उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर ०१ : स्वप्न, तयारी आणि ट्रुम्सोकडे प्रयाण

=====================================================

उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर  : ०१...

=====================================================

स्वप्न

उत्तर ध्रुव म्हटले की सर्वप्रथम डोळ्यासमोर येतो तो बारा महिने बर्फाच्छादित आणि सतत शून्याखाली अनेक अंश सेंटिग्रेड थिजलेला प्रदेश. नुसत्या नावानेच हुडहुडी भरायला लावणाऱ्या  उत्तर ध्रुवाबद्दल माझ्या मनात कोठेतरी एक अनामिक आकर्षण फार पूर्वीपासूनच आहे... नक्की केव्हापासून ते सांगता येणार नाही पण बहुदा शाळेत भूगोल शिकताना या प्रदेशाची प्रथम ओळख झाली तेव्हापासूनच असावे. तेथे राहणाऱ्या एस्किमो लोकांच्या बर्फाच्या igloo नावाच्या घरांनी माझे कुतूहल अधिकच वाढवले. त्यातच उत्तर ध्रुवीय प्रदेशांत दिसणाऱ्या "ऑरोरा बोरियालीस" या निसर्गचमत्काराची माहिती झाली तेव्हा तर कधी ना कधी तेथे जायचेच हे मनात पक्के झाले... कधी? कसे? याचा काही पत्ता नव्हता पण जायचे नक्की झाले एवढे मात्र खरे...  तो काळ कॉलेजचा होता त्यामुळे आणि सफर उत्तर ध्रुवीय प्रदेशाची होती, म्हणजे अर्थातच सफरीच्या इतर सणकांप्रमाणे तेव्हाच्या तुटपुंज्या खिशासह धोकटी पाठीवर मारून तडक निघण्यासारखी सोपी शक्यता नव्हती. त्यामुळे माझे हे स्वप्न बराच काळ अपूर्ण राहिले... पण ते गप्प बसले नाही. मनाच्या कोपऱ्यात बसून मधून मधून ढुशी मारत "मी इथेच आहे. मला विसरू नकोस." असे सांगतच राहिले.

शेवटी हो ना करता करता, सहा महिन्यांपूर्वी ठरवले की आता खूप झाले, चला निघा आता. मग आंतरजालावर पर्यटन कंपन्यांचा शोध घेणे सुरू झाले. आंतरजालाचे इतर असंख्य उपयोग आहेतच, पण माझ्या भटकंतीला आंतरजाल जी मदत पुरवत आहे त्यामुळे मला तर ते केवळ देवाची देणगीच वाटते... आंतरजालाशिवाय जगाच्या एका कोपऱ्यात बसून दुसऱ्या टोकावरच्या ठिकाणांची सखोल माहिती काढून, कधीही प्रत्यक्ष न भेटलेल्या अनोळखी माणसांबरोबर (कंपन्यांबरोबर) इ- पत्रव्यवहार करून सर्व व्यवस्था पक्की करणे आणि काही आठवड्यात निर्धास्तपणे बॅग घेऊन सफरीला बाहेर पडणे केवळ अशक्य होते.

 
(वरील चित्र आंतरजालावरून साभार)

वरच्या आकृतीत Arctic Circle म्हणजेच ६६ ३३' ४४" ही अक्षांशरेखा निळ्या रंगाच्या तुटक रेषेच्या वर्तुळाने दाखवलेली आहे. या वर्तुळाच्या आतला प्रदेश उत्तर शीतकटिबंध, आर्क्टिक अथवा उत्तर ध्रुवीय प्रदेश होय आणि अश्याच प्रकारच्या दक्षिणेकडच्या भागाला अंटार्क्टिका म्हणतात हे सर्वांना माहीत आहेच. उत्तर ध्रुवीय प्रदेशात हजारो वर्षांपासून मानवी वस्ती आहे पण दक्षिण ध्रुवीय प्रदेशात कायमची मानव वस्ती कधीच नव्हती. मात्र गेल्या काही दशकांत अंटार्क्टिका खंडावर आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी अनेक देशांनी तेथे आपले झेंडे रोवून हा भाग आपला आहे अशी दवंडी पिटली आहे. ब्रिटनतर एका भागाला त्यांच्या राणीचे नाव देऊन मोकळा झाला आहे. गंमत अशी की या भागावर चिली व अर्जेंटिनाने अगोदरपासूनच दावे केलेले आहेत! या चढाओढीत भारतही सामील आहे. मात्र या सगळ्या प्रकाराला कोणतीही आंतरराष्टीय मान्यता नाही. असो.
तयारी

उत्तर ध्रुवीय प्रदेश जरी कॅनडा, अमेरिका (अलास्का), रशिया, नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क (ग्रीनलंड), आईसलंड व फ़िनलंड इतक्या देशांत वाटून गेलेला असला तरी मला हवी असलेली मुख्य आणि इतर आकर्षणे चांगल्या प्रकारे केवळ नॉर्वेमध्येच उपलब्ध आहेत हे कळले...  आणि अशा तऱ्हेने सहलीचा देश नक्की झाला.

मग बऱ्यापैकी संशोधनानंतर तीन चार टूर कंपन्यांची लघूसुची बनवली. त्यांच्या ऑफर्सचा आणि इतर माहितीचा अभ्यास करताना ज्ञानात बरीच भर पडली. त्यातल्या काही महत्त्वाच्या बाबी खालीलप्रमाणे होत्या:

१) ऑरोरा बोरियालीस हा अत्यंत लहरी निसर्गचमत्कार जमून यायला निरभ्र आकाश, अंधारी रात्र आणि सूर्यावरची विद्युतचुंबकीय वादळे यांचे समीकरण जमायला लागते. आणि हे सगळे थंडीच्या दिवसातच जास्त जमून येते (बोंबला!   हुडहुडी!)

२) याशिवाय थंडीच्या दिवसांत या प्रदेशात दिवस फक्त अगदी २ ते ४ तासांचा असतो त्यामुळे लांब अंधाऱ्या रात्रींमुळे ऑरोरा दिसण्याचे प्रमाण वाढते (हुडहुडी जरा कमी झाली !)

३) ऑरोरा बोरियालीस बघण्यासाठी ट्रुम्सो हे उत्तर नॉर्वेतील शहर सर्वोत्तम समजले जाते. शिवाय तेथे बर्फामधल्या मजा करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत (हुडहुडी अजून जरा कमी झाली आणि थोडा हुरूप पण आला !)

४) नॉर्वेच्या अतीउत्तरेस असलेल्या किर्केनेस नावाच्या गावात दर हिवाळ्यात केवळ आकाशातून पडलेला बर्फ वापरून एक "स्नो हॉटेल" बनवले जाते. म्हणजे एस्किमोंच्या बर्फाच्या घरात राहण्याचा अनुभव घेण्याची संधी आहे (आनंदाची गरमी आणि हुडहुडी… दोन्ही एकदमच अनुभवली !) २००८साली नॅशनल जिऑग्राफ़िकने या हॉटेलची जगातील २५ सर्वोत्तम नव्या साहसांमध्ये (World's 25 Best New Adventures) गणना केली होती. केवळ एक रात्र राहण्याकरता येथे सर्व जगातून प्रवासी येत असतात. हे हॉटेल दर डिसेंबरमध्ये नव्याने बांधतात आणि २० डिसेंबर ते २० एप्रिलपर्यंत चालू राहते. एप्रिलच्या शेवटी ते हवेच्या वाढलेल्या तापमानाने विरघळते! अशी हॉटेल्स स्वीडन व कॅनडामध्येही आहेत पण किर्केनेसचे स्नो हॉटेल जगात सर्वात जास्त उत्तरेला आहे.

अजूनही बऱ्याच अगोदर माहीत नसलेल्या पण करण्या-बघण्या-सारख्या गोष्टी सापडल्या त्या प्रवासवर्णनात येतीलच. या सगळ्या संशोधनात खालील मुख्य कच्चा आराखडा नक्की झाला:

१) मुख्य आकर्षणे ऑरोरा व स्नो हॉटेल : सगळी सहल यांच्या भोवतीच गुंफायची.

२) सहलीचा काळ जानेवारी : ऑरोरा बघायचा असेल तर थंडी सहन करण्याला पर्याय नाही!

नंतर निवडलेल्या टूर कंपन्यांचे विकल्प पडताळून पाहायला सुरुवात केली. प्रवास करताना जितक्या विविध प्रकारची वाहने वापरता येतील तितका प्रवास जास्त मजेशीर बनतो असे मला वाटते. एक टूर फार पसंत पडली जी "नॉर्वेची राजधानी ऑस्लोपासून बेर्गन नावाच्या बंदरापर्यंत रेल्वेने तेथून पुढे किर्केनेसपर्यंत क्रूझ बोटीने आणि तेथून परत ऑस्लोला विमानाने" अशी होती. मात्र या टूरमध्ये ऑरोरा बघण्यासाठी सर्वोत्तम असलेल्या ट्रुम्सोमध्ये एकच दिवस वस्ती होती. आणि ट्रुम्सोमधला एक दिवस क्रूझच्या मध्यभागी असल्याने टूर कस्टमाईझ करून तेथे दोन दिवस जास्त राहणेही शक्य नव्हते. त्यामुळे ती टूर नापास झाली. इतर टूर्समध्येही काही ना काही खोट निघत गेली.

शेवटी फ्योर्डटूरच्या एका टूरमध्ये बरेच (जवळ जवळ ५० टक्के) बदल करून २५ जानेवारी ते १ फेब्रुवारीची कस्ट्माईझ्ड इटिनेररी पक्की केली, ती पुढील प्रमाणे होती:

(दम्माम-ऍमस्टरडॅम-ऑस्लो-ट्रुम्सो) असा सलग प्रवास - ट्रुम्सो (३ रात्री) –ट्रोल्फ्योर्ड हुर्टिग्रुटन क्रूझ  (बोटिवरच्या २ रात्री) - किर्केनेस (१ रात्र स्नो हॉटेलमध्ये) - ऑस्लो (२ रात्री) -  (ऑस्लो-ऍमस्टरडॅम-दम्माम) असा सलग परतीचा प्रवास.

(वरील मूळ नकाशा आंतरजालावरून साभार)

यातला दम्माम - ऑस्लो - दम्माम हा विमानप्रवास माझी जबाबदारी होती तर नॉर्वेमध्ये ऑस्लोपासून - ऑस्लोपर्यंतचा सर्व प्रवास, हॉटेल्स, आकर्षणे, इ. जबाबदारी फ्योर्डटूरची होती.

इतर सहलींत आणि या सहलीत एक फार मोठा फरक होता... हुडहुडीचा!  तिचा काहीतरी बंदोबस्त केल्याशिवाय पर्याय नव्हता. तेव्हा खास हुडहूडीनिरोधक आयुधे जमवायला सुरुवात केली. युद्धाची तयारी खालच्या चित्रात दिसत आहे...

 

१. रुपा थर्मलवेअर : हे मागच्या सुटीत भारतातून आणायचे असे ठरवून आठवणीने विसरून आलो होतो  ! शेवटी दम्माम्ममध्ये जगभरच्या पर्यायांतून थर्मलवेअर शोधताना हाच पर्याय सर्वोत्तम वाटला... आणि सर्व सहलभर त्याने माझे असे उत्तम संरक्षण केले की या भारतीय उत्पादनाचे जेवढे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

२. लोकरीची टोपी : डोके, कान आणि मानेचा मागचा भाग झाकू शकणारी

३. लोकरी मफलर

४. लोकरी हातमोजे : बर्फ़ाच्या खेळाडूंच्या वापराचे हातमोजे  दम्माममध्ये मिळू शकले नाही. मग लोकरीच्या हातमोजाचे दोन जोड घेतले. मात्र या अस्त्राची मात्रा किती कमी पडणार हे ध्यानात येण्याअगोदरच कर्मधर्मसंयोगाने योग्य हातमोजे विकत कसे घ्यावे लागले हे पुढे येईलच.

५. आतमध्ये कृत्रिम फर असलेले जाड जॅकेट

६. बर्फासाठी खास बूट भारतात आणि दम्माममध्ये मिळाले नाहीत. मग माझे जाडसे नायकेचे स्नीकर्स व टेनिस खेळताना वापरतात तसल्या जाड पायमोज्यांच्या दोन जोड्या (एकावर एक घालायला) आणि अजून दोन जोड्या राखीव असा शस्त्रसाठा केला. हाच उपाय मी स्वित्झर्लंडच्या हिवाळ्यात यशस्वीपणे वापरला होता... पण इथे त्यापेक्षा २,०००+ किमी जास्त उत्तरेला जायचे होते म्हणून जरा साशंक होतो. पण गरज पडल्यास ट्रुम्सोमध्ये खरेदी करू असे ठरवले होते.

७. कानांचे थंडीपासून संरक्षण करणारे इयर डिफेंडर्स

असा जेवढा शक्य होता तेवढा जामानिमा गोळा केला... अजून काही गरज पडल्यास ट्रुम्सोमध्ये बघून घेऊ असे ठरवले.

शेंगेन व्हिसाची कथा

नॉर्वेला जायचे म्हणजे "शेंगेन" व्हिसा काढणे आले. १९८५ मध्ये काही युरोपियन देशांनी मिळून एकत्र व्हिसापद्धत सुरू केली आहे. हा करार लुक्झेंबोर्ग येथील शेंगेन शहरात झाला म्हणून त्याला शेंगेन व्हिसा असे नाव पडले आहे. आजच्या घडीला या करारात २६ देश सामील आहेत. या पद्धतीमुळे आता एकच "शेंगेन" व्हिसा काढून तुम्ही युरोपमधल्या अनेक सभासद देशांची सफर निर्वेधपणे करू शकता. भारताचा व्हिसा घेऊन परदेशी माणसे आपल्या बहुतेक सर्व राज्यातून इतर काही सोपस्कार न करता हिंडू फिरू शकतात असाच काहीसा हा प्रकार आहे...  महत्त्वाचा फरक असा की भारत हा एक अखंड देश आहे आणि शेंगेनचे सर्व सभासद स्वतंत्र सार्वभौम राष्ट्रे आहेत. मात्र या कराराने प्रवाशांची प्रचंड सोय केली आहे हे निर्विवाद आहे. शिवाय यामुळे त्या देशांच्या अर्थव्यवस्थेलाही मोलाची मदत केली आहे. असो.

शेंगेन व्हिसासाठी केवळ अर्ज व कागदपत्रे पुरेशी नसतात तर राजदुतावासात जाऊन बायोमेट्रीक्स मशीनमध्ये तुमच्या दहाही बोटांचे ठसे व फोटो काढून घ्यावा लागतो. त्यासाठी नॉर्वेच्या रियाधमधील राजदुतावासात जाण्याची वेळ त्यांच्या संस्थळावर पक्की करायला गेलो तर संस्थळाने लगेच दुसऱ्या दिवशीचीच वेळ दिली. दम्माम-रियाध हे अंतर ४५० किमी आहे आणि चारचाकीने जायला साधारण ४ ते ५ तास लागतात. म्हणजे कामावरून सुट्टी काढून जायला पाहिजे होते. तेव्हा वेळ पुढे ढकलण्यासाठी राजदूतावासाला फोन केला. तर तिथल्या मॅडम म्हणाल्या बरा फोन केलात. मीच तुम्हाला फोन करणार होते. आमच्या बायोमेट्रीक्स मशीनमध्ये बिघाड झाला आहे आणि पुढच्या एक आठवड्याच्या सगळ्या वेळा रद्द केल्या आहेत. मशीन ठीक झाले की आम्ही तुम्हाला फोन करू.

संस्थळावर लिहिले होते की व्हिसा मिळायला अर्ज स्वीकारल्यापासून कमीत कमी दोन आठवडे तरी लागतील. मी तर २५ जानेवारी ते १ फेब्रुवारी असे सहलीचे व विमानाचे बुकिंग कन्फर्म करून बसलो होतो. पण आता वाट पाहण्यापलीकडे हातात काहीच नव्हते. एक आठवडा झाला तरी फोन आला नाही म्हणून परत चौकशी केली तरी मशीन दुरुस्त झालेले नव्हते आणि कधी होईल याची खात्रीलायक बातमीही नव्हती. तीन चार दिवसानंतर सुरू होणार्यान नाताळच्या आणि त्यानंतरच्या वर्षारंभाच्या सुटीनंतरच काय ते आता होईल अशी सुवार्ताही   त्या मॅडमनी दिली. म्हणजे ५ जानेवारीच्या अगोदर व्हिसाचा अर्ज देणे शक्य नाही हे नक्की झाले. आणि ती तारीखही नक्की नव्हती!

आता फार धोका न पत्करता सरळ सहल पुढे ढकलायचे ठरवले कारण सहलीच्या अगोदरच्या दोन आठवड्यात आधी बदल  केला नसता तर ५० ते ७५ टक्के भुर्दंड पडला असता. पुढची तारीख ठरवताना ध्यानात आले की मूळ तारखेच्या नंतर पंधरा दिवसांनी अमावस्या आहे... अरे, म्हणजे अंधारी रात्र, ऑरोरा दिसण्यासाठी सर्वोत्तम. मग ७ ते १५ फेब्रुवारी असे नक्की करून कारवाई सुरू केली. टूर कंपनीने साधारण १० टक्के जादा फी आकारून बदल करून दिले. मेकमायट्रीप.कॉमलाही तिकिटाचे दिवस बदलण्यासाठी फोन लावला तर त्यांनी तिकिटाच्या एकूण किमतीच्या जवळ जवळ ३० टक्के  सरचार्ज सांगितला. पण चार दिवसांनी फोन केल्यास बराच फायदा होईल असेही सांगितले. चार दिवसांनी फोन केला तर पलीकडल्या बाईसाहेबांनी ८० टक्के जास्त खर्च येईल म्हणून सांगितले. डोके सणकले नसते तरच आश्चर्य! म्हटले, "This is cheating. I was asked to wait for 4 days for a better offer and now you are asking me to pay more than twice your previously quoted charges.  Connect me to your team leader. I wish to lodge a complaint. " तश्या बाईसाहेब जरा गडबडल्या आणि जरा थांबा मीच टीम लीडरशी बोलते असं म्हणून मला होल्डवर ठेवत्या झाल्या आणि दोन मिनिटात परत येऊन म्हणाल्या, "सर माझी थोडी चूक झाली. मी तुम्हाला पहिल्या वर्गाच्या तिकिटातला फरक सांगितला होता. " तिने सांगितलेली नवीन रक्कम चार दिवसांपूर्वीच्या रकमेपेक्षा थोडी कमी होती आणि माझा ऑस्लोपर्यंतचे विमान व पुढचे ऑस्लो-ट्रुम्सो हे विमान अगदी अडीचतासांच्याच फरकाने होते त्यामुळे ते मिळणारे विमान मला चुकवायचे नव्हते याकरिता मी ती म्हणाली ती रक्कम भरून बुकिंग केले. पण ज्या तर्हे ने सर्व व्यवहार झाला त्यात मेकमायट्रीप.कॉमच्या एकंदर कारभाराबद्दल मनात संशय निर्माण झालाच. म्हणून परत त्यांच्याच संस्थळावर शोध घेतला... आणि दिसले की त्यांच्याच संस्थळावर त्याच विमानात मी भरलेल्या मूळ किमतीपेक्षा फक्त ५% जादा किमतीवर भरपूर जागा शिल्लक होत्या! आजपर्यंत मी मेकमायट्रीप.कॉमला डोळे मिटून असंख्य वेळेला राजाश्रय दिला आहे. पण या अनुभवानंतर त्यांची आमची कायमची कट्टी झाली आहे! असो.

व्हिसाचा प्रश्न लोंबकळतच राहिला. राजदूतवासातल्या मॅडम दरवेळेला, "मी तुमचा प्रॉब्लेम समजू शकते पण मी या बाबतीत काहीही करू शकत नाही" असे म्हणत होत्या.  दुःखात सुख एवढेच की सहलीची तारीख पुढे ढकलल्यामुळे निकड कमी झाली होती पण काळजी कायमच होती. शेवटी १२ जानेवारी ला १४ जानेवारीची भेट पक्की झाली आणि आम्ही रियाधला रवाना झालो. सगळे प्राथमिक सोपस्कार आटपून त्या ग्रेट बायोमेट्रीक्स मशीनसमोर बसलो तर ते चालवायला संरक्षक काचेपलीकडे बसलेल्या तरुणीकडून ते काही सुरू होईना!  तिच्या गडबडीवरून आणि एकंदर अविर्भावांवरून काहीतरी गडबड असल्याचे स्पष्ट दिसत होते... आता इतके दिवस थांबून आणि परत ४५० किमी चा प्रवास करून आल्यावर परत व्हीसाची गाडी मूळ पदावर येऊन थांबणार की काय असा विचार मनात आला आणि आता परत सहल पुढे ढकलली तर मेकमायट्रीप.कॉम किती कापणार याचा विचार करू लागलो. तेवढ्यात ती तरुणी आत गेली आणि एका सहकार्यामला घेऊन आली आणि म्हणाली, "मी येथे नवीन आहे. या कामाचा मला नीट अनुभव नाही. " मी मनात म्हटले, " देवा ही बोलते ते खरं असू दे. मशीनमध्ये गडबड नसू दे. " तो तरुणही म्हणाला, "काही प्रॉब्लेम नाही. मेन डेटाबेसला लिंक व्हायला कधी कधी वेळ लागतो. " मी परत मनात, "तसेच असूदे बाबा, तसेच असू दे. "कारण एव्हाना मला त्या मशीनच्या इटुकल्या खोलीत बसून अर्धा पाऊण तास वेळ झाला होता.

शेवटी एकदाचे मशीन सुरू झाले आणि मग मात्र काम पाच मिनिटात आटपले. तो तरुण म्हणाला, "तुम्ही व्हिसा कसा कलेक्ट करणार?". इतके दिवस आणि आजचा इतका वेळ त्यांचे अत्याचार सहन केले होतेच; तेव्हा त्याला म्हणालो, "मी दम्मामहून आलो आहे हे तुला माहीत आहेच. व्हिसा आत्ताच देणार असशील तर थांबतो. नाही तर लगेच दम्मामला परत जाणार आहे. फक्त माझ्या गैरहजेरीत इतर कोणाला माझा पासपोर्ट कलेक्ट करता येईल त्याचे तुमचे प्रोसीजर सांग." तो म्हणाला, "छे, छे, व्हिसा असा ताबडतोप देता येणार नाही. ऑस्लोवरून रिपोर्ट आला की मिळेल. कमीत कमी दहा दिवस लागतील."
त्याच्याकडून पासपोर्टची पावती घेऊन परत निघालो. निघेपर्यंत दोन वाजले होते. वाटेत एक बरे रेस्तरॉ पाहून जेवून घेतले आणि परत दम्मामच्या दिशेने मार्गस्थ झालो. रियाधपासून साधारण १५० किमी दूर आलो असेन तोच फोन वाजला. पलीकडून त्या बायोमेट्रीक्स मशीनवाल्या तरुणीचा आवाज आला, "मी नॉर्वे एंबॅसीमधून बोलतेय. आज व्हिसाकरता आलेले अमुक अमुक तुम्हीच का? " "होय." "तुम्ही रियाधमध्येच आहात काय?" व्हिसाचा सगळा इतिहास माझ्या डोळ्यासमोर तरळून गेला. मनात आले की आता अजून काय प्रॉब्लेम बाकी राहिला आहे? तिला म्हटले की, "मी दम्मामच्या वाटेवर आहे पण काय प्रॉब्लेम आहे ते तर सांग." तशी ती म्हणाली, "प्रॉब्लेम काहिच नाही. तुमचा व्हिसा तयार आहे. लगेच येऊन घेऊन जावू शकता." आनंदाच्या भरात आभार प्रदर्शित केले आणि तिने त्वरित फोन बंद केला. आणि लगेच ध्यानात आले की आता साडेतीन वाजले आहेत परत जाईपर्यंत राजदूतावास बंद होणार. परत फोन करणे आले... यावेळेस त्या तरुणाने फोन उचलला. तो म्हणाला, "काळजी करू नका. पासपोर्ट राजदूतावासाच्या गेटवर ठेवला आहे. तेथे पावती दाखवून ताब्यात घ्या." मग काय, त्याचे आभार मानले आणि ३०० किमी चा जास्त वळसा मारून व्हिसासकट पासपोर्टचा खजिना दम्मामला आणूनच या यशस्वी मोहिमेची सांगता केली.

नंतरचे सात फेब्रुवारीपर्यंतचे दिवस मात्र फारच हळू हळू गेले... बदमाश संपता संपत नव्हते!

अशा तर्हाने सुरुवात झालेल्या आणि काही दिवसापूर्वीच केलेल्या अतिथंड सफरीचे हे आहे ताजे गरमागरम वर्णन! चला तर माझ्याबरोबर उत्तर ध्रुवीय प्रदेशाच्या मजेदार सहलीला.

=====================================================

ट्रुम्सोकडे प्रयाण

सहलीचा पहिला दिवस... खरं तर पहिली रात्र सुरू झाली... कारण विमान पहाटे १:२० वाजताचे होते. सगळे सोपस्कार आटपून विमान २० मिनिटे वेळेअगोदर सुटले आणि हा हा म्हणता त्याने १० किमी ची उंची गाठली. वाटले होते की रात्रभर युरोपमधल्या शहरांचा चमचमाट बधायला मिळेल. पण अर्ध्या तासातच ते ढगांच्या गालिच्याच्या वर गेले आणि खिडकीतून काळोखाशिवाय काहीच दिसेनासे झाले. दम्माम-अमस्टरडॅम हे अंतर ४,७५० किमी आहे आणि आमचा उड्डाणकाळ साडेसहा तासांचा होता. सगळा वेळ डुलक्या घेणे आणि मधून मधून खिडकीतून अंधाराकडे डोकावणे यातच घालवावा लागला.
शेवटी एकदाची अॅमस्टरडॅमला उतरण्याची घोषणा झाली तेव्हा जरा हायसे वाटले. वैमानिकाने विमान २० मिनिटे अगोदर ऊडवून शिवाय जरा जोरात चालवले होते त्यामुळे ते अॅमस्टरडॅमला ३० मिनिटे वेळेअगोदर उतरणार होते. हा माझा शेंगेनमधला पहिला विमानतळ होता त्यामुळे इमिग्रेशनचे सोपस्कार येथेच करायचे होते. ऑस्लोचे विमान पकडण्यासाठी मला फक्त ५५ मिनिटेच वेळ होता त्यांमुळे मनात जराशी काळजी होती. आता जरा हायसे वाटले कारण त्यात अजून ३० मिनिटांची भर पडली होती.

विमानात शेवटचा अर्धा तास खुर्चीमागच्या मॉनिटर्सवर आमचे उतरायचे गेट, तेथून इमिग्रेशनच्या काउंटर्सकडे जाणारा मार्ग, पुढच्या ९० मिनिटातल्या युरोपभरच्या कनेक्टिंग विमानांच्या वेळा आणि गेट्स हे सर्व परत परत दाखवत होते. त्यामुळे सगळ्या शंकांना आपोआप उत्तरे मिळाली होती. विमानातून बाहेर आल्या आल्या इमिग्रेशनच्या काउंटर्सकडे मोहरा वळवला. दहा एक मिनिटात इमिग्रेशन ऑफिसर समोर उभा होतो. त्याच्यापुढे माझा पासपोर्ट सरकवला. त्याने करड्या नजरेने पासपोर्टमधला माझा फोटो आणि माझ्याकडे तीनदा आलटून पालटून पाहिले आणि मग रुक्ष आवाजात माझ्या येण्याचे प्रयोजन विचारले.

"येथून ऑस्लोला जाणार आहे. नॉर्वेमध्ये प्रवासी म्हणून जाणार आहे." मी.

"एवढ्या थंडीत नॉर्वेला?" त्याच्या आवाजात जरासा अविश्वास होता.

"नॉर्दर्न लाइट्स बघायला थंडीतच यायला लागते ना? शिवाय पुढे किर्केनेसला जाऊन स्नो हॉटेलमध्ये राहायचे आहे." युरोपमध्ये ऑरोरा नॉर्दर्न लाईटस् म्हणूनच ओळखला जातो.

"ऍमस्टरडॅम पण खूप छान आहे. इथे नाही थांबणार?" आता त्याच्या आवाजात जराशी नरमाई आल्यासारखे वाटले.

"नाही. सगळे नेदरलँड अगोदरच बघून झाले आहे. पुर्वी एकदा उन्हाळ्यात टूलिप सीझनमध्ये आलो होतो."

"पुन्हा केव्हातरी परत नेदरलँडला जरूर भेट द्या." शिक्का मारून स्मितहास्य करत त्याने पासपोर्ट माझ्या हातात दिला.

"नक्की" मीही स्मितहास्याची परतफेड करत म्हणालो आणि दुसऱ्या बाजूस गेलो.

ऑस्लोच्या विमानाच्या गेटवर पोचलो आणि ध्यानात आले की अरे हे सगळे काम विमानातून उतरल्यापासून ३० मिनिटातच संपले होते! ऍमस्टरडॅम हा प्रवाशांची वर्दळ व आकारमानाने युरोपमधल्या मुख्य विमानतळांपैकी एक आहे, तरीसुद्धा विमानात मिळालेली पूर्ण माहिती, विमानतळाची रचना आणि इमिग्रेशनमधली तत्पर सेवा यामुळेच हे शक्य झाले होते.

ऑस्लोचे विमान वेळेवर सुटले. अॅिमस्टरडॅम ते ऑस्लो हे अंतर ९१५ किमी आहे आणि ऊड्डाणसमय साधारण दोन तासाचा आहे. अर्ध्या तासानंतर ढगांचा ससेमिरा कमी होऊ लागला आणि त्याच सुमारास पूर्वेकडे तांबडे फुटायला सुरुवात झाली होती.

हळूहळू ढगांची चादर दूर होऊन खालचा परिसर दिसू लागला होता. त्याचे हे पहिले दर्शन...

 

 

प्रथम मला वाटले की हा बर्फाने थिजलेला समुद्र आहे. पण जसजसे ढग कमी होऊ लागले तसे दृश्य स्पष्ट होत गेले आणि ध्यानात आले की हा समुद्र नसून बर्फाने झाकलेली जमीन आहे. ऑस्लो जवळ येऊ लागल्यावर आणि विमान उंची कमी करू लागल्यावर बर्फाळलेला समुद्र आणि जमीन बाजूबाजूला दिसायला लागले. हे अवर्णनीय दृश्य पहिल्यांदाच पाहताना मी केवळ अवाक् झालो...

 
.

 

नंतर दिसलेली बर्फाने न्हालेली ऑस्लो नगरी आणि तिच्या आजूबाजूचा थिजलेला परिसर... उत्तर ध्रुवीय प्रदेशाच्या जवळपास पोचल्याची पावती देत होता...

.

.

 

ऑस्लोपर्यंत KLM ने प्रवास झाला होता पण आता विमान कंपनी बदलून SAS Scadenavian Airlines ने ऑस्लो ते ट्रुम्सो असा प्रवास करायचा होता. त्यामुळे चेक् ईन केलेली बॅग ताब्यात घेतली. इमिग्रेशनचे काम तर अॅ्मस्टरडॅमलाच झाले होते पण पुढचे ट्रुम्सोला जाणारे  विमान पकडायला परत चेक् ईन करणे आवश्यक होते.  काउंटरवर गेलो तर फक्त सामान देण्यासाठीच्याच रांगा दिसत होत्या. सगळ्यांनी प्रथम मशीनवर चेक् ईन करून फक्त सामान द्यायला काउंटरच्या रांगेत उभे राहा असे बोर्ड लावलेले होते. चेक् ईन मशीन्स पर्यायी सोय म्हणून अनेक ठिकाणी पाहिली होती पण इथे फक्त तोच एक पर्याय होता. पुढे सर्व नॉर्वेभर असेच होते.

चेक् ईन करून निर्गमनद्वाराजवळ आलो तर तिथली पाटी ट्रुम्सोचे तापमान -७ डिग्री सेल्सियस दाखवत होती (हुडहुडी! )

पण त्याच पाटीवर सूर्याला ढगांनी झाकले नाही असे दिसत होते म्हणजे ऑरोरा दिसण्याची संधी जास्त आहे असे मनाला समजावले. सगळे काम संपल्यावरही पुढचे विमानाचे बोर्डिंग सुरू व्हायला तासभर बाकी होता म्हणून सगळ्या निर्गमन भागात (Departures) एक चक्कर मारली. ऑस्लोचा विमानतळ एक मध्यम आकाराचा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. सध्या त्याचे नविनीकरण करून त्याला मोठा आणि अत्यानुधीक बनवण्याचे काम जोरात चालू होते...

आणखी एक नविन गोष्ट तेथे बघायला मिळाली. नॉर्वेजियन एअरलाईनच्या विमानांच्या शेपट्यांवर स्कॅडेनेव्हीयातिल प्रसिद्ध व्यक्तींची चित्रे आणि नावे छापलेली होती. या प्रकारे मानसन्मान देण्याचा प्रकार पहिल्यांदाच पाहत होतो.

सगळीकडे बर्फच बर्फ होते पण विमानवाहतूक मात्र सुरळीत चालू होती...

 

.

विमान बरोबर वेळेवर पावणेबाराला सुटले आणि १,१५० किमी आणि दोन तासांचे ट्रुम्सोच्या दिशेने उड्डाण सुरू झाले. विमानाने आकाशात झेप घेतली आणि घरे, रस्ते आणि जंगलांनी बर्फात काढलेली नक्षी लहान लहान होत नाहीशी झाली.


 
.

जसजसे विमान उत्तरेला जाऊ लागले तसतसशी बर्फाच्छादित जमीन जाऊन सगळा परिसरच बर्फमय दिसू लागला... बर्फाचीच सपाटी, बर्फाचीच तळी, बर्फाच्याच नद्या आणि बर्फाचेच डोंगर!


 
.


 
.


 
बर्फाळ प्रदेशाचं प्रचंड आकर्षण असलेल्या मला काय पाहू आणि काय नको असे होऊन गेले. न्याहारी द्यायला आलेल्या हवाईसुंदरीने दोनतीनदा हाक मारल्यावरच मला ती ऐकू आली. ट्रुम्सो जवळ येऊ लागले आणि मग बेटाबेटांचा भूप्रदेश आणि न गोठलेला समुद्र दिसायला लागला...


 
.


 
"गल्फ स्ट्रीम" अथवा "नॉर्थ अटलांटिक ड्रिफ्ट" नावाच्या गरम पाण्याच्या समुद्री प्रवाहामुळे नॉर्वेच्या पश्चिम किनार्याकवरचा समुद्र न गोठता तेथली सगळी बंदरे हिवाळ्यातही वाहतुकीसाठी खुली असतात. या प्रवाहाच्या बाजूला असलेल्या भूभागाचे तापमान हजार दीडहजार किमी दक्षिणेला असलेल्या ऑस्लोपेक्षा जास्त असते!

हे ट्रुम्सोचे पहिले दर्शन...


 
या शहराचे इंग्लिश स्पेलिंग जरी Tromso असे असले तरी त्याचा नॉर्वेजियन उच्चार "ट्रुम्सो" असा आहे. Arctic Circle च्या ३५० किमी उत्तरेला असलेले आणि ट्रोम्सोया नावाच्या एका बेटावर वसलेले हे शहर उत्तर ध्रुवीय प्रदेशातले लोकसंख्येनुसार दोन नंबरचे आहे. ते उत्तरेकडचे पॅरीस म्हणुनही ओळखले जाते. ऑरोरा ६५ आणि ७५ अक्षांशाच्या पट्ट्यामध्ये दिसण्याची जास्त शक्यता असते. ट्रुम्सो या पट्ट्यातले सर्वात मोठे शहर आहे हाही एक मुद्दा ट्रुम्सोच्या प्रसिद्धीला बळकटी देऊन आहे.

ट्रुम्सो विमानतळावर बॅगेची वाट पाहताना घेतलेली विमानतळपरिसराची चित्रे...


 
.


 
.


 
.


 
विमानतळाबाहेर पडून हॉटेलच्या दिशेने निघालो तेव्हा दुपारचे अडीच वाजले होते पण शीतकटिबंधातले सुर्यमहाराज अस्ताला जावून अंधार पडायला सुरुवात झाली होती...


 
.


 
वाटेत या रेस्तराँच्या पाटीने लक्ष वेधून घेतले (पाटीवर Kebab लिहिले आहे म्हणजे बहुतेक तुर्कस्तानी रेस्तरॉ असावे)...


 
हॉटेलवर पोचून चेक् ईन केले तेव्हा तीन-सव्वातीन वाजले होते. संघ्याकाळच्या बर्फावरच्या कुत्र्यांच्या गाडीतून फिरायला जायच्या कार्यक्रमासाठी सव्वासहाला निघायचे होते. म्हणजे चांगला तीन तासांचा वेळ होता. घरातून निघून तीन विमानप्रवासांसह एकूण १४ - १५ तास झाले होते. मस्तपैकी गरमागरम शॉवर घेतला आणि मोबाइलमध्ये दोन तासानंतरचा गजर लावून ताणून दिली.

(क्रमश:)

=====================================================

उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर  : ०१...

=====================================================