असे नव्हते कधी

काळीज माझे हे असे नव्हते कधी
माझ्या उरी इतके ससे नव्हते कधी

साऱ्याच कोनातून मी दिसतो खुळा
इतके खरे हे आरसे नव्हते कधी

गेलो तिच्या दारात नजराण्या विना
झाले असे माझे हसे नव्हते कधी

बंदूक दिसता थांबल्या कां घोषणा ?
बसले असे त्यांचे घसे नव्हते कधी

सोन्यात मढला देव की दिसतात जे
ते आरतीला फारसे नव्हते कधी

चोरून आम्ही भेटलो रात्री जरी
माझे तिचे काही तसे नव्हते कधी

----------------------------------------------------- जयन्ता५२