पाहतो मी दुरून देखावे!

गझल
वृत्त: लज्जिता
गालगागा/लगालगा/गागा
**************************************************

पाहतो मी दुरून देखावे!
जाणतो मी जगा तुझे कावे!!

बारकावे बघून दुनियेचे...
माणसाला शहाणपण यावे!

एकमेकास आज न्याहाळू....
तू मला, मी तुला चितारावे!

ऐलतीरा नको मला रोखू!
धाडतो पैलतीर सांगावे!!

ही जगावेगळीच नवलाई....
पांगळ्याने नभास लंघावे!

बोलणे मी निमूट ऐकावे!
तू अबोल्यातुनीच बोलावे!!

सर्व दारेच बंद झाल्यावर....
तू तुझे मात्र दार उघडावे!

शीड नाही, नसे सुकाणूही!
हेलकावे कितीक सोसावे?

मोज उरते कितीक पुण्याई....
घे जिण्याचे तमाम आढावे!

दूर असले किती जरी यश ते....
तू मजलदरमजल करत जावे!

जोम पायामधे पुन्हा येतो!
तू विसाव्यास मात्र थांबावे!!

शब्द स्फुरतात शेर लिहिताना!
गुणगुणावे, मनामधे गावे!!

दु:ख चुपचाप सोसते अश्रू....
पण, सुखाचे कितीक कांगावे!

दावणी काय सैल केली मी....
या मनाने किती उनाडावे!

माझिया दैवदुर्विलासाने....
पुण्य माझे किती लवंडावे!

आढ्यतेला कलेत ना जागा!
दिव्य रूपास हात जोडावे!!

अस्मितेला तडे नको जाया...
लोभ वाटेतले नकारावे!

सांत्वनांनी कुठे जखम भरते?
शल्य हृदयातले निवारावे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
    फोन नंबर: ९८२२७८४९६१