अमीर लोक पिती मद्य तरतरीसाठी!

गझल
वृत्त: कलावती
लगावली: लगालगा/ललगागा/लगालगा/गागा
************************************************

अमीर लोक पिती मद्य तरतरीसाठी!
गरीब धावत सुटलेत भाकरीसाठी!!

करायचे न कळे काय उच्च पदव्यांचे?
करून रांग उभे लोक नोकरीसाठी!

सुखास भाषण दु:खांवरी करायाचे....
हवेत दर्दभरे शेर झालरीसाठी!

जिण्यावरी तुळशीपत्र ठेवले आहे!
हयात ही जळते फक्त शायरीसाठी!!

हवेत त्यांस चिरे माझियाच स्वप्नांचे....
कुणा घरास्तव, कोणास ओसरीसाठी!

दिलेस श्वास मुक्या या तनूस तू माझ्या!
हवेत ओठ तुझे याच बासरीसाठी!!

घरात बोल तिचे बोबडेच दुड्दुडती....
अजून घर झुरते त्याच छोकरीसाठी!

हवा मुळातच तो गोडवा मनामध्ये!
हवी मिठासच हृदयात वैखरीसाठी!!

करून स्वार्थ कधी का जिणे मधुर होते?
जगा जगास्तव जगण्यात माधुरीसाठी!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१