व्हिकी

१९८० साली पुण्यात आलो तेव्हा १-२ वर्षे सायकल वापरली.  त्यानंतर एका ओळखींच्या माणसाची सेकंड हॅंड व्हीकी मोपेड (५० सी. सी. ) विकावयाची होती ती मी १८०० रु. खरेदी केली. माझ्या न चालण्यास हि पण एक कारणीभूत होती. (हे असेच चालावयाचे येथे वाचा दुवा क्र. १).  १-२ वर्षे गाडी वापरल्यावर एकदा त्यावर एखादे गावी जावे असे वाटले.  बरोबर भाचा होता.  छोटी गाडी असल्याने घाट चढणार नाही याचा अंदाज होताच म्हणून सातारा, मुंबई साइड रद्द केली.  नगरला पाहुणे होते म्हणून आम्ही नगरला जायचे ठरवले. गाडीची वेग मर्यादा कमाल ८० असल्याने ६० चा वेग अपेक्षित ठेवून आम्ही सकाळी ६ वा. निघू ८-९ वाजता पोहचू व परत २ वाजता निघून ५ वाजेपर्यंत घरी परत येऊ असा अंदाज बांधला.  घरी ऑफिसचे कामासाठी चाललो आहोत असे सांगितले अन ठरल्याप्रमाणे ६ वा. निघालो.  एस. टी. बसच्या मागे जाऊ असे वाटले पण बसच्या मागे जाणे शक्य नाही हे थोड्या वेळात समजले.  असो काही हरकत नाही, मोठा रस्ता आहे जाऊ म्हणून मोपेड दामटू लागलो.  रांजणगावपर्यंत काहीही अडचण आली नाही.  तेथे दर्शन घेतले अन टाकीत इंधन टाकावे म्हणून साइड डिकी मधली बाटली काढली तर पाहतो तर काय. तीस कोठेतरी गळती लागली असल्याने सर्व इंधन गळून गेले होते. (त्या वेळी रवीवारी पेट्रोल पंप बंद असत म्हणून हि पूर्वतयारी केली होती).  आम्ही काळजीत पडलो.  आता कसे व्हायचे. असो. देवाचे नाव घेऊन तसेच पुढे निघालो.  सुप्याजवळच्या घाटात गाडी डबलशीट काही चढेना.  शेवटी गाडी हातात घेऊन पायी घाट चढलो.  पुढे नगर जवळ एक पेट्रोल पंप सुरू दिसला ते पाहून एवढा आनंद झाला.  पण तो रस्त्याच्या विरुद्ध दिशेस होता. गाडी रस्त्याच्या त्या बाजूस घेताना रस्त्याच्या कडेवरून चाक अडकून गाडी घसरली अन आम्ही चक्क आडवे झालो. पायावर सायलेन्सरची पुंगळी. काय झाले असेल हे सांगावयासच नको. पॅंटवरून जबरदस्त चटका बसला (भाजले).  भाच्याची पँट फाटली.  तसेच उठून इंधन भरून आम्ही नगरला १० वाजता पोहचलो.  आशा थिएटरला गाडी लावली अन जवळच असणाऱ्या एका शिंप्याकडून पँट रफू करून घेतली अन नातेवाइकांकडे गेलो.  तेथे जेवण केले.  आमच्या अवतारावरून त्यांना अंदाज आला की आम्ही गाडीवर आलो असेल व शेवटी त्यांना खरे सांगावे लागले. दुपारी २ वा. आम्ही निघालो.  इंधन भरले होते गाडीत अन पोटात त्यांमुळे आता काही अडचण नाही म्हणून आम्ही पुण्यास निघालो.  सुप्यापर्यंतच हा आमचा आनंद टिकला.   घाट उतरताना घाटाच्या शेवटी मागचे चाक पंक्चर झाले.  मोपेडला स्टेपनी नसल्याने मोठ्या अडचणीत सापडलो.  रविवार असल्याने जवळपास कोठे पंक्चर काढणारा मिळणे शक्यच नव्हते. अन मिळाला तरी तो सुपा ह्या गावी मिळाला असता पण ते गाव पण खूप लांब होते. शेवटी तसेच रिमवर गाडी २-३ कि. मि. दामटली अन आतील ट्यूबच्या पार चिंध्या करून टाकल्या अन शेवटी मध्येच हतबल होऊन उभे राहिलो.  शेवटी ठरवले की आता गाडी एखाद्या ट्र्कमध्येच टाकून न्यावी लागेल अन त्यासाठी येणाऱ्या ट्रंकांना थांबण्याची विनंती करू लागलो पण बराच वेळ कोणी थांबावयास तयार होईना.  थोड्या वेळाने एक जीपवाला भेटला.  त्याने मदत करण्याचे मान्य केले व त्याच्या जीपमध्ये मोपेड चढवली अन पुण्यास ऑफिसमध्ये गाडी उतरवून घेतली.  जीपवाल्यास  नगर ते पुणे ३ तिकिटाचे पैसे दिले.  संध्याकाळचे ७ वाजत आले होते. घरी काळजी करतील म्हणूत त्याला घरी पाठवले अन मी मेकॅनिकला घेऊन ऑफिसला आलो. तेथे नवीन ट्युब बसवून मग मी घरी आलो.  ४-५ दिवसाने भाजलेली जखम चिघळू लागली आणि आमच्या ह्या उद्योगाची घरी कल्पना द्यावी लागली आणि भरपूर बोलणी खाल्ली.

राजेंद्र देवी