चिखलमातीत पडल्याने जरी डागाळले होते
जरा प्रेमात न्हाल्यावर पुन्हा तेजाळले होते
किती वचने दिली होतीस प्रणयाराधनेसाठी
नि मी स्वाधीन होताना कुठे पडताळले होते?
असा वाचून गेला प्रीत तो डोळ्यांतली माझ्या
जणू आटोपत्या ग्रंथास वर वर चाळले होते
तुझ्यावर सूड घेण्याची जरी मज लाभली संधी
कशी विसरू, कधी काळी तुझ्यावर भाळले होते
?
कुणाला घालता भीती चितेच्या ग्रीष्म ज्वाळांची
किती वर्षे वियोगाने जिवाला जाळले होते...
नसे ही आत्महत्या; हे स्वयंवर मृण्मयीसाठी
तुला झिडकारुनी अग्नीस मी कवटाळले होते