मन्ना डे

         मन्ना डे बऱ्याच दिवसापासून आजारी होतेआणि त्यांचे वयही नव्वदी ओलांडून गेले होते त्यामुळे त्यांचे निधन अनपेक्षित नसले तरी दु:खदच होते यात शंकाच नाही.. त्या काळातील पुरुष गायकापैकी हा शेवटचाच मालुसरा.मन्ना डे यांनी एकादा संपूर्ण काळ व्यापला असे दिसत नाही म्हणजे एका काळात पुरुषाचे गाणे म्हणजे मोहम्मद रफीच किंवा त्यानंतर काही काळ किशोरकुमारच असे जे समीकरण होते तसे मन्ना डे च्या बाबतीत म्हणता येत नाही.एका ठराविक प्रकारच्याच गाण्यासाठी मन्ना डे यांची आठवण व्हायची व बहुधा ती शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी असायची.पण त्यामुळे ती गाणी मन्ना डे यांचीच असा ठसा मात्र उमटला.
      प्रबोधचंद्र डे असे मूळ नाव असलेल्या मन्ना डे यांचा जन्म १ मे १९१९ या दिवशी झाला.के.सी.डे हे संगीतातील तज्ञ. त्यांनी एस.डी.बर्मन यांना संगीताचे धडे दिले होते व  अनेक हिंदी व बंगाली चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले होत तसेच ते स्वत: गात पण असत. ते मन्ना डे यांचे काका असल्यामुळे त्यांच्याकडून संगीताचे धडे ही त्यांना मिळाले.त्यामुळे लहानपणीही त्यांनी बालकलाकार म्हणून लौकीक प्राप्त केला होता.शास्त्रीय संगीताचे पद्धतशीर शिक्षण उस्ताद अमान अली खान व उस्ताद अबदुल रहमान खान यांच्याकडून त्यांनी घेतले.स्कॉटिश चर्च कॉलेजात शिकत असताना कुस्ती व बॉक्सिंगमध्येही त्यांनी प्रावीण्य मिळवले होते त्यांच्या दीर्घायुष्याचे कदाचित ते कारण असेल.
   पार्श्वगायनाचा श्रीगणेशा त्यानी १९४२ मधील ’तमन्ना’या चित्रपटापासून केला.’तमन्ना’चे संगीत दिग्दर्शक के.सी.डे हेच होते व त्यात मन्ना डे यांनी सुरैय्याबरोबर "जागो आयी उषा "हे युगलगीत गायिले होते.आणि ते बऱ्यापैकी गाजलेही होते.आमच्या पिढीला मन्ना डे ची ओळख त्यांच्या "बसंत बहार " मधील "सुर ना सजे" मुळे तसेच "श्री चारसौबीस"मधील "प्यार हुआ "सीमा मधील"तू प्यारका सागर है""दो आंखे बारह हाथ"मधील "ऐ मालिक तेरे बंदे हम" किंवा "लागा चुनरीमे दाग" अश्या निवडक गीतातूनच झाली.राजकपूरसाठी त्यांचा आवाज काही  चित्रपटातून वापरला गेला व तो योग्यही वाटला पण पुढे राजकपूर म्हणजे मुकेश असे समीकरण झाल्यामुळे राजकपूरसाठी गाण्याची संधी त्याना निवडक चित्रपटातच मिळाली.
       शास्त्रीय संगीतावर आधारित गीते म्हणण्याविषयी कुशल अशी प्रसिद्धी  असूनही मन्ना डे यांची अवखळ गीतेही तितकीच प्रसिद्ध झाली.विशेषत: रफी यांच्याबरोबर गायलेले परवरिश चित्रपटातील "मामा ओ मामा"किंवा चलतीका नाम गाडी"मधील "बाबू समझो इशारे" किंवा "पडोसन" मधील किशोरकुमारबरोबर गायलेले "एक चतुर नार" ही गीते त्याची साक्ष देतात.
   मन्ना डे यांनी हिंदी व्यतिरिक्त बंगाली भाषेत गाणी गायली आहेतच व ती त्यांची मातृभाषाच सल्यामुळे ते स्वाभाविकच आहे. मात्र मराठी भाषेत गायलेल्या त्यांच्य गीतांची संख्या इतर कोणाही  मराठी गायकाच्या (एक बाबूजी सोडले तर) तोडीस तोड आहे.त्यांनी ५५ मराठी गाणी गायली आहेत आणि तीही हिंदी पार्श्वगायनातील कारकीर्द ऐन भरात असताना.नाहीतर बहुतेक हिंदी पार्श्वगायकांनी (उदा.रफी व तलत) त्यांच्या हिंदी कारकीर्दीस उतरती कळा लागल्यावर किंवा काही संगीतकारांच्या आग्र्हास्तव (उदा.हेमंतकुमार हृदयनाथ मंगेशकरांच्या आग्रहावरून कोळिगीते ) मराठी गाणी म्हटल्याचे आढळते. " अ आ आई म म मका "(चित्रपट एक धागा सुखाचा) :धुंद आज डोळे" (चित्रपट दाम करी काम).त्याचबरोबर "घन घन माला नभी "(चित्रपट वरदक्षिणा) ही त्यांची गाजलेली चित्रपटगीते."घरकुल" चित्रपटातील "हाउस ऑफ बॅम्बू "हे वेगळ्या शैलीचे गीतही लोकांनी खूपच डोक्यावर घेतले होते.             
   खेमचंद प्रकाश यांच्याबरोबर "श्री गणेशजन्म" व "विश्वामित्र" व "महापूजा " या चित्रपटाचे संगीत त्यांनी स्वतंत्रपणे दिले पण या चित्रपटाची गीते फारशी गाजली असे वाटत नाही.सर्व संगीत दिग्दर्शकांबरोबर गीते गायलेल्या मन्ना डे यांनी नौशाद यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली मात्र गायलेले दिसत नाही कदाचित मोहंमद रफी हे नौशाद यांचे आवडते गायक असण्याचा परिणाम असावा व त्यांच्यानंतर महेंद्र कपूर यांच्यावर नौशाद यांची भिस्त होती असे दिसते.(माहिती चुकीची असल्यास दुरुस्ती अपेक्षित)
 मन्ना डे यांना ही  भावपूर्ण  श्रद्धांजली !