दास्य

अडैक्कलम आणि त्याचं कुटुंब मोलमजुरी करून कशीबशी गुजराण करत होतं. त्यांना अग्रवालनं काम दिलं होतं आणि राहायला जागा पण दिली होती म्हणून बरं होतं. तो, त्याची बायको आणि दहा वर्षांचा मुलगा पोटासाठी वणवण फिरत तमिळनाडुतून इकडे मध्यप्रदेशात आले होते. त्यांना इथली भाषा येत नव्हती आणि त्यांच्या ओळखीचं पण जवळपास कोणी नव्हतं. दिवसभर दगड फोडून त्या सबंध कुटुंबाला महिन्याला फक्त पन्नास रुपये मिळत. मजुरांच्या कामाचे ठराविक तास, त्यासाठी असलेले कायदे, इतर सोयी हे शब्दही त्यांना माहीत नव्हते. उजाडल्यापासून अंधार पडेपर्यंत दगड फोडायचे एवढंच त्यांना माहीत होतं. त्यात कधी खंड नाही. रविवार किंवा सणवार ह्यांच्या सुट्ट्या असतात हेही त्यांना ठाऊक नव्हतं. कधी आजारीपण आलं तर कशीबशी एखाद्या दिवसाची सुट्टी मिळायची. पण त्यापूर्वी अग्रवाल शिव्यांची लाखोली वाहायचा.  

देशातील वस्तूंच्या किमती कितीही वाढल्या आणि रुपया कितीही खाली घसरला तरी त्यांच्या मजुरीत फरक पडायचा नाही. अडैक्कलमचं कुटुंब जेव्हा मध्यप्रदेशातल्या त्या डोंगराळ जंगलविभागात राहायला आलं तेव्हापासून वर्षानुवर्षं त्यांना एवढीच मजुरी मिळत होती. ह्या भागात अडैक्कलम सारखी डझनावारी कुटुंबं होती. कुणी आंध्रातून आलेलं तर कुणी बिहारमधून.   

देशातील मोठमोठ्या योजना त्यांच्याच विकासासाठी बनवलेल्या आहेत, त्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत हे ह्या अडाणी मजुरांना कुठून माहीत असणार? रोज दोन वेळचं जेवण, नेसायला वस्त्र आणि डोक्यावर छप्पर ह्या अत्यावश्यक गरजा भागवण्यासाठी किती तरी संस्था, आयोग, निगम, खाती अगदी थाटामाटात स्थापन केली गेली आहेत ह्याची त्या बिचाऱ्यांना कल्पनाही नव्हती. इतकंच नव्हे तर आपण नेमके कोणाचे बांधील मजूर आहोत हेही त्यांना नीटसं माहीत नव्हतं. ह्या गुलामीची त्यांना इतकी सवय झाली होती की ती त्यांना आता सलत नव्हती. स्वातंत्र्य आणि त्याचे फायदे ह्याचा विचार करणं ही गोष्ट त्यांच्या कुवतीपलीकडची होती.

तिथला कंत्राटदार अग्रवाल महाधूर्त माणूस होता. ह्या गरीब लोकांवर बारीक लक्ष ठेवता यावं म्हणून त्यानं अशा निर्जन जागी त्यांना आणून ठेवलं होतं. तिथेच झोपडी बांधून राहायला आणि आजूबाजूच्या थोड्याश्या जागेत भाजीपाला, थोडंफार धान्य पिकवायला अगदी उदार अंतःकरणानं परवानगी दिली होती. सरपणासाठी जंगलातला लाकूडफाटा होताच. ह्या लोकांनी फोडलेले दगड रस्ते, पूल, घरं, इमारती वगैरे बांधण्यासाठी शहरात पाठवले जात. त्यासाठी नेहमी लॉऱ्यांची ये-जा चाललेली असे.

अग्रवालचा धंदा तेजीत चालला होता आणि लवकरच त्याची गणना ’धनाढ्य’ ह्या वर्गात झाली असती. कंत्राटदार आणि त्यांचे दलाल यांना पैसा कमावण्याची ही अगदी सुवर्णसंधी होती. अग्रवालजवळ दूरदृष्टी होती. धंद्यातल्या सगळ्या युक्त्या त्याला तोंडपाठ होत्या. निवडणुकांच्या वेळी सत्तेवर असलेल्या पक्षाला दहा-पंधरा गाड्या दिल्या आणि दोनेक लाखांचा नैवेद्य दाखवला की पुढच्या पाच वर्षांची निश्चिंती हे त्याला माहीत होतं.  हे वेठबिगारी मजूर कधी मान वर करून बोलू शकणार नाहीत आणि इथून पळूनही जाऊ शकणार नाहीत याची चोख व्यवस्था त्यानं केलेली होती.  गुंडांच्या टोळ्याच नव्हे तर अधिकारी वर्ग आणि त्यांच्या हाताखालची माणसं देखील कंत्राटदारांना मदत करत होती. मजुरांच्या मनात आपण स्वतंत्र व्हावं अशी इच्छा सुद्धा निर्माण होत नव्हती. आहे ह्या परिस्थितीपेक्षा चांगल्या परिस्थितीत जगता येणं शक्यच नाही अशी त्यांच्या मनाची पक्की समजूत झाली होती.

पण तेवढ्यात अग्रवालच्या दुर्दैवानं तमिळनाडुच्या राजकारणात एकदम नवीन वारे वहायला लागले. सामान्य माणसाला खूश करणाऱ्या योजना, घोषणा, जाहिरातबाजी यांची रेलचेल सुरू झाली. त्याच सुमारास सत्ताधारी पक्षाचे एक खासदार श्री.मुत्तरसु एका राष्ट्रीय समारंभासाठी भोपाळला गेले होते. समारंभ संपल्यावर ते जवळपासचा अदिवासी आणि डोंगराळ जंगलविभाग बघायला निघाले. सरकारी गाडी आणि स्थानिक लोकांचा लवाजमा होताच. हवाही चांगली होती. खासदार साहेब प्रसन्नचित्त होते. त्या भागातील वनजीवन, निसर्गसौंदर्य पाहत पाहत ते अडैक्कलमच्या वस्तीमध्ये आले. त्यांच्या कानावर तमिळ भाषेतील काही वाक्यं पडली आणि त्यांनी कान टवकारले. काही वेळातच ते त्यांच्या जवळ गेले आणि म्हणाले, "अरे, तुम्ही तमिळ बोलताय? कुठले तुम्ही? इकडे कसे आलात?"  अडैक्कलमला पण तमिळ ऐकल्यावर आनंद झाला. तो म्हणाला, "साहेब, आम्ही सेलम जिल्ह्यातले. पोटासाठी इकडे आलो."

"इतकी ढोरमेहनत करायला तुम्ही इथपर्यंत आलात? तुम्हाला मजुरी किती मिळते?"

"साहेब, आम्हाला तिघांना मिळून महिन्याला पन्नास रुपये मिळतात. शिवाय कर्जाचं ओझं आहेच. पण सेलममध्ये असलं सुद्धा काम मिळालं नाही. पोटाच्या खळग्या तर भरायला हव्यात नं?  त्याच्यासाठी इथपर्यंत आलो."

खासदार साहेबांना फारच आश्चर्य वाटलं. तीन माणसांकडून दिवसभर काम करून घेतात आणि महिन्याच्या शेवटी हातावर फक्त पन्नास रुपये ठेवतात! काय हा जुलूम! केवढं शोषण!

"अरे पण, एवढ्याश्या पैशात तुझं कसं भागतं? पोटं तरी धड भरतात का तुमची?" खासदारांच्या आवाजात सहानुभूती अगदी ओतप्रोत भरली होती. इतकं प्रेम पाहून अडैक्कलमला तर अगदी गहिवरून आलं. कसं बसं तो म्हणाला, "पोट नाही भरत पण चाललंय ते एकूण बरं चाललंय."

"तुला माहीत नाही आमच्या सरकारनं वेठबिगारीवर कायद्यानं बंदी आणली आहे. आमच्या वीसकलमी कार्यक्रमाबद्दल तू ऐकलं असशीलच."

"सरकार, हे सगळं आम्हाला कसं काय माहीत असणार? आणि ते माहीत असूनही उपयोग काय? ह्या परक्या देशात आमची भाषा कुणाला समजत नाही, त्यांची भाषा आम्हाला येत नाही. काही आगापीछा नसलेली  माणसं आम्ही. आम्ही काय करणार?"

"कोण आहे तुझा मालक? नाव काय त्याचं?" खासदारांनी जरा गुर्मीतच विचारलं. अडैक्कलमला घाम फुटला. भीतीनं त्याच्या तोंडून शब्दच फुटेना.

"अरे घाबरू नकोस, बिनधास्त बोल. मी आहे ना. काळजी कशाला करतोस?"

अडैक्कलमनं घाबरत घाबरत आजूबाजूला सावधपणे नजर टाकली आणि अगदी हळू आवाजात म्हणाला, "अग्रवाल साहेब."  

मुत्तरसुंनी डाकबंगल्यात पोहोचल्यावर सकाळपासून घडलेल्या सर्व गोष्टीची डायरीत टिपणं काढून ठेवली. त्यांच्या राजकारणी धूर्त मेंदूत भराभर चक्रं फिरायला लागली आणि एक नवी योजना आकार घ्यायला लागली.

लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या होत्या. गेल्या काही दिवसांत मतदारसंघातला आपला दबदबा जरा कमी होऊ लागल्याचं त्यांना जाणवत होतं. आपले असे म्हटलेले काही लोक फिरले आहेत आणि त्यांना घरी बसवण्याच्या गोष्टी बोलत आहेत याचा सुगावा मुत्तरसुंना लागला होता. तेव्हा आता अशी काही तरी शक्कल लढवली पाहिजे की ज्यामुळे सर्वसामान्य माणूस आपल्याकडे आकर्षित होईल. तरच ह्या निवडणुकांमध्ये आपला निभाव लागेल नाहीतर खरंच घरी बसावं लागेल हे त्यांच्या लक्षात आलं. मुत्तरसुंनी मग मनातल्या मनात एक गुप्त योजना आखली.

लोकसभा भंग होऊन निवडणुका जाहीर होण्याच्या काही महिने आधी मुत्तरसुंनी एक जोरदार भाषण दिलं आणि ते राज्यातील मुख्य वर्तमानपत्रांमध्ये अगदी पहिल्या पानावरच छापून आलं, त्याच्यावर चर्चाही झाल्या. मुत्तरसुंनी आपल्या भाषणात वेठबिगारीच्या प्रथेवर कडाडून हल्ला केला होता. "आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून तिसाहून जास्त वर्षं झाली आहेत तरी अजून इथे वेठबिगार चालूच आहे. ही अत्याचाराची परिसीमा आहे. सबंध कुटुंब दिवसभर राबतं तरीही त्यांना एक वेळचं जेवण मिळणं सुद्धा मुश्किल व्हावं! इतक्या घृणास्पद आणि क्रूर शोषणाविरुद्ध सबंध देश उठून उभा राहिला पाहिजे आणि त्याने लढा पुकारला पाहिजे. हा अन्याय आणि अत्याचार मुळापासून उपटला जाईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, मग त्यात माझे प्राण गमवावे लागले तरी बेहेतर!"

ह्या घोषणेनंतर मुत्तरसुंनी आणखी एक गोष्ट केली. आपल्या प्रांतातून परक्या प्रांतात वेठबिगारीसाठी गेलेल्या तमिळ बांधवांची अवस्था किती वाईट आहे हे वर्तमानपत्रांतून, सभांमधून, भाषणांतून पुन्हा पुन्हा सांगायला सुरुवात केली. त्याचबरोबर त्यांनी घोषणा केली की, "उत्तर भारतातील आपले तमिळ बांधव आज कंत्राटदारांच्या गुलामगिरीत अडकले आहेत, दिवसभर अतोनात कष्ट करूनही ते अर्धपोटी आहेत. जनावरांपेक्षाही वाईट जीवन त्यांच्या वाट्याला आलेलं आहे. मी शपथ घेऊन सांगतो की त्यांना सोडवून आणीन आणि आपल्या तमिळनाडुमध्ये त्यांना मानाचं जीवन जगण्याची संधी देईन." मुत्तरसुंच्या ह्या वक्तव्याची पोस्टरं त्यांच्या मतदारसंघात कोपऱ्याकोपऱ्यावर लावली गेली.

निवडणुकीची तारीख जाहीर झाली. मुत्तरसुंनी आपला अर्ज भरला आणि ताबडतोब काही वार्ताहर आणि पोलिस यांना बरोबर घेऊन ते भोपाळच्या दौऱ्यावर निघाले. फोटोग्राफरनं घरातून निघाल्यापासूनच फोटो काढायला सुरुवात केली. नंतर स्टेशनवर, निरोप द्यायल्या आलेल्या ताफ्याबरोबर, ट्रेनमध्ये बसताना असे असंख्य फोटो काढले. वर्तमानपत्रांमधूनही त्यांच्या दौऱ्याबद्दलच्या फोटोसहित बातम्या ठळकपणे दिसायला लागल्या. मुत्तरसुंना वेठबिगारी मजुरांबद्दल असलेली कणव आणि त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या कंत्राटदारांवरचा राग यांची रसभरीत वर्णनं वर्तमानपत्रांत छापून यायला लागली.   

मध्यप्रदेशातल्या त्या डोंगराळ आणि जंगल विभागातल्या अडैक्कलमच्या कुटुंबाला सोडवण्यासाठी खासदार पोलिस बंदोबस्त घेऊन येत आहेत हे कळताच कंत्राटदार आणि त्याचे साथीदार जंगलात लपून बसले. खासदार साहेब आपल्याबरोबर बरोबर पोलिस आणि परीटघडीच्या कपड्यांमधले अनेक लोक घेऊन आलेले पाहून अडैक्कलम बिचारा घाबरून गेला आणि खासदार साहेबांना म्हणाला, "साहेब, तुम्ही आम्हाला मदत करायला इथपर्यंत आलात, तुमची फार मेहरबानी आहे. आमच्यासाठी तुम्ही तर प्रत्यक्ष देवाचाच अवतार आहात. पण ही इतकी माणसं, ह्या घोषणा! आम्हाला असल्या गोष्टींची सवय नाही हो! साहेब, आमची एवढी लायकी तरी आहे का? आम्हाला हे सगळं कसं तरी वाटतंय. आमच्या नशिबात जे असेल ते भोगू पण आम्हाला आपल्या राज्यात नेऊन तिथल्या लोकांसमोर आमच्या ह्या लाजिरवाण्या जिण्याचा बोभाटा करू नका. मी तुमच्या पाया पडतो."

पण मुत्तरसुंनी ते अजिबात ऐकलं नाही आणि राजकीय सभांमधील भाषणाचा खास आवाज लावत ते म्हणाले, "तुमची ह्या नरकातून सुटका केली नाही तर मी माणूस म्हणण्याच्या सुद्धा लायकीचा  राहणार नाही. महिन्याला कमीतकमी सहाशे रुपये मजुरी द्यायला हवी तिथे हे तुमच्या हातावर पन्नास रुपये टिकवतात! एवढं क्रूर शोषण मी कुठेच पाहिलेलं नाही. ह्या अत्याचाराविरुद्ध सबंध देश आता उठला आहे. बंधपत्रित श्रमिक हा आपल्या देशावर लागलेला एक कलंक आहे. तुम्ही अगदी निर्भयपणे माझ्याबरोबर चला. त्यातच तुमचं कल्याण आहे. अरे, जनताजनार्दनाच्या सेवेसाठी तर लोकांनी मला निवडून दिलं आहे नं? मी असताना तुम्ही का काळजी करता? चला माझ्याबरोबर!"

खासदार मुत्तरसुंनी एकदा एखादी गोष्ट करायची असं ठरवलं की ती पूर्ण केल्याशिवाय राहणारे ते नव्हते. त्यामुळे अडैक्कलमला आणि त्याच्या बायकोमुलाला समजाऊन सांगून ते त्यांना मद्रासला घेऊन आले. जाहिरातबाजी चालू होतीच. वर्तमानपत्रं आणि मासिकं यात महात्मा गांधी आणि मुत्तरसु यांचे फोटो शेजारी शेजारी छापून आले आणि त्यासोबत बातमीही! "पस्तीस वर्षांपूर्वी आपल्या देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त केलं बापूजींनी आणि आज एका बंधपत्रित श्रमिक मजुराच्या कुटुंबाला सोडवून आणलं खासदार मुत्तरसु यांनी! बापूजींनी देशाबद्दल जे स्वप्न पाहिलं, ज्या कार्याचा आरंभ केला ते स्वप्न पुरं करत आहेत, ते कार्य पुढे नेत आहेत देशसेवक खासदार मुत्तरसु. मुत्तरसु आणि त्यांचा पक्ष विजयी होवो!"     

राज्याच्या राजधानीतही एक प्रचंड मोठी सभा आयोजित केली होती. काही समाजसेवी संस्थांनी एकत्र येऊन ही सभा आयोजित केली आहे अशी जनतेची समजूत करून दिली होती. व्यासपीठावर निरनिराळ्या गटांच्या पुढाऱ्यांचे फोटो लावलेले होते. ह्याच सभेत मुत्तरसुंनी आपल्या भोपाळ दौऱ्याचं अगदी रसभरीत आणि तितकंच हृदयद्रावक वर्णन केलं आणि घोषणा केली, "जनताजनार्दनाच्या सेवेचं व्रत घेतलेल्या माझ्यासारख्याला मजुरांवरील क्रूर अत्याचार पाहून गप्प बसता येणं शक्यच नाही. आपल्या सर्वांसमोर मी शपथ घेतो की हा सामाजिक कलंक दूर करण्यासाठी मी माझे प्राण देखील द्यायला तयार आहे. बंधुभगिनींनो, आपला प्रतिनिधी म्हणून तुम्ही मला निवडून दिलं आहे. मला माझी जबाबदारी पार पाडलीच पाहिजे." हजारो प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या कडकडाटात आणि मुत्तरसुंच्या जयजयकारात सभा संपली पण त्यापूर्वी मुत्तरसुंना जनतेतर्फे "बंधपत्रित श्रमिक मुक्तिदाता" अशी पदवी प्रदान करण्यात आली. 

मुत्तरसुंच्या बंगल्याच्या आऊटहाऊसमध्ये अडैक्कलमच्या कुटुंबाची राहण्याची आणि जेवणाखाणाची सोय करण्यात आली. रोज संध्याकाळी निवडणुकीच्या सभेला जाताना मुत्तरसुंच्या गाडीच्यापाठोपाठ एका जीपमधून अडैक्कलम, त्याची बायको आणि मुलगा यांना ’प्रदर्शनासाठी’ नेलं जात असे. सभा चालू असताना एखादा पुढारी मुत्तरसुंच्या भोपाळ दौऱ्याचं वर्णन सुरू करायचा. पाठोपाठ अडैक्कलमला बायकोमुलासहित व्यासपीठावर आणलं जायचं आणि "हेच ते कुटुंब ज्यांना खासदार साहेबांनी गुलामीतून सोडवलं आणि इकडे आणलं." असं मोठ्या ऐटीत सांगितलं जायचं. लोकही टाळ्या वाजवून मुत्तरसुंचा जयजयकार करायचे. ’बंधपत्रित श्रमिक मुक्ती’ हे फूल आता चांगलंच फुललं होतं आणि त्याचा सुगंध दूरपर्यंत पसरला होता. त्यामुळे सभांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली होती. मुत्तरसु नशीबवान होते कारण त्यांच्या मतदारसंघात अडैक्कलमच्या जातीचे लोक खूप होते. मुत्तरसुंनी त्यातल्या ठळकठळक लोकांना हेरलं आणि खुबीनं त्यांना आपल्या प्रचारकार्यात सामील करून घेतलं. सर्व गोष्टी त्यांच्या योजनेप्रमाणे घडत होत्या. निवडणुका संपेपर्यंत अडैक्कलमच्या कुटुंबाचं आदरातिथ्य अगदी खास पाहुण्यासारखं केलं जात होतं. त्या बिचाऱ्यांना हे सगळं स्वप्नासारखंच वाटत होतं. स्वच्छ कपडे, खायलाप्यायला अनेक स्वादिष्ट पदार्थ शिवाय वरखर्चाला पैसे! निवडणुका संपल्यावर मुत्तरसु आपल्याला कुठे तरी चांगलीशी नोकरी देतील ह्याबद्दल अडैक्कलमच्या मनात जरासुद्धा शंका उरली नव्हती.

निवडणुका झाल्या, निकालही लागले. मुत्तरसु प्रचंड बहुमतानं निवडून आले. त्यांच्या ह्या विजयासाठी एक मोठी सभा आयोजित केली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे एक मोठे नेते होते. अडैक्कलमला ह्या सभेला आणलं नव्हतं. मुत्तरसुंना आता पाच वर्षं काही काळजी नव्हती. आता त्यांना अडैक्कलमची काहीच गरज नव्हती! ह्या विजयसभेत कोणीही वक्ता किंवा खुद्द मुत्तरसु ह्यांनी वेठबिगारीबद्दल एक अक्षरही उच्चारलं नव्हतं. सगळेजण पक्षाबद्दल आणि पक्षनेत्यांबद्दल मात्र भरभरून बोलत होते.

अडैक्कलम स्वतःच बायकोमुलाला घेऊन सभेला आला होता. बिचारा एका कोपऱ्यात बसला होता. मुत्तरसुंनी भर सभेत व्यासपीठावरून जाहीर केलं की पक्षनेत्यांच्या कृपेमुळेच मी ही निवडणूक जिंकू शकलो. माझ्यासारख्या, पक्षाच्या एका साध्या कार्यकर्त्याला त्यांच्या मदतीशिवाय ही लोकसभा निवडणूक जिंकणं अशक्यच होतं. पुढे ते असंही म्हणाले की आपल्या पक्षनेत्यांचं व्यक्तिमत्त्वच असं आहे की त्यांच्या एका इशाऱ्यासरशी लाखो लोक मतदारकेंद्रावर जाऊन मत देतात.

पक्षनेत्यांनी थोड्याफार फरकानं असंच भाषण केलं. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल मुत्तरसुंनी जे उद्गार काढले त्याविषयी बोलताना ते म्हणाले, "याचं सर्व श्रेय जनतेला, विशेषतः महिला वर्गाला आहे."  भाषणानंतर प्रथेनुसार "सोडा" पिण्याचा कार्यक्रम सुरू झाला. थोड्या वेळानंतर श्रोत्यांमधून आवाज यायला लागले, "नेताजी, आम्हाला पण द्या, आम्ही सर्वांमध्ये वाटून घेतो." आता हा नेताजींच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता. आपल्या अनुयायांच्या मागण्या आपण नाही पुऱ्या करायच्या तर मग कोण करणार? त्यांच्या इशाऱ्यासरशी व्यासपीठावरील एकाने सोड्याची एक बाटली समोर फेकली. दुसऱ्याने ती शिताफीने पकडली आणि थोडा सोडा पिऊन ती तिसऱ्याला दिली. त्याने पिऊन चौथ्याला दिली. अशा दहा-बारा बाटल्या संपल्या. नेताजींनी आणखी थोड्या बाटल्या श्रोत्यांमध्ये वाटल्या. मग काय? ढकलाढकली, हिसकाहिसकी, आरडाओरडा यांची एकच झुंबड उडाली. अडैक्कलमची बायको बिचारी भांबावून गेली आणि नवऱ्याला म्हणाली, "अहो, हे चाललंय काय? उष्ट्या सोड्यासाठी एवढा गोंधळ?" अडैक्कलमनं एक सुस्कारा सोडला आणि म्हणाला, "अगं, हे आपल्यासारखेच बांधील मजूर वाटतायत. आपल्यापेक्षाही वाईट! आपण स्वतःच्या जोरावर काही करू शकतो याचा त्यांना विसर पडलेला दिसतोय. एका माणसाच्या झगमगाटापुढे त्यांनी आपलं मन आणि मेंदू दोन्ही गहाण ठेवलेलं आहे."

तिसऱ्या दिवशी खासदार साहेबांनी अडैक्कलमला बोलावलं आणि त्याच्या हातावर शंभराची नोट ठेवत म्हणाले, "आता तुम्ही आपल्या गावी परत जा बरं. यापुढे तुम्हाला इथे राहता येणार नाही."

अडैक्कलम म्हणाला, "साहेब, आम्ही कुठं जाणार? आमच्यावर दया करा आणि इथंच राहू द्या  आम्हाला. पण आम्हाला काही तरी काम द्या. आम्ही फुकट राहणार नाही."

"अरे, आमचं सरकार तुझ्यासारख्या लोकांसाठी काही ना काही नक्की करणार आहे. तू गावी जा. तिथे तुला पत्र येईल." एवढं बोलून मुत्तरसु घाईघाईनं निघून गेले. 

अडैक्कलम आणि त्याचं कुटुंब तीन चार महिने त्या शहरात आणि आजूबाजूच्या गावात कधी भीक मागत तर कधी मिळेल ते काम करत फिरत होतं. एवढ्या दिवसात पत्र काही आलं नाही. अडैक्कलमनं खासदार साहेबांच्या बंगल्यावर तीनचार चकरा मारल्या. पण खासदार साहेब भेटले नाहीत. उलट त्यांच्या पहारेकऱ्यानं त्याला एखाद्या बेवारशी कुत्र्यासारखं धुडकावून लावलं. भीक मागणं, हुडूतहुडूत करून घेणं, उपाशीपोटी राहणं हेच आता अडैक्कलमचं आयुष्य झालं होतं. शिवाय चोराचिलटांपासून आणि पोलिसांपासूनही भीती होतीच. तो अगदी गांजून गेला. शेवटी एक दिवस ते सगळे गाडीत बसले, तिकिटाला पैसे नव्हतेच. त्यामुळे तिकिटाशिवाय प्रवास करत कसेबसे भोपाळला पोहोचले. स्टेशनावर उतरल्यावर अडैक्कलम तडक अग्रवालकडे गेला आणि त्याच्या पाया पडून त्याची माफी मागायला लागला. अग्रवालचा अडैक्कलमवर राग होताच, शिवाय आता त्याला कामावर ठेवणं अग्रवालला धोक्याचं वाटत होतं. तो अडैक्कलमला लाथ मारून हाकलायलाच निघाला होता पण अडैक्कलमनं त्याचे पाय घट्ट धरले आणि रडतरडत म्हणाला, "साहेब, चूक झाली, एकवार माफी करा. माझ्या बायकोची आणि मुलाची शपथ घेऊन सांगतो की पुन्हा अशी चूक करणार नाही. साहेब, आम्हाला आसरा द्या."

चुकीची शिक्षा म्हणून अग्रवालनं त्याला महिन्याला पन्नास ऐवजी चाळीस रुपयांवर पुन्हा दगड फोडायच्या कामावर ठेवून घेतलं. अडैक्कलमला हायसं वाटलं. राहायला झोपडी, सरपणासाठी जंगलातली लाकडं आणि भाजीपाला काढायला थोडीशी जमीन! अडैक्कलमला वाटलं आपल्याला ह्याच्याहून आणखी काय पाहिजे? कंत्राटदाराकडून थोडं कर्ज घेऊन त्यानं जरुरीपुरती भांडीकुंडी घेतली. पूर्वीप्रमाणेच तिघेही उजाडल्यापासून अंधार पडेपर्यंत दगड फोडू लागले. अडैक्कलम मनात म्हणाला, "आपण वेठबिगारीचे मजूर असू, पण घाम गाळून कमावण्याची संधी तर मिळाली."

दिवसभर दगड फोडून, थकून घरी आल्यावर, रात्री दोन घास खाऊन किंवा कधी कधी नुसतंच पाणी पिऊन जमिनीवर पाठ टेकताना त्याला पुन्हा पुन्हा वाटायचं की खासदार साहेबांच्या बोलण्यावर भुलून आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण तिकडे त्यांच्या बंगल्यात जे दिवस काढले, तीच खरी लाजिरवाणी गुलामी होती. 
=================
मूळ कथा: तमिळ (नाव उपलब्ध झाले नाही.)  लेखक : एन. पार्थसारथी
ह्या कथेच्या हिंदी अनुवादाचा मी मराठी अनुवाद केला आहे.
हिंदी अनुवाद :"बंधुआ दलिद्दर"
अनुवादक : आर. शौरिराजन
स्रोत :  भारतीय कहानियॉं, प्रकाशक : भारतीय ज्ञानपीठ प्रकाशन