गझल
वृत्त: व्योमगंगा
लगावली: गालगागा/गालगागा/गालगागा/गालगागा
हातही देशील तू पण, तेवढाही धीर नाही!
दु:ख बेतानेच दे, मी एवढा खंबीर नाही!!
बोध नित्यानेच घ्यावा, मी कुठे इतका शहाणा?
त्याच त्या करतो चुका, मी जीवना, गंभीर नाही!
शक्यतोवर पाठमोरा मी कुठेही होत नाही;
विंधण्या निधड्या उराला, एकही खंजीर नाही!
दिलखुशीने सोसले विश्वासघाताचेच धक्के!
हेच आहे दु:ख की, कोणीच का दिलगीर नाही!!
तू नको पाहूस दुनिये, अंत माझ्या सोसण्याचा....
मी न साधू, संत कोणी वा कुणीही पीर नाही!
वाचतो, अभ्यासतो, जगतो जरी गीता, तरीही.....
मी धनुर्धारी असा, भात्यात ज्याच्या तीर नाही!
मी दिले हातात लाटांच्या सुकाणू शेवटाला....
पोचणे तर दूर....अजुनी पाहिलाही तीर नाही!
एक भट पचवीत आहे, अन् गझल शिकतोच आहे!
वाचला गालीब नाही, वाचला मी मीर नाही!!
पाहिजे होतेच तोंडी लावण्यासाठीच काही!
चोंचले मजला तरी झालीच कोशिंबीर नाही!!
ही गझल माझी मराठीच्या दुधावर पोसलेली!
पर्शियन, उर्दू अशा, ती शेवयांची खीर नाही!!
ही पशूवत दांडगाई, दांडक्याने संपते का?
द्यायला तोंडी पशूंच्या, मी कुणी अंजीर नाही!
कैक हौशी शायरांची काय ही खोगीरभरती!
मी मला लादू कशाला? मी कुणी खोगीर नाही!!
माणसे वाचू कशी मी? चेहरे हे झाकलेले!
ही धडे दिसतात नुसती, मात्र त्यांना शीर नाही!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१