सोसतो मी दाह माझे, ताव माझे!

गझल
वृत्त:मंजुघोषा
लगावली: गालगागा/गालगागा/गालगागा
*****************************************

सोसतो मी दाह माझे, ताव माझे!
सोडतो काळावरी मी घाव माझे!!

मी इथे का जाळतो पान्हा फुकाचा?
वासरासम वाट बघते गाव माझे!

काढतो जो तो मला आता विकाया....
फार वरखालीच होती भाव माझे!

का नशीबाला तरी मी बोल लाऊ?
उधळले मीही कितीदा डाव माझे!

मी कितीदा चिरडलो माझ्याच पायी....
धावते आयुष्य हे भरधाव माझे!

जय-पराजय, जीवना, वाटून घेऊ!
विजय सारे ते तुझे, पाडाव माझे!!

थंड झाल्यावर मला बघतोस आता....
मी शिलारस! काय होते ताव माझे!

मी मधूमेहास माझ्या कोंडलेले!
ना तुला समजायचे मज्जाव माझे!!

आज एकाकी दिसायाला जरी मी;
हे स्मृतींचे केवढे घेराव माझे!

टाळला गेलो किती वेळा कळेना!
 खोडतो मीहून आता नाव माझे!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१