स्त्री भ्रूणहत्या (वरदाची कविता)

स्त्री भ्रूणहत्या  ( वरदाची कविता)

थांबा! या जगात जन्म घेण्याआधीच मला का मारून टाकताय?
मी एक मुलगी आहे म्हणून?
आज कित्येक नवजात मुलींचा हाच मूक आक्रोश आहे!
जगातील कित्येक सुंदर गोष्टी पाहण्यापासून, अनुभवण्यापासून आम्हांला का वंचित ठेवताय?

मी तुमचाच एक अंश, तुम्हीच प्राण ओतलेत, तुम्हीच माझ्या शरीरात रक्त पोहचवलंत......
आणि आज.. तुमच्याच अंशाला, तुमच्याच प्राणाला, तुमच्याच रक्ताला, तुम्ही मारताय?
का? मी एक मुलगी आहे म्हणून?

मुलगा म्हणजे वारस, वंशाचा दिवा... आणि मुलगी?
मुलगी म्हणजे परक्याचं धन? इतरांना अभिमानानं सांगता... पहिली बेटी, धनाची पेटी!
आणि तुमच्याच धनाच्या पेटीला तुम्ही दूर सारताय? का?
धनाची पेटी एक मुलगी आहे म्हणून?

मुलगा तुमची वंशवेल वाढवतो, आणि मुलगी तिची स्वत:ची बीजं निर्माण करते.....
तुम्ही एका स्त्रीच्याच पोटी जन्मलात, मग मुलगाच हवा असा अट्टहास का?
तुम्ही मुलगी मारताय, म्हणजे एक भावी मातृत्वच गमावताय.
तुमचेच प्राण, तुमचाच अंश, तुमचंच रक्त, तुमचीच धनाची आणि आनंदाची पेटी म्हणजे मी!! मुलगी!
तेव्हा...... इतरांना मुलगी झाली तर म्हणा, अभिनंदन मुलगी आहे!
आणि मीही तुम्हांला सांगतेय, मुबारक हो! मुलगी झालीय !