शस्त्र घ्यायला हवे
श्वापदे पिसाळलीत शस्त्र घ्यायला हवे
झोपले असेल शेत जागवायला हवे
ठाकली टपून चोच टोचण्यास पाखरे
टोचल्या फळास ठीक सावरायला हवे
शीग येइना कधीच पायलीस का इथे?
कोण लाटतोय रास आकळायला हवे
भेद शासका कशास नागरी व गावठी?
वाटणे निधी समान हे शिकायला हवे
लोकराज्य कल्पनेत शासकास चाकरी
सेवकासमान त्यांस वागवायला हवे
कालचे तुफानग्रस्त सज्ज होतसे पुन्हा
झेप घेत उंच-उंच बागडायला हवे
तेच तेच रोग आणि त्याच त्याच औषधी
एकदा तरी निदान नीट व्हायला हवे
वाटते मनास फक्त एवढेच जीवना
की तुझ्यात एकमुस्त चिंब न्हायला हवे
पेरले 'अभय' अनेक बीज जाणतोस तू
हे प्रभो! निदान एक अंकुरायला हवे
- गंगाधर मुटे
--------------------------------