चालले माझे न काही, मज रुळावे लागले!

गझल
वृत्त: देवप्रिया
लगावली: गालगागा/गालगागा/गालगागा/गालगा
*************************************************

चालले माझे न काही, मज रुळावे लागले!
चालताही येत नव्हते, अन् पळावे लागले!!

आसवे गर्दीत मोठ्या संयमाने वागली;
मात्र एकांतात त्यांना ओघळावे लागले!

ऎकले नाहीस माझे ठेचही लागून तू;
रक्त मी होतो तुझे, मज साखळावे लागले!

कोपली धरतीच तेव्हा वाचले नाही कुणी....
मी कडा होतो, मलाही कोसळावे लागले!

सूर्य तो साक्षात होता जाणले नाही कुणी;
उगवण्या आधीच त्याला मावळावे लागले!

भोगले तेव्हाच लिहिले; शब्द झाले बोलके,
मीपणाला पूर्ण माझ्या विरघळावे लागले!

स्वप्न मी रेखाटण्याचा छंद नाही सोडला;
काळजाला कैक वेळा चुरगळावे लागले!

तेवणे होतो गुन्हा? मी, होय हा केला गुन्हा;
एक मी कंदील होतो, काजळावे लागले!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१