नाटाचे अभंग (लेख दुसरा)-

जगद्गुरू तुकाराम महाराजांची अभंगगाथा
नाटाचे अभंग
(एक मुक्त चिंतन)
(लेख दुसरा)
- डॉ. पांडुरंग रामपूरकर / यशवंत जोशी

१) विठ्ठल आमचे जीवन । आगम निगमाचे स्थान । विठ्ठल सिद्धीचें साधन । विठ्ठल ध्यान विसांवा ॥१॥
 विठ्ठल कुळींचें दैवत । विठ्ठल वित्त गोत चित्त । विठ्ठल पुण्य पुरुषार्थ । आवडे मात विठ्ठलाची ॥धृ॥
 विठ्ठल विस्तारला जनीं । सप्तही पाताळें भरूनि । विठ्ठल व्यापक त्रिभुवनीं । विठ्ठल मुनिमानसीं ॥३॥
 विठ्ठल जीवाचा जिव्हाळा । विठ्ठल कृपेचा कोंवळा । विठ्ठल प्रेमाचा पुतळा । लावियेला चाळा विश्व विठ्ठ्लें ॥४॥
 विठ्ठल बाप माय चुलता । विठ्ठल भगिनी आणि भ्राता । विठ्ठलेंविण चाड नाहीं गोता । तुका म्हणे आतां नाहीं दुसरें ॥५॥
  - आपल्या आराध्याची महती वर्णन करण्यासाठी तुकोबारायांनी रचलेल्या अभंगातील हा पहिला अभंग आहे. त्यांचे आराध्य असलेले दैवत विठ्ठल सर्वार्थाने, सर्वकार्यार्थ, सर्वस्वरूपात अनन्य असल्याचे तुकोबाराय विविधांगांचा उल्लेख करीत निवेदन करीत आहेत. विठ्ठल  आमचे जीवन असल्याचे ते प्रथम सांगतात. जीवन हे दोन भागांचे असल्याचे दिसते. एक म्हणजे प्राणधारणा आणि दुसरा भाग आयुष्याचे सार्थक करण्याचा. जोपर्यंत प्राणधारणा आहे, तोपर्यंत आयुष्य आहे, जगणे आहे. पण ’आहार-निद्रा-भय-मैथु’ या चाकोरीत जगणे हे आम्हा मनुष्यांचे जीवन नाही. ज्याला जीवन म्हणायचे, त्यामध्ये जगण्याचा हेतु, गाठावयाचे साध्य किंवा ध्येयपूर्ती ही सार्थ जीवनासाठी आवश्यकपणे विचारात घ्यावी लागते. ध्येयप्राप्ती होईपर्यंत देहात प्राणधारणा राहावी, अशी महात्म्यांनाही इच्छा असते. आयुष्य ही केवळ कालमर्यादा आहे, पण जीवन ही वृत्ती आहे. तुकोबारायांची वृत्ती केवळ विठ्ठ्ल आहे. वृत्ती जोपासताना जीवनाची उभारणी विवेकाच्या आधाराने काही तत्त्वे अंगिकारून करावी लागते. तुकोबाराय त्या तत्त्वांचा उल्लेख आगम-निगम असा करतात आणि आगम निगमांचे स्थान विठ्ठ्ल असल्याचे सांगतात. निगम म्हणजे वेद आणि आगम म्हणजे वेदवचनांवर आधारित असणारी शास्त्रे-पुराणे आदी. वेद किंवा निगम हे बीजरूप असून आगम बीजातून साकारलेले वृक्षरूप आहे. ईश्वर हाच वेदपुरुष असल्याचे शास्त्रांचे सांगणे आहे. ते बीज आहे. अशी प्रमाणभूत तत्त्वांचा गाभा असलेला विठ्ठ्ल आपण अंगिकारला आहे, असे तुकोबाराय येथे सांगत आहेत. आगम निगम या शब्दांनी ’प्राप्ती’ असा अर्थही दाखविला जातो. प्रयासांचे साफल्य म्हणजेच इच्छिताची प्राप्ती किंवा सिद्धी. येथे विठ्ठल हे सिद्धीचे साधन आहे, असे तुकोबाराय सांगतात. साधन म्हटले की, गौणत्व येते. परंतु, जीवाला परमसिद्धी लाभावी, यासाठी ’आपुले ते थोरपण नारायण विसरतो’, असे संतांचे सांगणे आहे. भक्तांसाठी तो कोणतेही रूप घेत असतो. येथे हेही लक्षात घ्यायचे की, परमेश्वर हा साध्य आहे तसेच तो साधनही आहे. असेही म्हणता येते की, साधनांच्या योगे जी साधना केली जाते, त्यातून अष्टसिद्धींची प्राप्ती संभवते. (अजरामर सिद्धी, शरीराला पुष्टी देणारी गरिमा सिद्धी, आकाशगमन सिद्धी, सिद्धदर्शन सिद्धी, परकायाप्रवेश सिद्धी, दूरदर्शन सिद्धी, त्रिकालज्ञान सिद्धी आणि भूतजन्म-स्मरण सिद्धी : संख्या संकेत कोश). ही एक योगफलप्राप्ती आहे. विठ्ठल हाच अशा सिद्धींचे साधन असल्याचे तुकोबारायांचे सांगणे आहे. इथे विठ्ठल हे साधन कसे? तर साधना म्हटले की, ध्यानधारणा आलीच जे योगाचे एक अंग आहे. योगसाधन करणे म्हणजे कष्ट सहन करणे. परंतु, तुकोबारायांच्या सांगण्यातला गर्भित अर्थ असा की, विठ्ठलाचे ध्यान कष्टप्रद अजिबात नाही, तर तो जीवाला हवाहवासा वाटणारा विसावा आहे.
 पुढील चरणात तुकोबाराय त्यांनी अंगिकारलेल्या विठ्ठल या दैवताविषयी स्पष्टीकरण देतात. हे दैवत त्यांच्यासाठी नवे दैवत नाही. विठ्ठल हे त्यांचे वंशपरंपरागत चालत आलेले दैवत असल्याचे ते स्पष्ट करतात. कुळधर्म-कुळाचारात किंवा दैनंदिन पूजेअर्चेत कुलदैवताचे स्मरण अवश्य केले जाते. कौटुंबिक क्लेष असता तसेच कुटुंबात मंगल कार्य झाल्यानंतर कुलदैवताचे पूजन न विसरता करण्याचा प्रघात पाळला जातो. याचे एक कारण असे सांगण्यात येते की, आपल्या कुळात पिढ्यानुपिढ्या त्या दैवताची  आराधना करून त्या दैवताला ऋणाईत करून ठेवलेले असते. त्यामुळे केवळ स्मरणमात्रे ते दैवत सहाय्यभूत होत असते. कुळदैवताविषयीच्या भावना पुढे तुकोबाराय सांगतात की, त्यांच्या कुटुंबाच्या सुख-दु:खात ज्यांचा सहभाग असतो असे गोत म्हणजे माझ्या गोत्राचे नातेवाईक म्हणा किंवा माझ्या साधन-संपत्तीचे सहभोगी म्हणा किंवा माझे चित्त ज्यांच्यात गुंतले आहे ते असोत, म्हणजे भोग्य-भोग-भोक्ते सारे काही विठ्ठलच आहे, अन्य कुणी नाही. पुढे तुकोबाराय ’पुण्य पुरुषार्थ’ विठ्ठलच असल्याचे सांगतात. भोग म्हटले की कर्माचा विचार येतो. पुण्याचे पाठबळ दोन प्रकारांनी मिळत असते. स्वतःचे या जन्माचे कर्मफल तसेच मागील अनेक जन्मातील कर्मांचे न भोगलेले कर्मफल हा भाग मुख्य तर पूर्वजांच्या औदार्यवृत्तीचा लाभलेला वारसा म्हणजेच आपण ज्याला ’वडिलांची पुण्याई’ म्हणतो तो दुसरा भाग. शुभकर्मातून पुण्याचा साठा वाढत जातो. ही शुभ कर्मे चार प्रकारच्या पुरुषार्थासाठी - धर्म, अर्थ, काम, मोक्ष यासाठी - आचरली गेली आहेत, असे तुकोबाराय सांगत आहेत. मजेची गोष्ट अशी की, कर्माचे फळ मिळते खरे, पण ते कर्मफळ देण्याचे सामर्थ्य कर्माकडे असत नाही. याकरिताच ’ईश्वरेच्छा बलीयसी’ असे म्हटले जाते. म्हणून तुकोबारायांना असे सांगावयाचे आहे की, शुभकर्मफलांचा कर्ता-धर्ता-दाताऱ्हर्ता एक विठ्ठलच असून विठ्ठलाचे हे अलौकिकत्व त्यांच्या मनाला सुखविणारे, सुख-शांती-समाधान देणारे आहे  
 जीवाला खरे सुख-शांती-समाधान मुक्तहस्ते वाटण्यासाठी विठ्ठल स्थलसापेक्ष राहात नसल्याचे तुकोबारायांना सांगावयाचे आहे. हा विठ्ठ्ल केवळ त्यांच्या जीवनापुरता मर्यादित नसून तो (मृत्युलोकातील) सार्‍या जनात विस्तारलेला आहे. एव्हढेच नव्हे तर, सात पाताळालेही त्यानेच व्यापलेली आहेत. जशी सात पाताळे आहेत, त्याचप्रमाणे सात स्वर्गही असल्याचे शास्त्र सांगते. तथापि, इथे तुकोबाराय स्वर्गाचा उल्लेख स्पष्टपणे करीत नाहीत. स्वर्ग सुखलोलुप जीवांसाठी हवाहवासा वाटणारा आहे आणि दुसरा भाग असा की, संचित सुखभोग भोगून संपले की जीवाला पुन्हा मृत्युलोकात यावे लागते. स्वर्गाचे सुखोपभोग उपभोगत असताना ईश्वरप्राप्तीची इच्छा होत नाही. असेही सांगितले जाते की, ईश्वरप्राप्ती हवी असेल तर तो पुरुषार्थ मनुष्ययोनीतच साधता येतो. म्हणून स्वर्ग गौण ठरतो. तुकोबाराय स्पष्ट करतात की, जीवाला सुख-शांती-समाधान देण्याचे त्याच्या आवडीचे कार्य करण्यासाठी विठ्ठल स्वर्ग-मृत्यु-पाताल ही त्रिभुवने व्यापून तो पाताळात भरून उरला आणि पृथ्वीलोकी तो विस्तारला. विठ्ठलाचे हे अलौकिकत्व जाणूनच त्याची प्राप्ती व्हावी, हेच मानस मुनिजन मनात बाळगतात आणि अखंड मनन-चिंतन-साधनेत मग्न रहात असतात. मुनि म्ह्टले की प्रथम आठवतात ते अखंड ’नारायण नारायण’ गान करणारे, भक्तीसाम्राज्याचे अध्वर्यु नारदमुनी. त्यांच्या मनी-मानसी नारायणाशिवाय म्हणजेच विठ्ठलाशिवाय अन्य कुणालाही स्थान नसल्याचा दाखलाही तुकोबाराय देत आहेत.
 सुख-शांती-समाधान वाटण्यासाठी आसुसलेल्या विठ्ठलाचे अंतःकरण कसे आहे, ते पुढे तुकोबाराय वर्णन करतात. जीवासाठी त्याच्या अंतःकरणात अमर्याद जिव्हाळा आहे. सुख-शांती-समाधानाचा तो अखंड स्त्रोत आहे. जीव हा त्याचाच अंश असल्याने त्याच्या अंतःकरणात जीवाविषयी माया-ममता भरलेली आहे. जीवाची नित्य काळजी वाहणे हा त्याचा स्वभावच आहे. असा हा विठ्ठल कृपेचा कोंवळा म्हणजे रसरसलेला आणि प्रेमाचा पुतळा म्हणजे मूर्तीमंत प्रेम असल्याचे तुकोबाराय सांगतात. कोवळेपणात आकर्षून घेण्याचे सामर्थ्य असते. आर्त जीव भगवंताकडे म्हणूनच आकर्षिला जातो. कृपा करणे हा त्याचा स्वाभाविक गुण असला तरी कधी कधी तो न्यायनिष्ठुर झाल्याची उदाहरणे देता येतीलही. परंतु ज्याप्रमाणे आईने मुलाला ताडन करावे, तसे करतो व त्यातून जीवाचे परमकल्याण साधून देतो. प्रेम हे निरपेक्ष असते. तेथे परतफेडीची अपेक्षा नाही. प्रेमालाच भक्ती म्हटले जाते, ते याचमुळे. विठ्ठल भक्तांचा भक्त आहे. विठ्ठलाच्या या गुणांमुळे सार्‍या विश्वाला त्याने वेड लावले आहे. कृपा-प्रेम वाटीत तो सार्‍या विश्वाचा व्यवहार, विश्वाचे पाळण करीत राहतो. त्याच्या सगुणत्व-स्वीकाराची ही त्याला सार्थकता वाटते.
 विठ्ठलाचे भक्तांविषयीचे आसुसलेपण तुकोबारायांना उमगले आणि कृपा-प्रेम-ममता यांचा अखंड, निरपेक्ष स्त्रोत असलेल्या विठ्ठलाविषयी त्यांच्या मनात अनन्यभाव जागृत झाला. त्यांना त्यांच्या मनात जवळच्या नात्यातील लोकांकडून मिळणार्‍या मर्यादित कृपा-प्रेमामागच्या अपेक्षा आठवल्या. त्यांच्याबद्दल मग तुकोबांच्या मनात असलेली आपुलकी गौण झाली. आई-बाप, काका-काकू, बहिणी-भाऊ हे सारे कामापुरतेच आहेत, हे त्यांनी जाणले. ती जागा आता विठ्ठलाने घेतली. नात्यागोत्यातल्या किंवा अन्य कुणाविषयीची मनातली आवड संपल्याचे तुकोबाराय सांगतात आणि आता विठ्ठलाशिवाय अन्य कुणाचे अवलंबन करणे नाही, असा निर्धार या अभंगाच्या शेवटी ते प्रकट करतात. इतरांनीही यातून बोध घ्यावा, असे तुकोबारायांना इथे अप्रत्यक्षपणे सांगावयाचे आहे.
(क्रमशः... 3)