पाणी___पाणी ___पाणी ___

            पाणी___पाणी___ पाणी ___

पाणी.. पाणी.. पाणी ..
कुठेतरी मुरतय पाणी
पाण्याची ओढ जाणवते,
वहाते पाणी, वहात्या पाण्यात हात धुवायचे,
पाण्यात रहायचे अन वैर करायचे,
नाही जमले तर किनारी रहायचे,
पाण्यात पडल्याविना पोहता कसे यावे?
अंगचे पाणी दाखवायचे ,
        तर त्यास जोखता यावे,
अंगचे पाणी ठरले अळवावरचे पाणी,
पोहऱ्यात नाही कारण आडात नाही पाणी,
पाण्यात हात-पाय हलवा
              नाहीतर वहात जा,
वहावत जाऊन चालायचे नाही,
वहाता....वहाता.....
लाट नेईल सुख शिखरावर,
दुःख लोट लोटेल खाली आणिक खालवर,
पाणी पाणी होऊन जाल,
पाणीच पाणी चोहिकडे,
प्रलय आला!! जायचे विलयाकडे,
पाण्यातून डोके वर काढता? निघेल डोळ्यातून पाणी,
त्या क्षणी आठवेल चक्रपाणि... चक्रपाणि,
तरी वदे वाणी__पाणी__ पाणी __ पाणी__ 
                                              विजया केळकर