१) धनाची पेटी , २) पुण्याईचे दान

         १) धनाची पेटी

पेटी धनाची म्हणून तू यायचं
धन परक्याचं होवून तू जायचं
तळहातावर झेललेल्या पावलांना
काटे तुडवायला सोडायचं
तुला जोजवलेल्या हातात
मेंदी भरला हात तुझा घेताना
नक्षीनं त्या पाहुणेपणाचं अंतर पेरायचं
तुझ्या घुंगुरवाळ्यांची छुनछून
आठवणीत साठवताना
किणकिणीला तुझ्या चुड्याच्या
सदा कानांना आसुसलेलं ठेवायचं
अंथरून पापण्यांच्या पायघड्या
तुकडा पडलेल्या काळजात या
आम्ही माहेर तुझं सजवायचं.......!!!

     २) पुण्याईचे दान

पुण्याईचे दान देत देत
तू माझ्या जीवनात यावे
सोनसळी मृदुल पावलांनी
तू माझ्या जाणिवेत शिरावे
अबोध नजरेने तू मला नि मी तुला
काळजात शिरून पाहावे
संगमावरती त्या नजरांच्या
विश्वच अवघे अवतरावे
बोचू नयेच काटे कधी तुला
असे मी तुला ओंजळीत घ्यावे
पाकळी पाकळीने तू फुलावे
अन् मी सल सारे सोशीत जावे
सजवूनी काळजाची पालखी
कुण्या राजकुमाराने यावे
कोंदण कातळाचे उराला घालीत
पालखीत त्या मी तुला सजवावे
दाटल्या कंठाने मी तुला बोळवावे
अन् डोळ्यातुनी माझ्या आठव तुझे पाझरावे
मागे तुझ्या, सान बाहुल्यांना मी पाहावे
अन् अलगद त्यांनी काळीज माझे सांधावे.......!!!

                                                                                -उद्धव कराड, (मो. नं. ९८५०६८३०४५)
                                                                                   मु. जळगांव, ता. निफाड, जि. नाशिक.