ताटव्यांमधे काट्यांच्या फुलण्याचे धाडस केले!

गझल
वृत्त: मात्रावृत्त
लगावली: १४+१४=२८
***************************************************

ताटव्यांमधे काट्यांच्या फुलण्याचे धाडस केले!
मरणाशी मैत्री केली, जगण्याचे धाडस केले!!

तू काट कसेही आता नशिबाचे माझ्या पत्ते;
मी पान पान स्वप्नांचे पिसण्याचे धाडस केले!

मी असली सोने सुद्धा विकताना कचरत होतो....
लोकांनी माती सुद्धा विकण्याचे धाडस केले!

वाकून वसंतानेही, मज सलाम केला तेव्हा.....
कातळातही मी जेव्हा, रुजण्याचे धाडस केले!

माणसे कशाची तेथे श्वापदे अघोरी होती!
त्या हिंस्र माणसांमध्ये रुळण्याचे धाडस केले!!

अतिरेक जाहला होता, अतिरेक्यांचा त्या गावी...
भूसुरुंगातुनी सुद्धा फिरण्याचे धाडस केले!

मी काटकुळा अन् माझा प्रतिस्पर्धी राकट होता!
घेवून नाव देवाचे, भिडण्याचे धाडस केले!!

पारधी पंख छाटाया, तैनातच होते सारे!
मी मात्र उंच आकाशी उडण्याचे धाडस केले!!

ती बड्या बड्या धेंडांची बसलेली पंगत होती;
मन घुसमटले तेव्हा मी, उठण्याचे धाडस केले!

देहाने अपंग होतो, मन सशक्त होते माझे!
इतक्याच देणगीवरती, पळण्याचे धाडस केले!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१