तहान, भूक भोवती, मजेत मी गिळू कसा?

तरही गझल
तहान, भूक भोवती, मजेत मी गिळू कसा?
(जगात दु:ख एवढे, सुखात मी जगू कसा?)भूषण कटककरांची ओळ

दुभंगली धरा पुरी, तशात व्योम फाटले....
धरेस शांतवू कसा? नभास या शिवू कसा?

कसाबसाच कोंडला समुद्र लोचनांत मी!
कळे न लोचने तुझी जगा अता पुसू कसा?

अजून जीवनामधे, मुले उभी न राहिली;
अजून कर्जदार मी, मधेच मी थकू कसा?

उठाबशाच काढल्या तमाम यौवनामधे!
उतार या वयामधे, उठू कसा? बसू कसा?

न पाहिले... मला कधी, कुणी कुणी लुबाडले;
भिडस्त मी मुळामधे, कुणास ना म्हणू कसा?

इथेच जन्म घेतला, इथेच वृद्ध जाहलो!
अजून प्रश्न की, इथे रुळू कसा? रुजू कसा?

असाच सैल सैल मी, असाच सैरभैर मी!
विखूरल्या स्वत:स मी, स्वत:च आवरू कसा!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१