सावली

    जिवाजी स्टेशनमध्ये धावत पळतच शिरला. लांबवर पाहिलं तर गाडी जात होती. रुळ वाकड्या सापाप्रमाणे पडलेले होते. त्यांच्यावर स्टेशनवरच्या पिवळ्या दिव्यांचा प्रकाश पडला होता. उशिरा आल्याबद्दल तो स्वतःशीच चरफडला. संबंध प्लॅटफॉर्मवर कोणीही नव्हते. सर्व कॅंटीन्स बंद झालेली होती. टोकावर फक्त एकच चहाचे दुकान सुरु होते.  
    समोरच्या प्लॅटफॉर्मवर एक कुत्रे हिंडत होते. बाकाखाली एक भिकारी झोपला होता. घड्याळाचे काटे हळू हळू कोणालाही न सांगता पुढे सरकत होते. कालच अमावास्या झालेली असल्यामुळे आकाश काळ्या रंगाने भरून गेले होते. 
     काय करावे ?
     ‘ पुढची थेट गाडी आता उद्याच आहे. मधे फक्त दोन गावांना जोडणाऱ्या गाड्या आहेत. आता पुढच्या गाडीनं जावं आणि तिथून पहावं पुढे वाहन मिळतंय का ते’, या विचाराने तो जरा सुस्तावला. एका बाकावर बसला. पुढची गाडी कधी आहे, हे विचारायलाही माणूस नाही इथे. टाईमटेबलच्या शोधात जिवाजी या टोकापासून त्या टोकापर्यंत जाऊन आला. येताना त्या टोकावरचा चहा घेऊन आला. होता तिथेच पोचल्यावर मागे बघितले तर टाईमटेबल होते. मघाशीच मागे पाहिले असते तर बरे झाले असते, असे त्याला वाटले. ‘ ठीक आहे, त्यानिमित्ताने स्टेशनच्या टोकापर्यंत जाऊन आलो आणि चहाही मिळाला. पुढची गाडी तीन तासांनी आहे. वेटिंग रूममध्ये जावं आणि झोपावं, या विचाराने तो रूमकडे जाऊ लागला. मधे डावीकडे एक खोली लागली. आत आणि बाहेर दिवे असल्याने खोलीत अंमळ अधिकच प्रकाश होता. आत शिरून उजवीकडे पाहिले तर काळा कोट, सिगारेट आणि हातात पुस्तक. दरवाजावरची पाटी पाहिली - –स्टेशन मास्तर'.
     जिवाजी बाहेर पडला. रूममध्ये लवंडला. बाकांवर त्याला झोप लागेना म्हणून स्वतःची बॅग डोक्याखाली घेतली आणि जमिनीवर आडवा झाला. वेटिंगरुममध्ये एक तरी माणूस दिसायला पाहिजे होता. तो आत शिरत असताना एक माणूस बाहेर गेला. तो परत येईल असे जिवाजीला वाटले पण तो आला नाही. थंडीमुळे जिवाजीने पाय जवळ घेतले. स्वेटर घातला. अर्धा तास झाला तरी त्याला मनासारखी झोप लागेना. अखेरीस तो उठला. त्या खोलीच्या दारावर टकटक केले.    
    " नमस्कार मास्तर."
     "नमस्कार. तुमची ती गाडी गेली...
     मास्तर मान खाली घालूनच बोलले. वाचनात ते दंग झाले होते. त्यांचा चेहरा दिसत नव्हता. 
     "हो. माहीत आहे. पुढची तीन तासांनी आहे, असं समजलं."
     "बरोबर." 
     "पण तुम्हाला कसं कळलं की मी त्याच गाडीसाठी आलो होतो म्हणून..."
     "या वेळेला येणारे लोक त्याच गाडीसाठी येतात. मधे गाडीच नाही, राव."
     मास्तरांनी डोकं उचलले. टक्कल. गोल चेहरा. ताजं गंध. अगदी आत्ताच लावल्यासारखे. सगळे ओळखून असल्यासारखा भाव.    
     मास्तरांनी नाव, गाव विचारले. जिवाजीने सांगितले. मास्तरांनी पुस्तक उपडे ठेवले. 
     "घ्या मफलर."
     जिवाजीने 'नाही' म्हटले नाही. पुस्तक सरळ करून नाव वाचले. 
     ‘ध्यानात येण्याआधी.’ 
       मुखपृष्ठावर करड्या रंगातील पुरुषाचा चेहरा होता. चेहऱ्यात काही आकृती. जिवाजीने त्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला.  
    "तुम्ही वाचता की नाही?
   " फार नाही." 
    "चेहरे वाचा. जे दिसतंय ते नीट पाहा."
     जिवाजीला सल्ला तितकासा आवडला नाही. दुसरे काहीतरी बोलण्याचा जिवाजीने प्रयत्न केला पण मास्तर पुस्तकात बुडालेले होते. मघाशी न आलेली झोप त्याला आता येऊ लागली. वेटिंग रुममध्ये जाऊन तो पुन्हा आडवा झाला.  
    पाऊणएक तासाने उठला. गाडीवर लक्ष ठेवायला हवे होते. या प्लॅटफॉर्मवर कोणीच नव्हते. पलीकडच्या प्लॅटफॉर्मवर लांबवर हालचाल दिसली. जिवाजी कोण माणसे आहेत, कोणत्या गाडीसाठी आहेत याचा मागोवा घेण्यासाठी पुढं जाऊ लागला तर ती माणसं अजून दूर जात आहेत, असं त्याला वाटले. त्याने नाद सोडला.
      मास्तरांच्या खोलीत डोकावला.
    "या. झाली झोप?"
    "हं."
    "चहा घेता?"
    मास्तर स्वतः उठले आणि बाहेरून हातात दोन कप घेऊन आले. फार लवकर परत आले, असे जिवाजीला वाटले.  
     ‘ त्या टोकाच्या चहावाल्याकडून आणला असणार. दुसरे काहीच इथे उघडे नाही. हा चहा आणायला मला वेळ लागला असता. ह्यांनी पळत जाऊन आणला की काय ?’
      "काय काय वाचलंत?"
     "फार नाही. पाचेक  पुस्तकं नीट वाचली असतील."
   "खोल खोल विहीर, मध्यरात्र."
   "हे काही नाही वाचल."
   "ही पुस्तकांची नावं नाहीत." 
   'इथून जावे तर झोप येत नाही, थांबावे तर हे प्रश्न.'  जिवाजीला बोलायला हवे होते पण तो संवाद नको होता.  
      आता मास्तर त्यांच्या रेल्वेच्या पुस्तकात डोके खूपसून बसले होते. अधूनमधून काही गणिते करीत होते. वरच्या दिव्यामुळे टेबलवरच्या थर्मासची सावली पडलेली होती. दिव्याभोवती घोंघावणाऱ्या एखाद्या माशीचीही हलणारी सावली होती. जिवाजीच्या पायाचीही सावली पडलेली होती. पडलेल्या सावल्यांमध्ये जिवाजीने पायाची सावली मिसळली. बोटेही दिव्याच्या प्रकाशात धरली. या सगळ्यांच्या सावल्यांमधून काही आकृत्या आपोआप तयार होत होत्या. बोटांची हलवाहलवी करून तो आणखी काही चित्रे बनवू लागला आणि त्या खेळात तो रंगून गेला.
    "काय नक्षीकाम सुरु आहे वाटतं?"
        मास्तरांच्या प्रश्नाने तो भानावर आला.
   "  असंच आपलं...
   
" मी काय म्हणतो. तुमच्या काही लक्षात आलं का? "
    " कशाबद्दल?"
    " सावल्यांचा खेळ खेळताय ना म्हणून म्हटलं. या जरा बाहेर. "
    जिवाजी बाहेर आला. आता दोघेही खोलीच्या दाराशी उभे होते.  
    " लांब बघा. ते चहाचं दुकान."
     "हो पाहिलंय मी. मघाशी तिथूनच चहा घेतला मी." 
     "घेतला आणि कळलं नाही?"
     "काय कळलं नाही?"
     "इकडे पहा खाली. तुमची सावली दिसतेय का?"
    "हो. दिसतेय." 
   " कशामुळे?"
    " खोलीतून येणाऱ्या उजेडामुळे." 
    "मग आता  तिकडे पहा. त्या चहावाल्याची आणि त्याच्या त्या दुकानाची सावली कुठे आहे का? त्याच्या दुकानाच्या वरती दोन दोन दिवे आहेत. पाहिजे तर आणखी पुढे सरकून पहा. "
    जिवाजीच्या अंगाचा थरकाप झाला. हळुहळू दहा पावलं पुढे टाकून पाहिले. दुकान, तो चहावाला नीट पाहिले. त्याला कुठेही सावली दिसली नाही. ना चहावाल्याची ना त्याच्या दुकानाची. 
    "म्ह...म्ह..म्हणजे मास्तर..तो..
    " संबंध स्टेशनवर कॅंटीन्स रात्री बाराला बंद होतात आणि मधे गाडी नसल्याने रात्री तीनला उघडतात. या वेळात कोणीही इथे नसतं. हा एकच चहावाला दिसतो. अनेकांना तो दिसलाय याच वेळेला. स्टेशनच्या कोपऱ्यात."
    "दिसतो म्हणजे? "
    "दिसतो म्हणजे दिसतो. असतो की नाही..." 
    जिवाजीच्या तोंडून शब्द फुटेना.
    "या, आत या. कितीतरी वर्षं मी इथेच आहे. मला अनेकजण येऊन सांगतात त्याच्याबद्दल. तुमच्या लक्षात आलं नाही म्हणून दाखवलं. म्हणून म्हटलं होतं, चेहरे वाचा. जे घडतंय ते नीट पहा."
    जिवाजी थिजलेल्या अवस्थेतच खुर्चीत बसला. 
    ‘ आपण पूर्ण स्टेशन फिरलो. या टोकापासून त्या टोकापर्यंत जाऊन आलो. चहाही घेतला.  चहावाल्याशी दोन शब्दही बोललो. पण आपल्या लक्षात आलं नाही काहीच......
    मागे एकदा एका मित्राच्या मयताला जिवाजी स्मशानात गेला होता. त्याची आठवण त्याला झाली. 
    जिवाजीने थिजलेल्या अवस्थेतच डोळे मिटून घेतले. घशाला कोरड पडली होती. खूप वेळानंतर भानावर आला तर त्याला कोणीतरी हलवत होते. डोळे उघडून पाहिले तर अंगात काळा कोट. डोक्यावर टोपी. चेहरा गोल नव्हता.
    " घ्या पाणी."
    " ते मघाचे मास्तर कुठे गेले?"
    " कोणते? पुस्तक वाचणारे?"
    " हो तेच."
    जिवाजीने त्यांना सगळे सांगितले. 
    "मी स्टेशन मास्तर. मधल्या गाडी नसणाऱ्या वेळात मी बरेचदा वरच्या खोलीत पडतो. ते जे तुमच्याशी बोलले, ते काही जणांना या वेळात खोलीत पुस्तक वाचताना दिसले आहेत. मला सांगा, तुम्हाला जेव्हा त्यांनी बाहेर बोलावले तेव्हा तुमची सावली पडली होती. ती त्यांनी दाखवली.  त्यांची पडली होती ? 
       जिवाजीची पूर्ण बोबडी वळली.