वेड्यांचे प्रेम

                              आज त्याला त्याची सखी आणखीच सुंदर दिसत होती. तिने लावलेलं ते मंद परफ्यूम, पाणीदार डोळे, मानेवर रुळणारे मोकळे केस आणि त्यात त्याने दिलेला तो जांभळा रंगाचा चुडीदार तिच्या गोऱ्या कमनीय बांध्यावर आणखी उठून दिसत होता. त्याला कारणही तसंच होतं, लग्नानंतर ते आज दुसऱ्यांदा महाबळेश्वरला जात होते. पहिल्यांदा गेले तेव्हा दोघेही एकमेकांना नवीन होते, या वेळी मात्र तसं नव्हतं. काही महिन्यांच्या सहवासातून थोडं का होईना ते एकमेकांना ओळखू लागले होते, एकमेकांच्या स्वभाव समजू लागले होते, एकमेकांच्या जवळ आले होते.
                              संध्याकाळी ट्रव्हल्स वाल्यांनी सांगितलेल्या ठिकाणी पोहचून ते बस येण्याची ची वाट बघत होते. काही वेळात बस आली तसे एक-एक करून प्रवासी बसमध्ये चढू लागले. सखीला पुढे करून तोही मागोमाग बस मध्ये चढला. सीटच्या रांगेतून जाताना सहज त्याचे लक्ष खिडकीजवळ बसलेल्या एका तरुणीकडे गेले. सोबत बसलेल्या पुरुषाच्या खांद्यावर तिने आपले डोकं ठेवलं होतं आणि बाहेरून येणाऱ्या अंधुक प्रकाशात तिचा पुसटसा चेहरा दिसत होता. काही क्षणांसाठी तो स्तब्ध झाला पण सखीने दिलेल्या आवाजाने तो भानावर आला व तिच्या सोबत जाऊन बसला. सर्व प्रवासी आपापल्या सीटवर व्यवस्थित बसले व बस सुरू झाली.
                              शहरातून बाहेर पडून बस आता हायवे लागली तोपार्येंत बरेच प्रवासी निद्रिस्त झाले होते. त्याची सखीही त्याचा हात हातात घेऊन व आपले डोके त्याच्या खांद्यावर ठेवून बाहेर बघत होती व आपल्या भावी आयुष्यातील आनंदी स्वप्नांना रंगवत होती. तो मात्र परत त्या तरुणीचा विचार करू लागला. विचार करता करता त्याच्या ओठांवर मंद हास्य उमटले आणि तो आणखीच आपल्या भूतकाळात शिरत जातो.
वेडा - तुला आज उशीर झाला निघायला ?
वेडी - जास्त काही उशीर नाही झाला. आणि तुला कसा माहीत ?
वेडा - हमारे जासूस कोने-कोने मी फैले हूए है... हा हा हा हा हा
वेडी - शक्यच नाही. तू नुसते अंदाजाने सांगतोयस. सांग बरं आता मी कुठे आहे ते ?
(फोन मधून येणाऱ्या रिक्षा सुरू होण्याचा आवाज ओळखून.)
वेडा - आत्ता तू रिक्षात बसली आहेस.
वेडी - ते तर कोणीही सांगेल रिक्षाच्या आवाजावरून. सांग बरं मी रिक्षात कुठे बसली आहे ?
वेडा - तू लेफ्ट साइड ला बसली आहेस.
(आश्चर्यचकित होऊन वेडी चालत्या रिक्षातून बाहेर डोकावून मागे पाहते पण तिला वेडा कुठेच दिसत नाही.) 
वेडी - तू इथे आलायस ? कुठे आहेस तू ?
वेडा - हा हा हा हा हा हा हा....
वेडी - चल. मला माहीत आहे तू इथे नाहीस ते.
वेडा - अगं मी तिथेच आहे तुझ्या मागे.
(वेडी पुन्हा बाहेर डोकावून पाहते)
वेडी - नाही तू इथे नाहीस. तू तुझ्या घरीच आहेस. मला माहीत आहे.
वेडा (मिश्किल हसत) - अगं खरंच मी तुझ्या मागेच आहे.
वेडी - अच्छा. तर सांग बरं मी कोणता रंगाचा ड्रेस घातलाय ते ?
वेडा - तू लाल आणि हिरव्या रंगाचा ड्रेस घातलाय.
(आता मात्र वेडीला खरंच वाटू लागतं की वेडा तिच्या रिक्षाच्या मागे आहे)
वेडी - तू खरंच मागे आहेस का ?
वेडा (मोठ्याने हसत) - अगं वेडी तू खरंच वेडी आहेस. हा हा हा हा हा हा....
वेडी - वाटलेलंच मला तू खोटं बोलतोयस ते.
वेडा - जरी मी तिथे नसलो तरी... हमारे जासूस कोने-कोने मी फैले हूए है.... हा हा हा हा हा...
वेडी - अं हँ हँ !  म्हणे जासूस फैले हूए है. सगळे नुसते अंदाज बांधत असतोस.
                               वेडा आणि वेडीची ओळख व्यक्तीला शहाणपण शिकवणाऱ्या प्रशिक्षणा दरम्यान झाली होती. मुळात वेडा हा स्वतःत रमणारा शांत असणारा असा, पण हे प्रशिक्षण घ्यायच्या आधी त्याने स्वतःशीच ठरवलेलं की ह्या प्रशिक्षणा दरम्यान तो स्वतःचं एक बोलकं व प्रभावी व्यक्तिमत्त्व बनवणार आणि तसा तो बिनधास्तपणे वागतही होता.
                              प्रशिक्षणात दोघांची ओळख झाली व संवाद सुरू झाला. वेडा वेडीकडे आकर्षित झालेला पण प्रशिक्षणा दरम्यान काहीही करायचा नाही असं त्याने ठरवलेलं होतं. प्रशिक्षणा नंतर काही दिवसांनी वेडीचा वाढदिवस होता तेव्हा वेडी ने वेड्याला भेटायला बोलावले. आधी वेड्याने होकार दिला पण भेटीच्या दिवशी तो तिला नको भेटूया असं सांगू लागला कारण असं मुलीला कधी एकटा भेटला नव्हता तो आणि त्याला त्याची भीती वाटत होती. पण वेडी ने त्याला समजावून भेटण्यास भाग पाडलेच.
त्या भेटीचा परिणाम असा झाला की दोघेही एकमेकांकडे अधिक आकर्षिले गेले. त्यांचे बोलणे वाढू लागले. न बोलता न सांगता ते एकमेकांना प्रियकर-प्रियसी सारखे वागवू लागले. वेड्याला वेडीचा असलेला किंचितसा अल्लडपणा, तिच्या कपाळावर रुळणाऱ्या बारीक केसांची ती लकेर, हसताना बोलताना तिच्या त्या सुंदर दातांच्या पंक्तीतून किंचितसा वर आलेला तिचा तो एक दात, भारतीय परिधानांसोबत कपाळावर लावलेली ती बारीकशी टिकली, अश्या कितीतरी गोष्टी आवडायच्या.
                              वेड्याला वेडी खूप आवडायची पण त्याच्या हेही लक्षात आलं की त्या दोघांच्यात ८ वर्षांचा अंतर होतं व ते दोघेही भिन्न जातीचे असल्यामुळे घरून विरोध होणे स्वाभाविक होते. तसेही वेड्याच्या घरी त्याच्यासाठी स्थळ शोधण्याचं चालू होतं आणि वेडीलाही अजून खूप शिकायचे होते. ह्या सर्व विचारमंथनामुळे वेड्याने ठरवलं होतं की ह्या नात्यात अधिक गुंतायचं नाही आणि त्यामुळे इच्छा असूनी तो परत तिला भेटत नव्हता.
                              त्यांचे बोलणे चालूच होते आणि दोघेही एकमेकांत अधिक गुंतू लागले. वेड्याला वाटले कुठेतरी हे थांबले पाहिजे आणि त्याने वेडीला भेटून आपल्यामानातील गोंधळ सांगायचे ठरवले. वेड्याने तिला भेटायला बोलावले. तशी ही त्यांची दुसरीच भेट असणार होती पण आता दोघेही एकमेकांना बऱ्यापैकी ओळखायला लागले होते.
                              एरोस थेटर जवळ दोघेही भेटले. मग दोघेही आईनोक्स नरिमनपाँईंटला चित्रपट पाहायला गेले. चित्रपटा दरम्यान त्याने पहिल्यांदा तिचा हात आपल्या हातात घेतला. चित्रपट पाहिल्यानंतर नंतर दोघेही क्वीन्स नेकलेस अर्थात मारीन ड्राईववर फिरायला गेले. दोघेही गप्प होते. वेडीलाही एव्हाना काहीतरी बरे नसल्याचा अंदाज आला होता म्हणून तिनेच बोलणे सुरू केले.
वेडी - काय झालं इतका गप्पा का आहेस ?
वेडा (आपल्या मनातील वादळाला शांत करण्याच्या प्रयत्नात) - हम्म. अगं काही नाही, असच.
(वेडी वेड्याला थांबवते व त्याच्या समोर उभी राहून त्याच्या डोळ्यात पाहून विचारते)
वेडी - कसं काही नाही म्हणतोस ? तू नेहमी इतका गप्प नसतोस आणि मी काही दिवसांपासून पाहतेय तू पहिले सारखा मोकळेपणाने बोलतही हीस.
वेडा (दुसरीकडे बघत) - अगं खरंच काही नाही.
वेडी त्याचा चेहरा आपल्याकडे करते तर त्याचे डोळे पाणावलेले दिसतात.
वेडी (भावनिक होऊन) - काय झालं मला सांग ना.
                              वेड्याला कळेना आपल्या मनातील उठणाऱ्या काहुरं कसे मांडावे कुठून सुरू करावे. शेवटी कसेतरी त्याने आपले विचार वेडी समोर मांडले. वेडी रडू लागली, तिला कळेना नेमकं काय चुकलं ते. भावनांचा वेग शमू लागल्यावर वेड्याने तिला पुढे ना भेटण्याचं वर हळूऱ्हळू संभाषणही कमी करण्याचं समजवलं.
दोघांनाही एकमेकांना सोडून जवसं वाटेना. तरीही जाता जाता एक आठवण म्हणून आपल्या मनातील भावना वेड्याने एक गीत गाऊन प्रकट केली.
तेरी निगाहों के तेरी ही राहों के
करीब सें गई झिंदगी ,
तुझे क्यूं देखा ना तुझे क्यूं जाना ना 
शिकायतें करू या नही,
थमी हैं ये सांसे भरी हैं ये आंखे 
सहू कैसे अब ये फसला, 

बिन तेरे बिन तेरे.... 
कोई खलिश हैं हवाओं मै बिन तेरे....
                              सखीने त्याचा हात सोडल्यामुळे त्याची विचारांची तंद्री तुटली. घाटात वाढलेल्या थंडीमुळे सखीने शाल काढली आणि स्वतःभोवती घेऊन ती त्याला बिलगली. त्याने देखील आपला हात सखी भोवती घेऊन तिला आपल्या कुशीत घेतले व तिच्या गालावर हलकेसे चुंबन दिले. वेडीला तिचा जोडीदार भेटल्याचा आनंद व समाधान वेड्याला झाले होते व तोही आपल्या सखीसोबत संसारात आनंदी होता.
त्या दोघा वेड्यांना पाहिल्यावर वाटते प्रेम म्हणजे नुसते मिळवणे नाही तर एकमेकांना समजून त्यांच्या आनंदात आपणही आनंदी होण्यात असते.
- एक प्रेमवेडा