वास्तवाशी झुंजण्याची आज सुद्धा धमक आहे!

गझल
वृत्त: व्योमगंगा
लगावली: गालगागा/गालगागा/गालगागा/गालगागा
**************************************************

वास्तवाशी झुंजण्याची आज सुद्धा धमक आहे!
या अधू डोळ्यांत स्वप्नांची पुरेशी कुमक आहे!!

काय वर्णावी तिच्या मी गौरवर्णाची झळाळी!
वीजही दिपते, अशी माझ्या प्रियेची चमक आहे!!

बोट रस्त्याचे पकडले, ठेवुनी संपूर्ण श्रद्धा....
हेच माझ्या वाटचालीचे खरे तर गमक आहे!

एवढी सुंदर फुले पण, रोज ती मजलाच माळे!
ती गझल साक्षात आहे अन् जणू मी यमक आहे!!

जगभराच्या आसवांची माझिया पेनात शाई!
आणते चव मैफिलीला.....गझल माझी नमक आहे!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१