रक्त आटते जनतेचे

रक्त आटते जनतेचे
रक्त आटते जनतेचे, देश सुंदर घडवायला
एकटा रावण पुरेसा, राज्य धुळीत मिळवायला
जे हुजरे पाळलेस तू, सर्व खाण्याचे पाईक
ढेकर देणे झाले की, ते बघतील सटकायला
सारे काही सवलतीत; धान्य, इंधन, साखर, तेल
कोण तयार होईल मग, इथे हाडे झिजवायला
निघून गेलेत शहाणे, सर्व ’साहेब’ बनायला
मूर्ख आम्ही उरलो इथे, मोफत अन्न पिकवायला
टाळले होते फुलांनी, आयुष्यभर भेटायचे
आज मात्र सडा पडलाय, मस्त तिरडी सजवायला
दार गेले, धुरा गेला अन कर्जापायी कुंकू
दोन्ही हात उरले मात्र, दररोज उर बडवायला
किती सीता पळवायच्या, तुम्ही लागा पळवायला
श्री बजरंग येत आहे, 'अभय' लंका तुडवायला
                                                   - गंगाधर मुटे
------------------------------------------