चष्म्याची पृथ्वीप्रदक्षिणा

     सध्या डॉलर काय महाग झालाय,विचारता सोय नाही . म्हणजे जर आपण अमेरिकेत गेलो तर एक डॉलरची वस्टू खरेदी करायची म्हटले तरी पूर्वी तासभर विचार करत असू तर आता आणखीच विचार करून कदाचित ती वस्तू घेण्याचे रद्दही करू. अगोदरच आपणा भारतीय नागरिकांची परदेशात खरेदी करायची झाली तर कुठल्याही परकीय चलनाचे मग तो डॉलर असो वा आणखी कोणतेही चलन असो,रुपयात रूपांतर करण्याची   मानसिकता कधीच जात नाही. त्यामुळे साध्या साध्या वस्तु खरेदी करायचे झाले तरी ते तिकडे अगदी स्वस्त म्हटली आणि आपल्याकडे अगदी महागाई कितीही  वाढली तरी रूपांतरित पैशांत तिकडल्यापेक्षा आपल्याकडेच  कितीतरी स्वस्त मिळते.त्यामुळे पहिल्यांदा अमेरिकेस गेलो तेव्हां साधा अंघोळीसाठी मग ( कारण सौ.ना शॉवर चालत नाही ना)एक डॉलरला म्हटल्यावर लगेच आमच्या खरेदी यादीतून कट झाला.कटिंग तर मी बरेच दिवस केलेच नाही.माझे एक मित्र तर मला म्हणाले,"अरे आपणच कात्रीने केस थोडे थोडे कट केले तरी काही बिघडत नाही.अगोदरच आपल्या डोक्यवर केस असतातच किती आणि असे सहा महिन्यात वाढून वाढून किती वाढणार? आणि हा त्यांचा उपदेश चार महिन्यांपर्यंत मी कसाबसा पाळला पण नंतर मात्र जाऊदे दहा पंधरा डॉलर पण मानेवर आणि कानांवर ते केस नकोत असे म्हणून एकदा मी कटिंग करण्याचे धाडस केलेच. त्याबाबतीत ए.पी.जेंच्या डोक्यातील ज्ञानापेक्षा त्यांच्या डोक्यावरील केसांना मी खरोखरच मानतो.
         माझ्या भाच्याच्याच बायकोने सांगितलेला याबाबतीतील तिचा अनुभव मला नेहमीच आठवतो. तिच्या नवऱ्याला निरनिराळ्या देशातच काम करावे लागते.त्यामुळे दुबई ,बॅंकॉक, टर्की अशी त्यांची वास्तव्य स्थाने सारखी बदलत असतात.तरीही पादत्राणासारख्या गोष्टी ते भारतात आल्यावरच खरेदी करतात. काही झालं तरी भाचा कुणाचा? पण दुबईतीलच आपल्या लेकीला मुलगी झाल्यावर माझ्या भाच्याने "यावेळी नातीसाठी डायपर,दुपटी,सगळ्या ब्रॅंडेड वस्तु मी मॉलमध्येच घेणार." असे जाहीर केले.खर तर माझा भाचा खरेदी प्रकरणी माझा कित्ता गिरवण्यास विसरला होता अश्यातला भाग नाही.तोही माझ्याइतकाच खरेदी शत्रू आहे पण नात झाल्याच्या आनंदात असल्यामुळे असा अपराध त्याचे हातून झाला.तरी त्याच्या बायकोने त्याला उगीच त्या फंदात पडू नकोस असा अगोदरच इशारा  दिला तरी त्याने तिकडे दुर्लक्ष केले ,त्यामुळे त्याला धडा शिकवण्यासाठी तिने "ठीक आहे तर मग मला पण  सॅंडल्स घ्यावयाच्याच आहेत त्याही तिथेच घेऊ" असे आव्हान त्याला दिले त्याबरोबर त्यानेही " घेकी तुला काय वाटते मी घाबरेन की काय ?" असे ते स्वीकारले.
          नातीसाठी खरेदी झाली , डायपर,दुपटी सारख्या वस्तु ब्रॅंडेड असल्याने महाग होत्या यात वादच नाही तरी  एकदा दिला म्हणजे शब्द पाळलाच पाहिजे या बाण्याचा तो मर्द मराठा तेवढ्याने खचण्यासारखी परिस्थिती नव्हती किंवा निदान वर वर तरी त्याने तसे काही दाखवले नाही.पण नंतर सॅंडल खरेदीची पाळी आली.पहिलीच सॅंडलची जोडी पाहिली आणि  तिची किंमत २५०० रिआल ऐकल्यावर माझ्या भाच्याचे अवसान गळले कारण एका रियालचा विनिमय दर त्यावेळी दहा रु.होता.तरीही कसेबसे अवसान गोळा करून "घे काही हरकत नाही" असे तो म्हणाला पण त्याची बायको त्यावर म्हणाली " ही काही फिटिंगला बरोबर नाही" आणि तिने दुसरी पसंत केलेली संडलची जोडी होती ३००० रियालला.अर्थात आता माघार घेणे माझ्या भाच्याला शक्यच नव्हते.पण त्यानंतर मात्र त्याने दुबईत खरेदी करण्याचे नाव काढले नाही.
      आम्ही मात्र भाच्याइतके धाडसी आणि पैसेवालेही नसल्यामुळे  त्या काळात अमेरिकेस जाताना दोन चष्मे घेऊनच जा असा आम्हाला दिलेला सल्ला इमानेइतबारे पाळला. असा सल्ला देण्यात आला त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ती बाब फार खर्चाची असते म्हणतात. एकदा मॉलमध्ये गेल्यावर सहज मी चष्म्यांच्या सेक्शनमध्ये फिरताना पाहिले तर त्या चष्म्यांखाली चार पाच असे आकडे पाहिल्यावर मी मनात म्हटले,"अरे उगीचच लोक अमेरिकेला नाव ठेवतात इतके स्वस्त चष्मे असताना,आणि तसे मी मुलास म्हटल्यावर त्याने ते आकडे किंमतीचे नसून ते आकडे चष्म्याच्या नंबरांचे आहे असे सांगून माझा गैरसमज दूर केला.खरे तर अमेरिकेतील लोकही चष्मा वापरतातच ना पण त्यांची किंमत ते भारतीय रुपयात रूपांतरित करत नाहीत.
         मी नेलेल्या चष्म्यातील एक खरोखरच नायगारा पहायला गेलो तेव्हां काचेवर तुषार उसळून दिसेनासे झाल्यामुळे  काढून रेनकोटच्या आतील शर्टाच्या खिशात ठेवण्याच्या प्रयत्नात प्रत्यक्षात रेनकोट व शर्ट यांच्या मधील  पोकळीत ठेवला  गेला व नायगारार्पण झाला व ही घटना अमेरिकावास्तव्याच्या अगदी सुरवातीसच घडली , त्यामुळे माझा दुसरा चष्मा मी असाच गहाळ करीन अशी खात्री असणाऱ्या माझ्या काळजीवाहू सरकारने अगदी स्वत:चा चष्मा घालून त्या चष्म्यावर बारीक नजर ठेवली होती तरीही डिसनेवर्ल्डमधील एका बोटराइडमध्ये चष्मा घालून बसण्याचा मूर्खपणा अंगलट येण्याची शक्यता निर्माण झालीच होती.सुदैवाने तो निसटून बोटीच्या बाहेर न पडता आतच पडला  व लगेच सुरक्षित हाती आला हे माझे भाग्य.
        आम्ही एका चष्म्यासह सुखरूप परत आलो. पण त्यानंतर अमेरिकेत्च राहिलेल्या आमच्या सूनबाईंचा चष्माही नातवंडांच्या भांडणात मोडकळीला आला म्हणजे काचा सुरक्षित पण चौकटीची एक दांडी तुटली व आणखीही काही नुकसान झाले. तिच्याकडे अर्थातच एक अधिकचा चष्मा होताच पण तोही मोडला तर काय घ्या म्हणून मोडलेला चष्मा दुरुस्त करण्यासाठी तिचे शेजारी ज्यावेळी भारतात येणार होते त्यांच्याबरोबर तिने तो पाठवला. (कारण अर्थातचअमेरिकेत चष्मा घेणे हे मोठे खर्चाचे काम !) ते ठाण्यात येणार असल्याने  चष्मा ठाण्यापर्यंत आला.पुढच्या प्रवासासाठी त्यांनी तो आपल्या शालकाबरोबर त्याला पुण्यास काही कामानिमित्त यावयाचे होते म्हणून पाठवला. त्यालाही आमच्या पुण्याच्या घरापर्यंत येण्याइतका वेळ नसल्याने भांडारकर रस्त्यावर तो ज्या बँकेत येणार होता त्या रस्त्यावर आमचे  एक काम करायचे  ठरवून त्याला तेथे  भेटायचे  ठरवले.
        आम्ही भांडारकर रस्त्यावर जाऊन त्याने सांगितल्याप्रमाणे बँकेच्या गेटपाशी जाऊन उभे राहिलो. आम्ही एकमेकास पाहिले नसल्यामुळे आमच्या भ्रमणध्वनीवरून त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न  केला.मी भ्रमणध्वनीवरून बोलू लागलो "नमस्कार, आम्ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे बॅंकेच्या गेट्पाशी उभे आहोत." " मी पण बॅंकेच्या दारातच उभा आहे" असे त्याचे उत्तर येताच आम्ही आजूबाजूला पाहू लागलो पण जवळपास हातात भ्रमणध्वनी घेऊन बोलत असलेला कोणीच दिसत नव्हता. त्यामुळे आम्ही गोंधळलो.मग आमचा भ्रमणध्वनी वाजला म्हणून मी कानाला लावला"तुम्ही पहिल्या गेटपाशी उभे आहात का ?" आम्हाला त्या बॅंकेला दोन प्रवेशद्वारे आहेत हे आत्ताच कळत होते त्यामुळे मी त्याला उत्तर दिले," तुम्ही दुसऱ्या गेटपाशी उभे असाल तर आम्ही तेथे येतो असे म्हणून आम्ही त्या इमारतीला वेढा घातला पण त्या इमारतीस दुसरे गेट असल्याचे काही दिसले नाही शेवटी पुन्हा त्याचा संदेश आला,"असे करा बॅंकेच्या आतच या मी कौंटरपाशी उभा रहातो" हा पर्याय बरा होता म्हणून आम्ही आत शिरून बॅंकेच्या कौंटरपाशी कोणी व्यक्ती उभी आहे का हे पाहू लागलो अर्थात कौंटरपाशी बरेच ग्राहक उभे होते पण त्यापैकी कोणी आमची वाट पहात आहे अस जाणवले नाही म्हणून आम्ही पुन्हा भ्रमणध्वनी लावला तेव्हां मात्र ती व्यक्ती बॅंकेत नव्हतीच हे उघड झाले कारण आमच्या समोर कोणीच भ्रध्ववर बोलत नव्हते पण माझ्या  भ्रध्व वर मात्र आवाज येत होता " मी वाट पहातो आहे तुमची"शेवटी बराच वेळ बोलून झाल्यावर त्याने विचारले "तुम्ही कोणत्या बॅंकेत आहात ?"यावर मी " एच डी एफ सी " असे उत्तर देताच काय घोटाळा झाला ते कळले. आम्ही दोघेही सुरवातीस  बँकेच्या प्रवेशद्वाराजवळ उभे आहोत असे बजावून सांगत होतो ते बरोबरच होते  पण तरीही एकमेकास पाहू शकलो नाही याचे अगदी छोटेसे कारण म्हणजे त्याने बँकेचे नाव  H.S.B.C. सांगितले होते व आम्ही ते  H.D.F.C. आहे अशा समजुतीने त्या बँकेच्या गेटपाशी उभे राहून बोलत होतो तर तो त्याने सांगितल्याप्रमाणे H.S.B.C. च्या गेटपाशी उभा राहून बोलत होता.
        चष्मा त्याच्याकडून घेऊन आमच्या घराच्या जवळील चष्म्याच्या दुकानात तो दुरुस्तीला टाकला, सूनबाईने चष्म्याचा नंबर दिला नव्हता कारण काचा सुरक्षित होत्या व चौकटीचीच दुरुस्ती करायची होती . पण दुकानदाराने तो चष्मा हाताळताना बरोबर एक काच खाली पडली आणि तिचे चक्क दोन तुकडे झाले. दोन्ही तुकडे जुळवून नंबर काढता येईल व काच बसवून चौकट बदलून देईन असे त्याने सांगितले तरी उगीच चुकीच्या नंबरचा चष्मा वापरला जायला नको म्हणून आम्ही मुलाला फोन केला व त्याने ईमेलद्वारे चष्म्याचा नंबर पाठवला , त्यानुसार बनवलेला चष्मा आम्ही नंतर स्वतःच बरोबर घेऊन गेलो.थोडक्यात डॉलरच्या वाढत्या भावामुळे चष्म्याला मात्र पृथ्वीप्रदक्षिणा घडली होती.