गझल
नसतोच कोणताही अधिकार माणसाला!
असतेच काय किंमत नादार माणसाला?
जा तू हिमालयावर, किंवा वनामधे जा....
चुकणार काय वेडया संसार माणसाला?
हव्यास, मोह, हेवा....सामान्य माणसांना;
नसते कमी कशाची दिलदार माणसाला!
ते बालपण असो वा वार्धक्य माणसाचे;
दोन्ही वयात लागे आधार माणसाला!
घर हे, नव्हे गुहा ही, तू राहतोस जेथे;
जगण्यास लागतो रे शेजार माणसाला!
ताठा असो कितीही, उद्धट असो कितीही;
करतात नम्र अंती उपकार माणसाला!
देतोच हात ईश्वर, बघ आळवून त्याला....
पण लागती कराया उपचार माणसाला!
संतुष्ट माझिया मी या नोकरीत आहे!
सुचतात कैक धंदे बेकार माणसाला!
हरणार मी न सहजी, जगण्यातली लढाई!
भीती अरे कशाची? झुंजार माणसाला!
आहे निसर्ग त्याच्या जाऊ नको विरोधी....
देतो शहाणपण मग संहार माणसाला!
खाण्यास अन्न, कपडे, राहण्यास घरटे!
जगण्यास काय लागे रे, फार माणसाला!!
येतो सहीसलामत पाहून मरण जेव्हा;
स्मरतात त्याचवेळी आभार माणसाला!
कोणी सडाच, लेकुरवाळा कुणी असू द्या;
लागे करावयाला बाजार माणसाला!
चिंता म्हणून कसली उरणार ना छळाया!
काही नसो, असावा बस, यार माणसाला!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१