गझल
वृत्त: मृगाक्षी
लगावली: लगागागा/लगागागा/लगागा
तुझे हे वागणे आहे चुकीचे!
चुका नाकारणे आहे चुकीचे!!
तुझा हा कैफ गझलांचा खरा, पण....
स्वत:ला लादणे आहे चुकीचे!
असे बसतात मग डोक्यावरी ते....
कुणा गोंजारणे आहे चुकीचे!
जरा बघ आरशामध्ये स्वत:ला....
असे पिंजारणे आहे चुकीचे!
कुणीही कौतुके करणार नाही!
उगा रागावणे आहे चुकीचे!!
अरे, मैफील केव्हाचीच सरली!
अता रेंगाळणे आहे चुकीचे!!
पुढे मागे न बघणे वागताना.....
अता पस्तावणे आहे चुकीचे!
शिकवताना फलकलेखन करावे!
खडूने माखणे आहे चुकीचे!!
मजा घेणे महत्वाचे पिताना....
परंतू झिंगणे आहे चुकीचे!
तसे दारू पिणे वाईट नाही!
तिला सोकावणे आहे चुकीचे!!
नसे माहीत तर, नाही म्हणावे!
कुणा गुंडाळणे आहे चुकीचे!!
सबूरी पाहिजे....घाई चुकीची!
तगादा लावणे आहे चुकीचे!!
उशीरा झोपणाऱ्याला कळावे....
सकाळी झोपणे आहे चुकीचे!
नसे जर शक्य तर सांगून टाका.....
कुणाला झुलवणे आहे चुकीचे!
स्तुती जी रास्त आहे ती करावी!
कुणा ओवाळणे आहे चुकीचे!!
पसंती, नापसंती गैर नाही!
कुणा हेटाळणे आहे चुकीचे!!
लळा हा विस्तवाचा ठीक नाही!
निखारे वेचणे आहे चुकीचे!!
असो ते दु:ख वा सुख...लांब ठेवा!
उरी कवटाळणे आहे चुकीचे!!
जरा थट्टा, टवाळी ठीक आहे!
परंतू मातणे आहे चुकीचे!!
कधी का मागुनी सन्मान मिळतो?
तसेही मागणे आहे चुकीचे!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१