नाटाचे अभंग : एक चिंतन

जगद्गुरू तुकाराम महाराजांची अभंगगाथा
नाटाचे अभंग
(एक मुक्त चिंतन)

- डॉ. पांडुरंग रामपूरकर / यशवंत जोशी

प्रारंभ : गुरुवार, चैत्र शुध्द प्रतिपदा, शके १९३५. दिनांक ११-०४-२०१३

प्रास्ताविक

 सर्व संप्रदाय, पंथ, किंबहुना धर्माचे मत साररूपाने घेतल्यास सर्वसंमत असे एकच साधन आहे, ज्याला नामसाधन म्हणतात. भागवतादी महापुराणेही नि:संशयपणे आणि अट्टहासाने नामसाधनावरच शिक्कामोर्तब करतात. तथापि, काही शिक्षित, अल्पश्रुत असे साधक या ठिकाणी अशी शंका निर्माण करतात की, ’तर मग ज्ञानसाधन हे गौण ठरण्याची शक्यता आहे. कारण वेदांचे सार असणारी भगव‍द्‍गीता उच्चरवाने सांगत आहे की, ’न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते’ (अ. ४/३८). नामसाधन आणि ज्ञानसाधन यांचा समन्वय साधावा कसा ? इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की, भगवंताने ज्ञानासारखे पवित्र अन्य काहीही नसल्याचे सांगितले आहे, हे खरे. तथापि, पुढच्याच श्लोकात त्यांनी ’श्रद्धावान् लभते ज्ञानम्’ असा खुलासाही केलेला आहे. नामसाधनाचा पाया श्रद्धा हाच आहे आणि केवळ नामसाधनाने ज्ञानप्राप्ती विनासायासही होऊ शकते. श्रद्धाविहीन मनुष्याला प्राप्त झालेले शब्दज्ञान अहंकाराचे पोषण करणारे ठरते. म्हणून अशा ज्ञानाला ते पावित्र्य लाभत नाही, जे भगवंताला अभिप्रेत आहे. तथाकथित शब्दज्ञानाचा आश्रय घेऊन जहंकाराने बाधित होणारा साधक नामाकडे वळेलच असे नाही. म्हणजे अंतिम साध्य असणार्‍या भगवंताचे धाम न पाहता केवळ त्याच्या गावी जाऊन कृतकृत्यता मानण्यासारखे आहे. काशीयात्रा म्हणजे वाराणसी स्थानकावर उतरून, चहा-पाणी करून, गंगा-काशीनाथाचे दर्शन न घेता, परतणे नव्हे.
 या गोष्टीचा सखोल विचार केल्यास आपल्याला असे आढळून येईल की, केवळ नामसाधन सा़गणारे संत आपल्या साधनाद्वारे तात्विक ज्ञानाच्याबाबत स्वयंपूर्णतेला गेलेले असतात. अगदी साध्या साध्या दिसणार्‍या त्यांच्या रचनातून वेदांताप्रमाणे मोठा आशय असणारे तात्त्विक चिंतन समोर येते. तुकोबारायांच्या अभंगगाथेला म्हणूनच ’पंचम वेद’ म्हणून मान्यता दिली गेली आहे. आश्चर्य असे की, आपल्या ठायी झालेल्या ज्ञानोदयाची कित्येकदा त्या संतांना स्वतःला कल्पनाही नसते.
 थोडक्यात सांगायचे असे की, तुकाराम महाराजांच्या गाथेतील नामपर अभंगा़चे विवरण सांगताना ’तुका म्हणे नाम...’ या पुस्तकाद्वारे यथामती नाम-महिमा वर्णन केला आहे. तुकोबारायांच्या गाथेत निरनिराळ्या विषयावर लिहिलेले असेही काही अभंग दिसून येतात, ज्यामध्ये संपूर्ण तत्त्वज्ञान तुकोबारायांनी सोदाहरण, दृष्टांतपूर्वक, विविध रूपकांच्या द्वारे प्रकट करून ठेवलेले आहे, उदा. आंधळे, पांगळे, वासुदेव, नाट आदी. यांपैकी ’नाट’ या विषयावरील अभंगांचा अल्प विचार येथे प्रकट करण्याचा मनोदय आहे. हा शुभशकुन आजच्या गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याची बुद्धी होणे, हीसुद्धा एक प्रकारे ईश्वरेच्छा आणि संतकृपा म्हटली पाहिजे..
 ’नाटाचे अभंग’ या संदर्भात, ’नाट’ या शब्दाचा मराठी शब्दकोशातून होणारा अर्थबोध संभ्रमात टाकतो. येथे वापरला गेलेला हा शब्द अशुभ दर्शविणारा, अपशकुन दर्शविणारा किंवा नकारात्मक नाही. त्यामागे विधायक भाव आहे. नाट्याचा विषय य आभंगातून येत नाही. त्यामुळे भारूड खुलविण्यासाठी जसा नाट्याचा आधार घेतात, तसा प्रकार या अभंगांसाठी करण्याचा प्रघात नाही. या शब्दाने येथे कुठली एखादी वस्तू (मोठा लाकडी वासा आदी) साधन, खेळ वगैरेचा बोध होत नाही. संतवाङ्मयातला संदर्भ देऊन मराठी शब्द्कोशातून जो अर्थ समोर येतो, तो असा : ’नृत्य-नाच व असे प्रकार करणारी हलकी जात (उग्रगंधा अरूप गौळणी । नाट जातीच्या हस्तिणी॥- जैमिनी अश्वमेध) आणि ’ठावठिकाण, स्थान, प्रदेश, नाड, सुरुवातीचे ठिकाण, मर्मस्थान (तयांचिये भजनाचे नाटी़ ।- ज्ञाने. १०.१०९)’. यातील दुसरा अर्थ (ज्ञानेश्वरीच्या संदर्भात दिलेला) ठावठिकाण किंव मर्मस्थान हा योग्य मानता येतो. (उदा. येथूनिया ठाव । अवघे लक्षायाचे भाव ॥१॥ उंच देवाचे चरण । तेथे झाले अधिष्ठान ॥धृ॥ आघातावेगळा । असे ठाव हा निराळा ॥३॥ तुका म्हणे स्थळ । धरूनि राहिलो अचळ ॥४॥) परंतु, अशा अर्थाचे इतर अभंगही आहेत. त्या अभंगांची गणना ’नाटाच्या अभंगा’त केली जात नाही. मग ’नाटाचे अभंग’ म्हणून विशेष अर्थ काय असावा, याचा शोध घेता असे समजते की, उर्दू, सिंधी, पंजाबी भाषांमधून संतांनी केलेल्या रचनांना ’नाट काव्य’ म्हणून संबोधिले गेले असून त्या रचना प्रेषिताचे / ईश्वराचे माहात्म्य वर्णन करण्यासाठी आहेत. (आंतरजालीय विकीपीडियावरून). या अनुरोधाने, ’आराध्याची (विठ्ठलाची) विशेषत्वाने महत्ता वर्णन करणारे अभंग’ हा अर्थ तुकोबाराया़च्या ’नाटा’च्या अभंगांना चपखल बसतो. (तुकोबारायांचा जीवनकाल विचारात घेता यावनी सत्ता असल्याने उर्दू-फारसी शब्द समाजात रूढ होते, असे म्हणता येते.) आणखी विचार करता असे लक्षात येते की, सांप्रदायिक परंपरेमध्ये ’नाट’ या शब्दाच्या विग्रहाने ’न+आट’ अशी पदे येतात. ’आट’ या पदाचे क्रियास्वरूप पाहू गेल्यास ’आटणे, जिरून जाणे, नाहिसे होणे’ असा अर्थ घेतला जातो. ’आट’ या शब्दावर एक मात्रा देऊन ’आटे’ हे रूप तयार होते. ’न आटे’ म्हणजे ’जे शाश्वत आहे, ते’. एके ठिकाणी संत सांगतात, ’शरीर आटे संपत्ती आटे । हरिनाम नाटे ते बरवे़ ॥ म्हणून ’विकल्परहित अंतिम स्वरूपाचे वर्णन’ म्हणजे ’नाटाचे अभंग’ असा अर्थ येथे अभिप्रेत दिसतो.
 नानाच्याबाबत असा एक तात्त्विक अर्थ लावला जातो की, नाम हे सगुण आहे तसेच निर्गुणही आहे. परंतु हाच नियम रूपाला, ते भगवंताचे असले तरी, लावता येत नाही. वास्तविक, अस्ति-भाति-प्रियत्व ही ब्रह्मापासून झालेली तत्त्वे आहेत. नाम आणि रूप हे मायेचे कार्य असल्याचे मानले जाते. परंतु नामाचा अंतर्भाव निर्गुणातदेखील होत असल्याने, त्याला मायाकृत नाश संभवत नाही. तुकोबारात म्हणतात, ’सगुण निर्गुण तुज म्हणे वेद । तुका म्हणे भेद नाही नामी ॥ याच अर्थाने नाम अथवा शाश्वत ज्ञान हे अनुस्यूतपणे ब्रह्मांडात भरून राहिलेले आहे. लिहिलेला शब्द पुसता येतो, पण अर्थ पुसता येत नाही. म्हणूनच उच्चारलेला शब्द अविनाशी असतो, असे शास्त्र सांगते. शाश्वत तत्वज्ञानाचा ऊहापोह नाटाच्या अभंगातून दिसून येतो, ही गोष्ट कुठल्याही अवस्थेतल्या साधकाला अनुभूतीला आल्याशिवाय राहणार नाही.

(क्रमशः)