श्री निसर्गदत्त महाराज

श्री निसर्गदत्त महाराज या औलीयाची तुम्हाला ओळख व्हावी म्हणून हा लेख.

एक अत्यंत सामान्य माणूस सुद्धा सिद्ध होऊ शकतो याचा दाखला म्हणजे महाराज. आपल्याला त्यांच्या जीवनात डोकावण्याच कारण नाही. ते सामन्याहून सामान्य होते, त्यांची शैक्षणिक, आर्थिक किंवा कौटुंबिक स्थिती फारशी आशादायक नव्हती इतकी माहिती पुरेशी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते मराठी होते. त्यांनी स्वतः तपासलेलं आणि त्यांच्या सिद्धत्वाची अपूर्व झलक दाखवणारं एकमेव पुस्तक म्हणजे 'सुखसंवाद'. साधकांच्या विविध प्रश्नांना समोरासमोर दिलेल्या उत्तरांच ते संकलन आहे.

श्री निसर्गदत्त महाराज

महाराज कोणत्या साधनेनं सिद्धत्वाला पोहोचले हे जाणणं उपयोगी आहे. शांत बसून 'मी आहे' या जाणिवेवर स्थिर राहणं ही एकमेव साधना त्यांना बोधाप्रत घेऊन गेली. त्यांच्या शब्दात :

'मी आहे' या शुद्ध असण्यावर मन एकाग्र करणे आणि त्यातच राहणे ही गुरुंची सूचना मी पाळली. केवळ 'मी आहे' ही जाणीव मनात धरून मी तासंतास बसत असे. लवकरच शांती, आनंद आणि सखोल सर्वव्यापी प्रेम ही माझी सहजस्थिती बनली. त्या स्थितीत मी, माझे गुरू, माझे रोजचे जीवन आणि सभोवतालचे जग सारे अदृश्य झाले. केवळ शांती आणि अथांग मौन उरले.(सुखसंवाद - ५१) 

'जागणे, झोपणे आणि परत जागणे सतत चालू असते पण हा अवस्था पालट मला घडत नाही. त्या अवस्था फक्त घडतात एवढेच. मला केव्हाच काही घडत नाही. काहीतरी अपरिवर्तनीय, गतिहीन, स्थिर, सुमेरूवत, खडकासारखे अभेद्य आहे. घनदाट सच्चिदानंद स्वरूप आहे. मी त्या वेगळा कधीच नसतो. कोणताही छळ किंवा आपत्ती मला स्वरूपापासून विचलित करू शकणार नाही. ही अवस्था संपूर्ण स्थिर आणि कायमची आहे. मी काही केले तरी ती सुमेरूवत स्थिर असते. एकदा तुम्हाला सत्यस्वरूपाची प्रचिती आली की तुम्ही त्यात स्थिर होता'. (सुखसंवाद -४२)

या गृहस्थाचा आत्मविश्वास कमाल आहे. त्यांचे शब्द प्रत्येक साधकाला अपरिमित दिलासा आहेत. ते म्हणतात :

'मी आहे' हा साधा भाव सर्वात उत्तम. त्यावर धीमेपणानं स्थिर राहा. येथे धीमेपणा हा सुज्ञपणा आहे. अपयशाचा विचार करू नका. या कार्यात अपयश येऊच शकत नाही'.   (सुखसंवाद - ५१)

'मी तुम्हाला परत सांगतो, तुम्ही सर्वव्यापी, सर्वातीत, सद्वस्तू आहात. त्याप्रमाणे वागा. विचार, भावना, कृती ऐक्याने होऊ द्या. मग मी जे म्हणतो त्याचा प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला येईल. प्रयत्नाची गरज नाही. विश्वास ठेवा आणि त्याप्रमाणे वागा'.  (सुखसंवाद - ५१)

'मी सध्या चौऱ्याहत्तर वर्षांचा आहे तरी मी चौऱ्याहत्तर वर्षांपूर्वीचे अर्भक आहे. मला स्पष्ट जाणवते की सर्व बदल होऊनही मी ते मूल आहे. माझ्या गुरुंनी मला सांगितले, "आता देखील जे मूल तू आहेस तेच तुझे स्वरूप आहे. 'हे मी आहे' किंवा 'ते मी आहे' अशा कल्पनेमुळे बिघडण्यापूर्वी 'मी आहे' हे जेथे अजून शुद्ध आहे, अशा शुद्ध असण्याच्या स्थितीत मागे जा". तुमचे ओझे तुमच्या खोट्या तद्रूपतेमुळे आहे. त्याचा त्याग करा'. (सुखसंवाद - ५१)

_______________________________

रोजच्या जगण्यातल्या प्रश्नांची उत्तरं सिद्ध कशी देतो, तो कसं जगतो हे सुखसंवादाच्या निमित्तानं आपल्याला कळू शकतं. अगदी आपल्यातला माणूस आपल्याला सांगतोय असे हे संवाद आहेत.

कोणताही सिद्ध तीन गोष्टी साधत असतो : एक, तुम्हीच सत्य आहात हे तुम्हाला सांगणं;  दोन, आपण सत्य नाही असं वाटण्याला तुमच्या ज्या धारणा आहेत त्या दूर करणं आणि तीन, सत्य आणि आपण यांची स्वतःच्या प्रतिभेनं सांगड घालून देणं.

सत्य जरी एक असलं आणि अनेकांनी ते अनेक प्रकारे सांगितलं असलं तरी ज्या सिद्धाशी आपलं ट्यूनिंग जमतं तो आपल्याला भावतो.

'स्व'चा गौरव महाराज कसा करतात ते पाहा :

प्रथमच तुम्ही जाणले पाहिजे की  प्रत्येक गोष्टीचा, तुमचा स्वतःचा देखील पुरावा तुम्हीच आहात. तुमचे अस्तित्व कोणी सिद्ध करू शकत नाही कारण त्याच्या अस्तित्वाला प्रथम तुम्हीच बळकटी आणली पाहिजे. तुमच्या असण्याबद्दल आणि जाणण्याबद्दल तुम्ही कोणाचे देणे लागत नाही. तुमच्या लक्षात असू द्या की तुम्ही संपूर्णपणे स्वयंसिद्ध आहात. तुम्ही कोठून येत नाही किंवा कोठे जात नाही. तुम्ही कालातीत असणे आहात, जाणीव आहात.  (सुखसंवाद - ३७)

सिद्धत्वाच्या स्थितीचं ते किती साधेपणानं वर्णन करतात ते पाहण्यासारखं आहे :

'मी जगाशी एकरूप आहे तरीही त्यापलीकडे आहे असे जाणल्यामुळे मी सर्व भीती आणि इच्छा यापासून मोकळा झालो. मोकळा व्हावे असे मी बुद्धीने ठरवले नाही. मला असे आढळले की मी अनपेक्षितपणे, विनासायास मोकळा आहे. तेव्हापासूनच इच्छा आणि भिती यांच्यापासूनची ही मोकळीक टिकून आहे.

आणखी मला असे आढळले की मी प्रयत्न करण्याची जरूरी नाही. विचारामागोमाग घटना विनाविलंब आणि अविरोधपणे घडते. विचार स्वयंपूर्ण होतात. सर्व गोष्टी योग्य रितीने आणि सहजपणे जमून जातात.

मुख्य बदल मनात झाला. मन गतिहीन, मौन झाले. ते जलद प्रतिसाद देते पण प्रतिसादाला चिरस्थायी करू पाहत नाही. स्वयंस्फूर्ती हीच जीवनपद्धती झाली. खरे नैसर्गिक झाले आणि नैसर्गिक खरे झाले. 

सर्वात महत्त्वाचे म्हणजे अपरंपार स्नेह, दुर्बोध आणि शांत सर्वप्रकाश, सर्वव्यापी प्रेम, स्वयंसिद्ध झाले आणि त्यामुळे सर्व चित्तवेधक, सुंदर, अर्थपूर्ण आणि प्रेम करण्याजोगे बनले. (सुखसंवाद - ५७)  

_______________________________

अहंकार या सर्वात मोठ्या गैरसमजाबद्दल महाराज काय सांगतात ते अफलातून आहे :

'अमकातमका मी ही कल्पनाच फोल असल्यामुळे ती सातत्य चाहते. आपले नित्यस्वरूप मात्र असतेच त्याला सातत्याची गरज नाही. पण ' मी अमकातमका ' असे मानल्यामुळे ती भावना घट्ट टिकवून ठेवण्यासाठी आपण ती वागवेल तसे वागतो. तिच्या मर्जीशिवाय कुठलाही व्यवहार तिला कबूल नसतो. क्षणोक्षणी ती वेगळे रूप घेते आणि आपला व्यवहार नित्य, अखंडितपणे चालूच ठेवते. ही अनर्थकारी परंपरा कायमची थांबवण्यासाठी मी अमकातमका ही कल्पना एकदाच कायमची सोडणे हाच एक रामबाण उपाय आहे.

देह आणि देहाचे नांव याचा अंगीकार केला नाही, ती कल्पना सांडली तर स्वच्छ आपण, केवळ ज्ञान तेच शिल्लक राहते. अमुकतमुक म्हणून जाण नव्हे तर केवळ ज्ञान.' (सुखसंवाद - ६३)

_________________________________

मला वाटतं, न्यूनगंड हा अहंकाराचा सर्वात गहन पैलू आहे. मानवी अस्वास्थ्याचं  मूळ कारण न्यूनगंड आहे.  महाराज किती सहजपणे त्याचं निराकरण करतात ते सांगून हा लेख संपन्न करतो : 

 साधकानं विचारलंय ' मी काय शिकावे बरे? '

महाराज उत्तरतात : ' निश्चिंतपणे जगणे. ह्यासाठी तुम्ही जाणले पाहिजे की तुमचे स्वरूप अजिंक्य, निर्भय आणि सदाविजयी आहे. एकदा तुम्ही निश्चितपणे जाणले की आपल्या कल्पनेखेरीज कोणीच आपल्याला त्रास देऊ शकत नाही, मग तुम्ही आपल्या इच्छा, भिती, पूर्वधारणा याकडे दुर्लक्ष करता आणि केवळ सत्याने जीवन जगता' (सुखसंवाद - २९)

आणि  कुणालाही स्वत:प्रत आणतील अशी त्यांची ही वक्तव्यं :

'शाश्वताला जाणणे म्हणजे शाश्वत होणे, संपूर्ण होणे, विश्वातील सर्वासहित विश्वरूप होणे. प्रत्येक घटना ही संपूर्णाचा परिणाम आणि व्यक्तता असते आणि संपूर्णाशी तिचा मूलभूत मेळ असतो. संपूर्णाचा सर्व प्रतिसाद योग्य, प्रयत्नरहित आणि तत्कालिक असतो. ' (सुखसंवाद - १७)

'आपल्या असण्याबद्दल पूर्णपणे जागृत राहा म्हणजे तुम्ही जाणीवपूर्वक आनंदात राहाल. तुम्ही आपले मन जे तुम्ही जे नाही त्याकडे लावता त्यामुळे तुम्ही सुस्थितीची, खुशालीची जाणीव गमावून बसता.' (सुखसंवाद - २५)

' स्वतःला जाणायचे आहे असे तुम्ही म्हणता. तुम्ही स्वतःच आहात, तुम्ही जे आहात त्या वेगळे तुम्ही असूच शकत नाही. जाणणे असण्याहून वेगळे असते काय?  स्वतःची व्याख्या आणि स्वतःचे वर्णन करण्याचा प्रयत्न केल्याखेरीज तुम्ही स्वतःच्या असण्यानेच स्वतःला जाणू शकता. (सुखसंवाद - ९९)

____________________________________

 एका साधकानं विचारलंय : 'आध्यात्मिक प्रगतीची लक्षणं कोणती? '

आणि महाराज अत्यंत सहजपणे सांगतात : ' निश्चिंतपणा, आराम, आनंदाची जाणीव, अंतर्यामी सखोल शांती आणि बाहेर भरपूर उत्साह!'  (सुखसंवाद - ८९)