नव्हते मनामध्ये तरी, मज हे करावे लागले!

गझल
वृत्त: मंदाकिनी
लगावली: गागालगा/गागालगा/गागालगा/गागालगा

नव्हते मनामध्ये तरी, मज हे करावे लागले!
हे हात जोडावे....कधी पाया पडावे लागले!!

नांदायला लोकांमधे, हेही करावे लागले.....
पाणावले डोळे तरी, खोटे हसावे लागले!

न्यायालयामध्ये किती मी हेलपाटे घातले!
जो हक्क होता न्याय्य, त्यालाही मुकावे लागले!!

ते सोंग झोपेचेच होते, तोतयांनी घेतले!
त्यांच्याचसाठी रक्त निम्मे आटवावे लागले!!

ते लोक भरती तुंबड्या, ना भूक ज्यांना माहिती!
होते उपाशी जे खरे, त्यांना झुरावे लागले!!

या दगदगीमध्ये कुठे, फुरसत रडायाला तरी?
एकांत जेव्हा लाभला, तेव्हा रडावे लागले!

मी सोसले धक्के किती? अंदाज नाही यायचा!
हृदयातल्या जखमांस माझ्या भळभळावे लागले!!

मंचावरी कित्येक वर्षांनी उभा मी गायला!
प्रत्येक मैफीलीमधे मजला टळावे लागले!!

कोणास होता वेळ, दुनियेची पुसाया लोचने?
त्या आसवांना जागच्याजागी सुकावे लागले!

इतकीच इच्छा की, न येवो वेळ ही कोणावरी....
भावात मातीच्या मला सोने विकावे लागले!

मृत्यू कधीचा दार ठोठावून गेला कैकदा...
छायेमधे आजन्म त्याच्या, मज जगावे लागले!

काखेत कळसा आणि गावाला जसा वळसा तसे..
तू आत माझ्या अन् तुझ्यासाठी फिरावे लागले!

राशीत वायूतत्व माझ्या, भिंगरी पायामधे!
येईल वारा त्याप्रमाणे भिरभिरावे लागले!!

वैराण माळावर पहा...नंदनवने फुलली किती!
मज मात्र पाणी रोज रक्ताचे करावे लागले!!

पायांमधे या पांगळ्या, सामर्थ्य पंखांसारखे!
जिद्दीपुढे माझ्या नभालाही झुकावे लागले!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
    फोन नंबर: ९८२२७८४९६१