला कुठेही जायचं नाही. मुंबईत तर मुळीच नाही.'


'ठिक आहे, मी राहूकेतूंना अजून एक आठवडा सुटी घेऊन घरी रहायला सांगते.'


'नाही, थांब अमिता, असं नको करुस. मी खूप थकलो आअहे. मला आता शांत झोप हवी आहे पण तीपण मिळत नाही. तीनशे वर्षांपासून मी जागा आहे आणि आता मला विश्रांती हवी आहे.'


'बिचारं भूत!! तुम्ही झोपू शकत नाही का?'


'एक जागा आहे जिथे मला शांत झोप लागेल. तिथे तारे असतील आणि देवदूत गाणं गात असतील. मी आजपर्यंत खूप पापं केली आहेत. जोपर्यंत कोणी निर्मळ मनाने मला माझ्या सर्व पापांबद्दल क्षमा करत नाही आणि माझ्यासाठी खऱ्या मनाने प्रार्थना करत नाही तोपर्यंत मला मुक्ती नाही.' भूताचे डोळे पाणावले.


भूताची अवस्था बघून अमिताच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, 'मी प्रार्थना करेन तुमच्यासाठी.' आणि ती डोळे मिटून पुटपुटली,'हे परमेश्वरा,यांना यांची पापं माफ कर. त्यांनी भरपूर फळं भोगली आहेत तीनशे वर्षे. आता त्यांना तुझ्या दारी आश्रय दे.' 


आणि भूत हळूहळू विरळ होऊ लागलं. 'मुली, तुझे असंख्य आभार!' असं म्हणून ते नाहीसं झालं.


वत्सलाबाई अमिताला घरभर शोधत होत्या. शोधत शोधत त्या रिकाम्या खोलीत आल्या, तर अमिता डोळे मिटून बसली होती. आणि शेजारी चिमूटभर राख पडली होती. उमरावसाहेबांच्या भूताला अखेर मुक्ती मिळाली होती..... 
                                           -समाप्त-
(मूळ ' कँटरव्हिलेचे भूत ' कथेचा स्वैर अनुवाद.)