खरेच पाहतो न आरशात फारसा तसा!

गझल
वृत्त: कलिंदनंदिनी
लगावली: लगालगा/लगालगा/लगालगा/लगालगा
****************************************

खरेच पाहतो न आरशात फारसा तसा!
कळे न हासतो कसा, मला बघून आरसा?

कभिन्न या तमातही, प्रकाश पालवे मनी!
खुणावतो अजूनही, मला मधेच कवडसा!!

समोर एक शून्य, त्यातुनी उभारले मला!
मुळात जन्म फाटका, न कोणताच वारसा!!

तुझीच वाट पाहण्यात ही हयात संपली.....
कळे न मी तुझ्यावरी विसंबलो असा कसा?

असेल व्योम फाटले, धरा असेल भंगली.....
पहाड लागला रडू असा कसा ढसाढसा!

तुझीच प्रेरणा मला, लिहावयास लावते!
तुझेच बोल बोलतो...तुझाच त्यामधे ठसा!!

मनातल्या मनात गूज घोक घोक घोकतो...
समोर पाहता तुलाच कोरडा पडे घसा!

विवेकशून्य वागणे, गहाण ठेवणे मती...
तुझ्यात अन् जनावरात काय भेद माणसा?

दिमाख काय तो, मिजास काय चालण्यातली!
जणू तुझ्या रुपात वाघ, सिंह चालतो जसा!!

जगात वेष्टणावरून तोलतात मोल ना?
म्हणून वेष घातला जगास पाहिजे तसा!

हयात जाळली सबंध, वश गझल न जाहली!
अजून शोधतोच मी तिच्यातल्या नसा नसा!!

टिपून हर्ष वाटतो पसा पसा जगास मी!
अजूनही रिता न जाहला कधीच हा पसा!!

कशास त्याच त्या चुका, पुन्हा पुन्हा करायच्या?
असून ज्ञात सापळे, उगाच त्यात का फसा?

लळा गझल, नशा गझल, हरेक श्वासही गझल!
गझल जगायचाच मी अखंड घेतला वसा!!

हरेक जीव वेगळा, स्वधर्म चक्क वेगळा!
गतीत कासवाचिया पळेल का कधी ससा?

अरे, मला कशी लगेच ओळखेल ही पिढी?
अलीकडे कुठेच मी न येत जात फारसा!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१