काय झाले? माझिया अंगावरी ते धावले!

गझल
वृत्त: देवप्रिया
लगावली: गालगागा/गालगागा/गालगागा/गालगा
******************************************

काय झाले? माझिया अंगावरी ते धावले!
कोणती नस दाबली गेली, किती ते कावले!!

का अशा वळती दिशा मज पाहुनी दुसरीकडे?
चेहरे दाही दिशांचे का असे धास्तावले?

एक खिडकी किलकिलीशी राहिली उघडी जरा.....
चोरपायांनीच वारे चोंबडे डोकावले!

हेच त्यांना पाहिजे होते....बळी गेलोच मी!
कैक डोळे आज नक्राश्रूंमुळे पाणावले!!

दूर माझे गाव हंबरते....मला हे जाणवे!
आज स्मरणांनीच नुसत्या ऊर हे पान्हावले!!

भीक देणाराच होतो कानकोंडा शेवटी.....
भीक मागाया मतांची ते किती निर्ढावले!

काय त्या गझलेत जादू! काय मंतरले मला!
गझलमय आयुष्य झाले, वेड जीवा लावले!

माणसांमधल्या पशूंची दांडगाई केवढी!
खंत कोणालाच नाही, ना कुणी पस्तावले!!

कैक अत्याचार होती, ना पुरावे, ना सजा.....
कोवळी अब्रू लुटाया दैत्य हे सोकावले!

काय मी सांगू कुणाला? दु:ख माझे वेगळे!
कैकदा हे दात ओठांनाच माझ्या चावले!!

मी भिडस्तासारखा अन् विश्व हे खमके किती!
माझिया भोळेपणाने काय त्यांचे फावले!!

फासुनी शेंदूर बसले कैक परमेश्वर इथे......
शेंदराचे देव कोणाला कधी का पावले?

तू नव्हे, पण, स्वप्न होते सोबतीसाठी तुझे;
त्यामुळे का होइना, आयुष्य हे नादावले!

मी उगा कौतूक केले वेदनांचे माझिया;
त्यामुळे हे दु:ख नाहक केवढे लाडावले!

मी मनाला माझिया सोडून झालो चालता......
वेंधळ्या माझ्या मनाला कैकदा बोलावले!

तू कसेही वाग, त्यांचा मोडतो पापड सदा!
कारणावाचूनही ते केवढे रागावले!!

केवढे सौजन्य अन् ही केवढी सोशीकता!
व्यक्त नाही खंत केली, ते जरी खंतावले!!

पाहिले तुज त्या क्षणी पडलो तुझ्या प्रेमामधे!
काय सांगू नेमके मज काय होते भावले?

कैद झालो लोचनांमध्ये तुझ्या आजन्म मी!
मदिर नजरेने तुझ्या मजला असे वेडावले!!

लेखणीमध्ये अताही जोम तारुण्यातला!
मान्य, वयमानाप्रमाणे तन जरा रोडावले!!

तेरड्याचा रंग दिसतो तीन दिवसांचा खरे!
निवडणुका सरल्या....पुढारी केवढे सुस्तावले!!

होय, मुलखावेगळी आहेच माझी पोतडी!
जीवना! बघ यात माझे सरण सुद्धा मावले!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१