मी मनःशांती अशी हरवू कशाला?

गझल
मी मन:शांती अशी हरवू कशाला?
तोतयांचे चोचले पुरवू कशाला?

चार चिंध्या या यशाच्या, कनवटीला!
तीच ती झालर पुन्हा मिरवू कशाला?

जे मला घातक, कशाला ते करू मी?
ओल रागाची उरी मुरवू कशाला?

शायरीने माझिया ओथंबलो मी!
मी कुणाची शायरी गिरवू कशाला?

प्रीय मजला भाकरी, चटणीच घरची!
फुकटचे मिष्टान्न मी जिरवू कशाला?

जाणते दुनिया, मलाही ज्ञात आहे....
मोल माझे काय, मी ठरवू कशाला?

आतला आवाज माझा ऐकतो मी!
कौल हा माझाच मी फिरवू कशाला?

घेउनी पाऊस आले मेघ दारी....
होउनी वारा तयां विरवू कशाला?

सारखी आक्रंदते प्रत्येक पेशी.....
मागते मुक्ती, तिला झुरवू कशाला?

लागते भांडू स्वत:चे मन स्वत:शी!
ही स्मृतीसंमेलने भरवू कशाला?

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१