जगद्गुरू तुकाराम महाराजांची अभंगगाथा... नाटाचे अभंग... भाग ४

जगद्गुरू तुकाराम महाराजांची अभंगगाथा
नाटाचे अभंग... ४
(एक मुक्त चिंतन)
- डॉ. पांडुरंग रामपूरकर / यशवंत जोशी

३)    मी तंव अनंत अपराधी । कर्महीन मतिमंदबुद्धि ।  तुज म्यां आठविलें नाहीं कधीं । वाचे कृपानिधि मायबापा ॥१॥
          नाहीं ऐकिलें गाइलें गीत । धरिली लाज सांडिलें हीत ।  नावडे पुराण बैसले संत । केली बहुत परनिंदा ॥२॥
          नाहीं केला करविला परोपकार । नाहीं दया आली पीडितां पर ।  करूं नये तो केला व्यापार । वाहिला भार कुटुंबाचा ॥३॥
          नाहीं केलें तीर्थाचें भ्रमण । पाळिला पिंड कर चरण ।  नाहीं संतसेवा घडलें दान । पूजावलोकन मूर्तीचें ॥४॥
          असंगसंग घडले अन्याय । बहुत अधर्म उपाय ।  न कळे हित करावें तें काय । नये बोलूं आठवूं तें ॥५॥
          आप आपण्या घातकर । शत्रु झालों मी दावेदार ।  तूं तंव कृपेचा सागर । उतरी पार तुका म्हणे ॥६॥ 

 - भगवंताचे थोरपण वर्णन करणार्‍या नाटाच्या या अभंगात तुकोबाराय सामान्य मनुष्याचे प्रतिनिधित्व करून नमूद करतात की, वेगवेगळ्या प्रकारची अपकृत्ये किंवा अपराध जरी केले असले तरी भगवंत अशा माणसालाही जवळ करून त्याचे कल्याण साधून देत असतो. तुकोबाराय येथे एकामागून एक जवळजवळ चोवीस अपकृत्ये-अपराधांचा उल्लेख करतात आणि शेवटी कृपेचा सागर असलेल्या भगवंताला विनवतात की, त्याने आता दूर न राहता सर्व अपकृत्यांवर पांघरूण घालावे.
 एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की, तुकोबारायांच्या पारमार्थिक जीवनाची सुरुवात प्रत्यक्षतः सुरु झाली, तेव्हा त्यांचे वय जेमतेम विशीच्या पुढे गेलेले होते. त्यांच्यावर झालेले संस्कार त्यांना अशा प्रकारचे अपराध करण्याची बुद्धी होऊ देणारे नव्हते. ते साधारण चोवीस वयाचे असतानाच त्यांना विठ्ठल-दर्शन झालेले आहे. एकंदरीत पाहता असे म्हणता येते की, मुमुक्षुत्व मनात उपजलेल्या व्यक्ती स्वतःचा कार्पण्य भाव प्रकट करताना माणसाकडून काया-वाचा-मने जी काही अपकृत्ये घडली जातात, ती जाणता-अजाणता, या जन्मी नाही तरी पूर्वजन्मी, आपल्याकडून जणू घडली आहेत, असे समजून आराध्यासमोर कबुली देतात आणि करुणा भाकतात. पूजन समारोपाच्या मंत्रात अशा अर्थाचे श्लोक म्हटले जातातही... कायेन वाचा मनसेंद्रियै वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् । करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि ॥ अथवा, कर-चरण कृतं वाक्कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वाऽपराधम् । विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शंभो ॥ (हे एक प्रकारचे जाहीर ’कन्फेशन’ आहे.) यातून निष्कर्ष असा निघतो की, तुकोबारायांनी भामगिरीवर एकांतात जो विठ्ठलाचा धावा प्राणपणाने सुरु केला होता, त्या अवस्थेत त्यांनी केलेले हे उपरतीचे निवेदन आहे. असे वाटते की, रोज रात्री दैनिक व्यवहारातून निवृत्त होऊन झोपण्यापूर्वी मनोमन या ’कन्फेशन्’द्वारे आपले मन निर्मल करून घ्यावे व मग शांतपणे निद्रेच्या अधिन व्हावे.
 ईश्वरप्राप्तीच्या मार्गात तीन गोष्टींना प्राधान्य दिले जाते. मनुष्यत्व, महापुरुषसंश्रय (सत्संगती) आणि मुमुक्षत्व (ईश्वरभेटीची आस) या त्या तीन गोष्टी असल्याचे शास्त्र सांगते. यातील मनुष्यत्व लाभणे ही जीवाच्या उत्क्रांतीतील शेवटची पायरी होय. परंतु जीव मनुष्यजन्म स्वसामर्थ्याने प्राप्त करून घेऊ शकत नाही. तसा जन्म लाभणे हे ईश्वरी दान असल्याचे संतांचे सांगणे आहे (जेणें हा जीव दिला दान । तयाचें करीन चिंतन ॥). महापुरुषसंश्रयाबाबतही तसेच आहे. त्यासाठीही ईश्वरीकृपा असावी लागते. ईश्वराला पूर्ण समर्पित असल्याने स्वतःच्या महापुरुषत्वाविषयी त्या व्यक्ती अजाण असतात. परंतु, अशा महापुरुषांच्या संगतीचा परिणाम अमोघ असतो व केवळ त्यांच्या संगामुळे अनधिकारी मनुष्यसुद्धा उद्धारासाठी पात्र होतो. यातील मजा अशी की, जो घडला तो सत्संग होता, किंवा जो परिणाम झाला तो सत्संगामुळे झाला, हे साधकाला प्रसंगी समजतही नाही. मनुष्य जन्म लाभल्यानंतर त्याच जन्मी आत्मोद्धाराची प्रेरणा मिळेल, असेही नाही. ’क्रिया तेथे प्रतिक्रिया’ किंवा ’कर्मसिद्धांता’नुसार जे संचित जमा होणार असते, ते मनुष्याच्या पतनाचे वा उद्धाराचे प्रमुख कारण असते.
 असो. इथे प्रथम हे लक्षात घ्यायचे आहे की, तुकोबारायांचे निवेदन प्रातिनिधिक स्वरूपाचे आहे. ते प्रारंभी आराध्यासमोर कार्पण्यभावाने निवेदन करतात की, ’मी’ (अर्थात् साधक) तुझा (देवाचा) अनंत अपराधी आहे.’ विधिनिषेधांचा विचार न करता केलेल्या कर्मांचा पाढा ते पुढे वाचतात - ’माझ्याकडून हीन कर्मे आचरली गेली आहेत (कारण) विवेक धारण करणारी माझी मती आणि कर्मांना कारण होणारी बुद्धी, जी मनाला शरण जाणारी आहे ती, मंद किंवा सामर्थ्यहीन आहे. मी देवाचे कधी स्मरण केलेले नाही की कधी वाचेने नामही घेतलेले नाही, ज्यायोगे अप्रत्यक्षतः अंतःकरणावर सात्विक संस्कार होणे शक्य झाले असते. माझे हे अपराध, देवा, तू मायबापाच्या वात्सल्याने नजरेआड करून माझ्यावर कृपा करावीस्. तुझी गीते कितीही रसाळ असोत्, मी कधी ऐकिली नाहीत. तसे करण्याची मला लाज वाटत होती. त्यामुळे मी माझ्या हितापासून स्वतःला वंचित करून घेतले आहे. मी स्वतः पुराणांचे कधी श्रवण केले नाही कारण मला ते आवडत नव्हते. एव्हढेच नव्हे, जे संत पुराणे ऐकवित होते किंवा त्यांचे प्रवचनादी ऐकण्यासाठी जे बसत होते, त्यांची तसेच इतरेजनांची मी अतिशय निंदा केली. मी केवळ माझा लौकिक स्वार्थ जोपासत राहिलो आणि कधी परोपकार केला नाही किंवा कुणाकडून करवून घेतला नाही. निर्बलांना पीडा देताना मी कुणाला दया दाखविली नाही, जे करू नये ते उद्योग केले, जे केवळ त्यांच्या प्रापंचिक स्वार्थासाठीच माझे कुटुंबिय म्हणून जोडले गेले होते, त्यांचाच भार वाहत राहिलो. कधी तीर्थक्षेत्री गेलो नाही, कर-चरणादी अवयवांचा यथार्थ उपयोग लक्षात न घेता मातीमोल होणारा हा पिंड मात्र पोसत राहिलो. कधी संतसेवा केली नाही की  कधी दानधर्माचा विचार माझ्या मनाला शिवला नाही, देवाच्या मूर्तींचे साधे दर्शन मी कधी घेतले नाही, मग माझ्याकडून पूजा-उपासना केली जाण्याचा प्रश्नच नव्हता. ज्यांचा संग करू नये, त्यांचा संग केला. त्यातून अनेक अन्याय माझ्याकडून केले गेले. फार अधर्माचे आचरण मी केले, भलतेसलते उपाय करीत राहिलो. स्वतःचे हित कशात आहे याचा विचारही कधी केला नाही. काय करावे नि काय करू नये ते पाहिले नाही, जे केले ते बोलण्यासारखेच काय मनात आणण्यासारखेही नाही. मीच माझा घात करीत आलो, मीच माझा शत्रू बनलो आणि स्वतःचे नुकसान करून घेत राहिलो. माझ्या कृतकर्मांचे किती पाढे मी वाचू? देवा, तू कृपेचा सागर आहेस्. माझे सारे अपराध पोटात घेऊन देवा, आता माझ्यापासून दूर न राहता मला या पापांतून बाहेर काढ.’
           पारमार्थिक वाटचालीसाठी वर उल्लेख केलेल्या दोन गोष्टी, मनुष्यत्व आणि महापुरुषसंश्रय, जीवाच्या अधिकारात नसल्या तरी मुमुक्षुत्व मात्र सर्वांना सहजपणे प्राप्त करून घेण्यासारखे आहे. मुमुक्षुत्व म्हणजे मोक्षाची आत्यंतिक इच्छा असणे. परंतु, ईश्वराची प्राप्ती हा त्यापेक्षाही श्रेष्ठ भाग असल्याचे संतांचे सांगणे आहे. आई आणि बालक हे हवेहवेसे वाटणारे दोघांच्याही सुखाचे जे नाते आहे, तसेच देव आणि भक्त हे नाते आहे. जन्मोजन्मी त्याच नात्याची इच्छा संत करतात. अशा मुमुक्षुत्वाचा पाया असलेले विधि-निषेधात्मक आचरणाचे विवरण तुकोबाराय या अभंगाद्वारे देत आहेत. एक गोष्ट इथे लक्षात येते ती अशी की, अहंकार गळाल्याशिवाय शरणागतीला अर्थ नाही. यथार्थ पश्चात्ताप झाल्याशिवाय हृदयात कार्पण्यभाव जागा होत नसतो. कार्पण्यभावाशिवाय शरणागती नाही. शरणागतीशिवाय समर्थाकडून स्वीकाराची खात्री नाही.

(क्रमशः) 

संपर्क : (डॉ. रामपूरकर : ०९८२०३७६१७५)