वाटते कधी कधी
वाटते कधी कधी मला
आषाढ मी व्हावे
धाड धाड कधी
कधी रिमझिम
शिंपीत मोती
तुझ्यातल्या श्रावणाला
आमंत्रण मी द्यावे
आज येते, उद्या येते
खेळत लपंडाव
तु मला झुरवावे
झुरता-झुरता अवचित
पिसा चातक मी व्हावे
अचानक मग
ओथंबलेल्या मेघागत
सरसर तु बरसावे
तृषार्त चोचीत माझ्या
पियुष तु ओपावे
झिम्म-झिम्माड मी
अन् चिंब-चिंब तु
एकमेकांना भिजवावे
भिजता भिजता
अलगद आपण
आपसात मिसळावे
झरझरत्या आपल्या काळजांना
त्या पावसाने पाहावे
अन् त्यालाही मग
त्याच्या अस्तित्वाचे
कोडे पडावे........!!!!!
-उद्धव कराड, ( मो. नं. ९८५०६८३०४५)
मु. जळगांव, ता. निफाड, जि. नाशिक.