फेरीवाल्यांना सहानुभूती आणि उत्तेजन द्यावे का?

काही दिवसांपूर्वी आंतरजालावर काथ्या कुटताना बऱ्याचजणांनी मॉलमधून भाजी न घेता रस्त्यावरच्या फेरीवाल्यांकडून आपण का खरेदी करतो अथवा करावी याची बरीचशी कारणे दिली आहेत. त्यातील बहुतेक कारणे ताजी, स्वस्त भाजी घराजवळच्या फेरीवाल्याकडे मिळणे, फेरीवाले गरीब असतात - त्यांच्याकडून खरेदी करून आपण त्यांना मदत करत असतो अशा स्वरूपाची आहेत.

माझ्या माहितीतले बरेच लोकही त्याच मताचे आहेत. आश्चर्याची गोष्ट अशी की हेच लोक आरक्षणामुळे आपल्यावर कसा अन्याय होतो हे कंटाळा येईपर्यंत सांगत असतात. पण फेरीवाल्यांमुळे कायदेशीरपणे दुकान चालवणाऱ्या दुकानदारावर होणाऱ्या अन्यायाचे भागीदार असतात.

बाकी फेरीवाल्यांकडील मालाचा दर्जाची काही खात्री नसणे, फेरीवाल्यांमुळे वाढणारा शहराचा बकाल पणा, त्यांनी केलेल्या घाणीमुळे वाढणारी रोगराई, ती निस्तरताना पालिका, शासन यंत्रणा यांच्यावर येणारा ताण, शासनाचा बुडणारा महसूल, करदात्यांच्या पैशाचा होणारा अपव्यय, फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे लोकांची होणारी गैरसोय, वाहतुकीस येणारा अडथळा, परप्रांतीयांचे वाढणारे लोंढे व त्या अनुषंगाने वाढणारी झोपडपट्टी अशा समस्या असतातच.

मग या सगळ्याला कारणीभूत असलेल्या फेरीवाल्यांना सहानुभूती आणि उत्तेजन देऊन आपण आपल्याच पायावर धोंडा पाडून घेत नाही का?

आपल्याला वाचणारे आपले थोडेसे पैसे या सर्व गोष्टींपेक्षा महत्त्वाचे आहेत का? आपण जर वाढलेल्या रोगराईला बळी पडून, किंवा गाडीवरचे खाऊन एकदा जरी आजारी पडलो आणी डॉक्टरकडे गेलो व सुट्टी घेऊन घरी बसलो तर वाचवलेल्या सर्व पैशांपेक्षा जास्त पैसे घालवणार नाही का?

मग या खरोखरच फेरीवाल्यांकडून खरेदी करणे गरजेचे (/वर्थ) आहे का?