राजगडावरची दिवाळी

राजगडला मी पहिल्यांदा गेलो तो युवाशक्ती आणि यूथ हॉस्टेल यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या सिंहगड ते रायगड मोहिमेत. पण त्या मोहिमेत रायगड सोडता सगळेच किल्ले पहिल्यांदा पाहत होतो त्यामुळे 'परत यायला हवे' असेच सिंहगड-राजगड-तोरणा या त्रिकूटाबद्दल वाटले. त्यानंतर त्यातला सिंहगड कॉलेजच्या पहिल्या सेमिस्टरमध्येच आठवड्यात किमान एकदा असा झाला. कॉलेजला दांडी मारल्यावर राहुल, अलका किंवा सिंहगड इतकेच पर्याय प्रशांत आणि माझ्या संयुक्त यादीत होते. आणि आठवड्याला तीन दांड्या ही आमची सरासरी होती.
पण कॉलेजच्या दुसऱ्या वर्षी जाईस्तोवर सिंहगडाचे कौतुक ओसरले होते. आणि मी परत प्रेमात पडलो होतो.
प्रेमप्रकरण सुदैवाने दोनेक महिन्यांतच विझले आणि दिवाळीच्या सुटीत मी प्रेमभंगाचे दुःख साजरे करायला पुण्याबाहेर कुठेतरी जायचे ठरवले. एव्हाना दिनकरची आणि वसंताशी ओळख होऊन ती मैत्रीत रूपांतर पावलेली होती. आणि दिनकरने दिवाळीत राजगडला जाऊन राहण्याचा विषय काढला. कुठलीही नवीन कल्पना समोर आली की ती कशी अव्यवहार्य आहे हे ठामपणे सांगण्याच्या सिनिसिझमपासून तोवर तरी मी मुक्त होतो. त्यामुळे मी त्याला सहर्ष संमती दिली. वसंता मात्र दिवाळी कुटुंबासमवेत करण्याच्या मोहापासून दूर झाला नाही.
मी राजगडवर एकदा जाऊन आणि दोन दिवस राहून आलेला असल्याने मला तिथली सर्व माहिती आहे हे आम्ही दोघांनी गृहीत धरले. उत्साहाने हॅवरसॅक भरली. पायथ्याच्या कुठल्या गावापर्यंत एस्टी जाते याची जुजबी चौकशी मी गुपचूप केली. आणि दिनूसमोर "वेल्ह्याची बस घ्यायची, मार्गासनीला उतरायचे, तिथून साखर आणि मग किल्लाच" अशी सोपी मांडणी करून टाकली. दिनूही लगेच विश्वास ठेवता झाला.
तत्प्रमाणे आम्ही स्वारगेटहून सकाळी सातची वेल्हा बस पकडली. आमचे स्वप्नाळू चेहरे, हॅवरसॅक्स आणि अंगावर उठलेले रोमांच यामुळे बसमधल्या सर्वांना आम्ही किल्ल्यावर निघालो आहोत एवढे कळले. त्यातल्या एका मावळ्याने चौकशा करायला सुरुवात केली. "राजगडला निगाले जनू? ". या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी आल्यावर "रहानार की लगीच परतनार? ". चार दिवस तरी राहणार हे कळल्यावर त्याने खुषी व्यक्त केली (खिडकीतून एक लालभडक पिंक बाहेर टाकली). "वाजेघरवरून जानार जनू? ". मी जी माफक चौकशी केली होती त्यात वाजेघर हे नाव कुणी घेतले नव्हते म्हणून मी जरा गडबडलो. पण लगेचच सावरून "छे छे, आम्ही आपले साखरवरूनच जाऊ" असे वदता झालो. "तिकून लई अवगाड जाईल, वाजेघरासनं नीट पडंल बगा" या मावळी सल्ल्याला "साखरवरून गेलोय आधी" असे सत्य उत्तर दिले.
अर्थात उत्तर सत्य असले तरी ते जाणे तीन वर्षांपूर्वी झालेले होते, तेव्हा तो परिसर नीट ठाऊकी असलेला तुकडीप्रमुख आम्हांला हाकलायच्या कामी होता आणि एकंदर चालचाल चालण्यामुळे रस्ता असा काही लक्षात राहण्याचे कारण नव्हते हे कशास बोला?
दिनू मजेत बाहेर बघत होता. त्यामुळे त्यावर फार विचारविनिमय झाला नाही. मार्गासनीला उतरताना मी त्या मावळ्याकडे बिलकुल पाहिले नाही. मावळ्याने आम्हांला निरोप म्हणून अजून एक पिंक मार्गासनीच्या तिठ्यावर मारली. आम्ही चालू पडलो.
दिवाळीचा पहिला दिवस होता. थंडी चांगली होती. धुकट हळूहळू उठत होते. राजगड समोरच दिसत होता. दिनू पहिल्यांदाच इथे आल्यामुळे खूपच भारावून गेला होता. "राजांचा गड आणि गडांचा राजा म्हणतात ते काही खोटे नाही" असे काहीबाही बोलत होता. मी न बोलता हा परिसर ओळखीचा वाटतो की नाही हे मनातल्या मनात तपासत होतो. खुणा काही जुळत नव्हत्या. शेवटी 'किल्ला तर दिसतो आहे समोर, जाऊ कसेतरी' असा विचार करून पावले टाकत राहिलो.
नक्की कुठली वाट घेतली वा कुठे रस्ता चुकलो ठाऊक नाही. पण रस्ता चुकलो एवढे खरे. तासभर जाळ्या-झुडपांमधून घुसारा करीत राहिलो, थोडेसे चढत राहिलो आणि तेवढीच माघारही घेत राहिलो. "मला वाटतं इथे पुढे उजव्या हाताला" असे अस्पष्ट पुटपुटत मी घुसखोरी चालू ठेवली. शेवटी दमून एका ठिकाणी बसकण मारली आणि "झाडी खूपच वाढलेली दिसते गेल्या तीन वर्षांत" अशी प्रस्तावना केली. त्याला एका  अदृष्य म्हशीने डुरकून संमती दिली. मी आनंदाने उभाच राहिलो. म्हैस हे पाळीव जनावर आहे. आणि झाडीत ते चरायला सोडले तरी म्हैस राखणारा कुठेतरी आवाजाच्या टप्प्यात असणार एवढा हिशेब मला उमगला. मग आवाजाच्या अनुरोधाने ती म्हैस हुडकली. आम्हांला ठाऊक नसलेल्या पायवाटा म्हशीला मात्र नीट माहीत होत्या. त्यातल्या एका रुंदशा पायवाटेवरूनच ती चालली होती. आणि ती पायवाट आमच्यापासून जेमतेम तीस फुटांवर होती. एकदा पायवाट सापडल्यावर मग गुराख्याची गरज उरली नाही (असे तेव्हा तरी वाटले). वाटेचा चढता भाग आम्ही पायांखाली घालायला सुरुवात केली. पुढे एकदोनदा पायवाटांचा तिठा लागल्यावर जरा बुचकळ्यात पडलो खरा, पण 'पायवाट सोडायची नाही' एवढा निश्चय करून वाटा धुंडाळत राहिलो. आणि दोनेक तासांनी मला आठवत असलेल्या रॉक पॅचपर्यंत पोहोचलो. तिथे अप्पा दांडेकरांनी स्वखर्चाने रोवलेले रेलिंग झिडपिड्या अवस्थेत का होईना शाबूत होते. आनंदात पद्मावती माची गाठली आणि देवळात हॅवरसॅक्स टाकल्या.
अख्ख्या गडावर कसलाही आवाज नव्हता. पद्मावतीच्या तळ्याचे पाणी हिरवट दिसत होते. पण पिण्यासाठी तेच वापरणे भाग होते. देवळाच्या ओसरीला बसून आम्ही पोटपूजेच्या तयारीला लागलो. किल्ल्यावर जाऊन राहण्याची पहिलीच वेळ असल्याने स्वैपाकाचे धाडस केले नव्हते. ब्रेड, उकडलेली अंडी, सफरचंदे, चीज, चिवडा, चकल्या, लाडू, गूळपोळ्या असलेच साहित्य होते. त्यातले ब्रेड नि अंडी आधी पटावर घेतले. खाऊन होईस्तोवर शांतता नाही म्हटले तरी अंगावर येऊ लागली. सॅक्स देवळातच ठेऊन बालेकिल्ला गाठला. तिथून सिंहगड, पुरंदर, तोरणा, रायगड हे माहीत असलेले किल्ले मन लावून बघितले आणि विवेकानंद या विषयावरचे दिनूचे प्रकट चिंतन ऐकत बसलो. ते चिंतन तसे माझे पाठ झालेले होते म्हणा.
सूर्य माथ्यावर आल्यावर आमच्या डोळ्यांवर झापड येऊ लागली. मग एका पडक्या चौथऱ्याच्या चतकोर सावलीला लोळण मारली ती सावल्या कलत्या झाल्यावरच डोळे उघडले.
रात्रीचा मुक्काम देवळात करायचा आणि सुवेळा-संजीवनी या माच्या दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी पायाखाली घालायच्या असे साधारण ठरले होते. त्यानुसार बालेकिल्ला अगदी रमतगमत पिंजून काढला आणि सूर्यास्त बघायला पद्मावती माचीवर उतरलो. 
देवळात कुणीतरी येऊन गेल्यासारखे वाटले. पारले ग्लुकोजच्या पुड्याचे एक वेष्टण सकाळी तिथे नव्हते असे दिनूचे मत पडले. त्यावर माफक विचार केला आणि संध्याकाळी जेवायला काय काढावे यावर गंभीर विचार केला आणि ब्रेड-अंडी संपवायला घेतली. संपली नाहीत.
एव्हाना अंधार अगदी मिट्ट काळा झाला होता. खाली खोऱ्यामध्ये मिणमिणणाऱ्या दिव्यांमुळे एक वेगळेच उदास वातावरण जाणवत होते. वर पाहिले, आणि आभाळात एवढ्या चांदण्या असतात याचा नव्याने शोध लागल्यासारखे आम्ही हरखून
जाऊन आकाशनिरीक्षण करीत बसलो आणि झोप डोळ्यांवर रेंगाळायला आली तेव्हा
ओसरीत परतलो
सकाळी जाग आली तीच दोन-तीनजणांच्या बडबडीच्या आवाजाने. बाहेर येऊन पाहतो तर तळ्यावर अंघोळीला तिघेजण आलेले होते. थंडी चांगलीच जाणवत होती. त्यामुळे पहिला तांब्या कुणी अंगावर घ्यावा याबद्दल एकमेकांना प्रोत्साहन देणारी चर्चा चालू होती. "तुम्ही घ्या अंघोळी करून, मी जरा आलोच" म्हणत त्यातला इनामदारनामक मानव देवळाच्या आवारात असलेले एक टमरेल भरून घेऊन चालता झाला. ते टमरेल गळके आहे हे त्याला सांगायचे विसरलो. उरले दोघेजण. एक वैद्य आणि एक नेने. "वैदूबुवा, तू मारून घे आंघोळ. मी जरा व्यायाम करून घेतो" असे नेने वदला. "नेन्या, आयुष्यात एकदा तरी सरळ नि खरे बोल रे. पाणी गार आहे म्हणताना आता व्यायाम आठवला काय? गेल्या अख्ख्या वर्षात १४७ शनिवार पेठ इथे वास्तव्यास असलेल्या नेने कुटुंबातल्या एकाने तरी व्यायाम केला आहे काय रे? " असे वैद्यबुवांनी अस्त्र सोडले. "जाऊ दे वैदूबुवा, चांगल्या कामाची कधीतरी सुरुवात करायलाच लागते. आणि चांगली कामे कोंकणस्थ नाही सुरू करणार तर काय सीकेपी?" असा नेन्यांनी फाटा फोडला. तांब्या कुणी पाण्यात बुडवला नाही. आमची चाहूल लागल्यावर स्वपरिचय करून देण्याची फेरी झडली. ते तिघे आदल्या संध्याकाळी आले होते नि वरती बारूदखान्यात मुक्कामाला राहिले होते. पारले ग्लुकोच्या पुड्याचे वेष्टण त्यांचेच.
एव्हाना "च्यायला हे टमरेल भिकारचोट गळकं आहे रे" असा घोष करीत इनामदार परतले. "मग इन्न्या, केलंस काय? पालापाचोळा? जपून हो, चुकून एखादे विषारी नाहीतर खाजकुयलीचे पान घेतले असशील तर बोंबलत बसशील" इति वैद्य. त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून इनामदार संथपणे आपला डायलॉग येणेप्रमाणे पूर्ण करते झाले "बरं तर बरं मी या नेन्याचा रुमाल घेऊन गेलो होतो". नेनेबुवांनी एक शिव्यांची माळ लावली. दिवाळीची सुरुवात तर झाली.
हे तिघे नुकतेच इंजिनियरिंग कॉलेजमधून पार होऊन नोकऱ्यांना लागले होते. एक टेल्को, एक बजाज ऑटो आणि एक बजाज टेंपो. आणि जन्मापासून एकमेकांना ओळखत होते. शिवाय पत्ता 'शनिवार पेठ, पुणे'. त्यामुळे नंतर करमणुकीची अजिबात कमतरता नव्हती.
मी राजगडवर आधी येऊन गेलो आहे म्हणताना माझ्या गळ्यात वाटाड्याची माळ घालण्यात आली. अर्थात एकदा किल्ल्यावर पोहोचल्यावर वाट चुकण्याची शक्यता खूपच अंधुक असल्याने मीही खाली मान घालून ती माळ स्वीकारली.
आंघोळी दुपारी केल्यातर जास्ती चांगले असते असा निष्कर्ष एकमताने निघाला आणि आम्ही सुवेळा माचीकडे मोर्चा वळवला. रमत गमत सुवेळा माचीचे टोक गाठले. मग नेढ्यात बसून भंवताल निरखत बसलो. वैद्यचा आवाज बरा होता. त्याने 'वेडात मराठे वीर दौडले सात' इ हातखंडा गाणी गरजवली. मग जेवायला परतलो. आम्ही दोघांनीही मुक्कामाला बारूदखान्यातच यावे असे सुचवण्यात आले. देवळात नाहीतरी थंडी चांगलीच जाणवत होती त्यामुळे आम्हीही निमंत्रणाचा सहर्ष स्वीकार केला.
बारूदखान्याचा भिंती किमान दोन फूट तरी जाड होत्या. लाकडी दरवाजा कडी लावता येईल इतपत सुस्थितीत होता. आत शिरून दरवाजा लावला की दिवसाही बॅटरी लावायला लागेल इतका मिट्ट अंधार होई. दुपारची डुलकी तिथेच मारली आणि तिपारी परत बालेकिल्ला गाठला. पार सूर्य अस्ताला जाण्याच्या जरासेच आधी परतलो.
त्रिकूट उत्साही होते. त्यांनी जेवण तिथे करण्याची सामग्री आणलेली होती - डाळ, तांदूळ, पातेले इ. पण तिघेही व्यवहारचतुरही होते. 'स्वैपाक करण्याचे जमले नाहीच तर' म्हणून त्यांनीही पुरेसे भूकलाडू आणले होते.
संध्याकाळ उलटून रात्र होऊ घातली आणि इनामदार अचानक उठले. स्टेनलेस स्टीलची लांबलचक टॉर्च त्याकाळात (तरी) खूपच वापरात असे. त्या टॉर्चची काच आणि काच ज्यात बसवली आहे ते एक नरसाळ्याच्या आकाराचे आंत्रपुच्छ मूळ टॉर्चपासून विलग करता येत असे. मग फक्त एक फुगलेल्या पावट्याच्या आकाराचा बल्ब आणि ज्यात सेल्स भरले जात ते लांबलचक नळकांडे एवढे उरे.
ते नळकांडे त्याने बारूदखान्याच्या एका कोपऱ्यात जमिनीवर उभे ठेवले नि टॉर्च चालू केला.
मिणमिणता दिवा लागला. नंतर त्याने घड्याळ, आंगठी आदी वस्तू काढून तिथे ठेवल्या आणि बाहेरून रानफुले तोडायच्या कामाला तो लागला.
ही काय भानगड? तर तो लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त होता हे त्याला अचानक आठवले होते.
मग आम्ही सगळेच उत्साहाने लक्ष्मीपूजनाच्या तयारीला लागलो. म्हणजे काय, तर रानफुले तोडून ती पैसे-घड्याळे-आंगठ्या आदी वस्तूंवर वाहिली.
इतकेच नव्हते. इनामदारबुवांनी मग एक 'लॉर्ड नेल्सन'चा खंबा काढला. विवेकानंद रम पीत असल्याचा कुठेही उल्लेख नसल्याने दिनू अर्थातच आमच्यात नव्हता. बाकीच्या चौघांची त्या रात्री चांगलीच दिवाळी झाली. एक तर 'लॉर्ड नेल्सन' ही मिलिट्रीत 'खच्चर रम' म्हणून प्रसिद्ध. म्हणजे ही रम पाजल्यावर खेचरेदेखिल कष्टाच्या चढाईला सहज तयार होतात अशी वदंता. आम्हा चौघा गाढवांना ती भरपूर झाली. रात्री जेवलो की नाही, आणि काय जेवलो ते आठवत नाही.
सकाळी उठायला चांगलाच उशीर झाला. दरवाजा उघडेस्तोवर बाहेर किती लख्ख उजाडले ते कळलेच नाही. आपापली डोकी आपापल्या धडांवर आहेत ना याची हलकेच चाचपणी करीत आम्ही बाहेरच्या चौथऱ्यावर बसलो. दिनू तेवढा उत्साहात होता.
तेवढ्यात काहीतरी चिडवाचिडवी झाली आणि वैद्यबुवा रागारागाने चहा करायच्या तयारीला लागले. अमूलची दुधाची पावडर. तिचे गुठळ्या होऊ न देता दूध करणे हे सुसज्ज स्वयंपाकघरातदेखिल साधायला कठीण. इथे तर चूल पेटवण्यापासून तयारी. डझनावारी काड्या खर्चून चौथऱ्याच्या एका कोपऱ्यात अखेर चूल थोडीशी धुमसायला लागली. पण त्यावर फारतर भुईमुगाची एखादी शेंग शेकवता आली असती. पण असे इनामदारने बोलून दाखवल्यावर वैद्य फारच चिडला. त्याने त्यांच्या त्या एकुलत्या पातेल्यात पाणी, साखर, दूध पावडर आणि चहापावडर हे सगळे एकदम घातले. आणि त्या 'आगी'वर ते भांडे ठेवून तो रागारागाने ते ढवळत बसला. खालच्या धुमसणाऱ्या गवत नि पातेऱ्याला फू फू करणे चालू होतेच. पंधरावीस मिनिटांनी ते मिश्रण थोडेसे कोमट झाल्यासारखे वाटले तशी तत्परतेने त्याने ते उपलब्ध ग्लासांमध्ये ओतले (गाळणी आणायला विसरण्यात आले होते) आणि प्रत्येकाला दिले. आम्हा दोघांना माणुसकी म्हणून त्याने अगदी दोन दोन चमचेच दिले. आम्ही एकमेकांकडे पाहत बसलो.
मग नेने उठला. एक मोठ्ठा आळस देऊन तो चौथऱ्यावरून उतरला आणि सहज म्हणून इकडे तिकडे फिरू लागला. इनामदारही त्याच्या मागोमाग उतरला. वैद्य संशयाने दोघांकडे पाहत राहिला. आणि आळस देताना सफाईने ग्लासातला 'चहा' झुडुपांत ओतताना त्याने नेन्याला पकडले. नेन्याचे उत्तर तयार होते "अरे, या झुडुपांना तरी कधी असला फर्मास चहा प्यायला मिळणार? म्हणून स्वार्थत्याग करतोय झालं". त्यावर वैद्यबुवांचा प्रश्नही तयार होता "या झुडुपांची आठवण काल रात्री रम झोकताना नाही झाली ती? ". त्यावर इनामदारचे उत्तर "अरे रम वाईट ना तब्येतीला, म्हणून ती स्वतः घेतली. आणि हा आरोग्यदायी चहा झुडुपांना देतोहोत".
सुदैवाने झकाझकी तेवढ्यावरच निभावली. मग त्या दिवशीचा फेरफटका कसा करायचा ते आखले. म्हणजे काय, तर संजीवनी माची गाठली. तिचे चिलखती बुरूज, एका आत एक अशा भिंती, समोर डोंगरधारेच्या टोकाला दिसणारा तोरणा हे तोंडात बोट घालून पाहिले. आणि इंजिनियरिंग कॉलेजमधले देधमाल किस्से ऐकत परतलो.
दुपारी जेवताना मी फर्ग्युसनमधले किस्से काढले. माझ्या गोवा एन सी सी कँपच्या वर्णनावर तर तिघेही जाम खूष झाले. संध्याकाळपर्यंत टिवल्याबावल्या करण्यात वेळ गेला.
त्या दिवशी का कुणास ठाऊक, खूप शांत नि उदास वाटत होते. सूर्यास्तापासून ते दुसऱ्या दिवशी उजाडेपर्यंत काही फारसे बोललोच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्रिकूटाने त्यांची परतीची वेळ आल्याचे जाहीर केले. "दिवाळीपाडव्याला घरी वाट बघणारं कुणी नाहीये रे अजून (खोल उसासा), पण भाऊबीज गाठायला लागते बाबा" इति नेने.
त्यांना निरोप द्यायला चार पावले गेलो नि परतून परत देवळाच्या ओसरीला विसावलो. बारूदखान्यातला अंधार दोघांसाठी फारच अंगावर आला असता.
दुसऱ्या दिवशी आम्हा दोघांनाही परतायचे होते. त्यामुळे असेल, उदासलेल्या अवस्थेतच भिरीभिरी हिंडत राहिलो. खालच्या खोऱ्यात कुठेतरी लाऊडस्पीकर लावला होता त्यावरची गाणी तरंगत येत होती. ती झेलत बसलो.
रात्री बराच वेळ झोप आली नाही. पोट भरलेले मांजर जसे उगाचच कुठेतरी टक लावून बघत बसते तसे आम्ही दोघेही मुकाट बसून राहिलो.
सकाळ झाल्यावर सामानसुमान आवरले नि उतरायला लागलो. उतरताना रस्ता चुकायचे झाले नाही. थेट मार्गासनी गाठेस्तोवर मुकाट चालत राहिलो.
तिथे गेल्यावर कळाले की एस्टीला बराच उशीर आहे, पण विंझरच्या फडक्यांचे ट्रक्स दुधाचे कॅन घेऊन पुण्याला जाये करीत असतात त्यांच्यातून आम्हांला जाता येईल.
माहिती देणारा अर्धवट होता बहुतेक. वाजलेले सकाळचे दहा. तेव्हा दूध घेऊन ट्रक पुण्यात पोहोचून काय करणार? पण एक ट्रक आला खरा. तो ट्रक रिकामा होता आणि पुण्याला नव्हे तर नसरापूरला काही दुरुस्तीसाठी चालला होता. तेवढे तर तेवढे करत नसरापूर, आणि तिथून मग एक दुसरा ट्रक करीत जेवणवेळेस घरी पोहोचलो.
तीस वर्षे झाली. त्यानंतर राजगडच्या पायथ्यापर्यंत एकदोन वेळेस गेलो तेवढाच. दिनूची गाठ होऊनही डझनभर वर्षे झाली.
कधी आठवण झालीच तर आंतरजालावर जाऊन राजगडचे फोटो पाहतो. आणि "आम्ही गेलो तेव्हा हा परिसर असा नव्हता" हे स्वतःलाच सांगत बसतो.