कुठून आलो? कुठे निघालो? मला स्वतःलाच ज्ञात नाही!

गझल
वृत्त: हिरण्यकेशी
लगावली: लगालगागा/लगालगागा/लगालगागा/लगालगागा
****************************************************

कुठून आलो? कुठे निघालो? मला स्वतःलाच ज्ञात नाही!
नशीब नेते, म्हणून जातो, स्वतःहुनी येत जात नाही!!

नको कुणाची प्रमाणपत्रे! नको कुणाची प्रशस्तिपत्रे!
मजेत मी मस्त गात आहे, भले जरी मी सुरात नाही!!

न गंधउत्सव, न रंगउत्सव, अशी कशी ही बहार आहे?
वसंत आला, वसंत गेला, कुठेच कोकीळ गात नाही!

इथून त्या दफ्तरात जातो, तिथून ह्या दफ्तरात येतो!
असे फिरायास मागणीपत्र वा कुणी मी वरात* नाही!!
(*वरात....अरेबिक शब्द आहे वरात् ज्याचा अर्थ आहे चेक, बिल, हुंडी इत्यादी. वरातदार...म्हणजे सरकारी वरात घेऊन मामलेदाराकडे येणारा शिपाई. लाक्षणीक अर्थ आहे मामलेदार, खोत इत्यादींकडून कुळांकडे येणारा तगादेदार.)

भले घडो ढगफुटी, खचू दे पहाड, येवोत पूर देखिल....
दुभंगलेल्या धरेस मिटवायची धमक या नभात नाही!

अमुक असा अन् तमुक तसा, तो म्हणेल ऐसे...म्हणेल तैसे..
तुझ्या मानचेच खेळ सारे, तसे कुणाच्या मनात नाही!

घरामधे ज्या मनामनाच्या अनेक अदृश्य, उंच भिंती...
असेलही बंगला बडा तो, मुळात घरपण घरात नाही!

तुझ्या तृषेचे उगाच खापर नकोस आडावरीच फोडू!
मुळात पाणी तुझ्यात नाही, म्हणून ते पोहऱ्यात नाही!!

कितीक पदव्या जरी मिळवल्या, जगायचे ज्ञान येत नाही!
जगायचे ज्ञान कोणत्याही मुळामधे पुस्तकात नाही!!

कुणीच मारू नये बढाई, कितीक शायर म्हणे पचवले!
अखेर कळते बरेच काही अजूनही वाचनात नाही!!

जरी भरारी नभात घेतो, भुईवरी घट्ट पाय माझे....
हवा न डोक्यात माझिया, मी तुझ्याप्रमाणे भ्रमात नाही!

खऱ्या खऱ्या पावसात जाऊ, फिरू, भिजू, चिंब पार होऊ!
अशी मजा कोणत्याच काव्यामधील त्या पावसात नाही!!

मजलदरमजल करीत अंती यशाचिया पायथ्यास आलो!
कधीच यश कोणते मिळवले अजून एका दमात नाही!!

परग्रहावर मनुष्य जातो, नवे, नवे शोध लावतो तो...
परंतु देवास जिंकण्याची कुवत अरे माणसात नाही!

दुपारचे ऊन्हही मनाला तुझ्यामुळे वाटले हवेसे!
तुझ्याविना राम राहिला पौर्णिमेतल्या चांदण्यात नाही!!

मनात नाही तरी मनाला मुरड पहा घालतोच आहे!
अजून कामास रोज जातो, उमेद या पावलात नाही!!

कितीक स्वप्नांवरीच पाणी दिले अखेरीस सोडुनी मी!
मनात माझ्या बरेच काही, तुझ्या परंतू मनात नाही!!

उतार वयही तरूण असल्यासमान अद्याप नाचते हे!
अबोल झालीत पैंजणे, त्राण राहिला घुंगरात नाही!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१