पाककलेची ऐशी तैशी !

            अगदी पुराणकालापासून  स्वयंपाकाचे काम स्त्रीवर पडले ते केवळ पुरुषाला शिकारीसाठी किंवा आजच्या परिस्थितीत अर्थार्जनासाठी बराच काळ घराबाहेर रहावे लागते या कारणामुळेच.आता मात्र स्त्रीलाही अर्थार्जनासाठी बाहेर पडावे लागत असल्यामुळे सध्या काही स्त्रिया अजूनही  स्वयंपाक करतात ते केवळ ती जबाबदारी कधीकाळी अंगावर पडली होती म्हणूनच (आता ही गोष्टही भूतकाळातच जमा होऊ लागली आहे. आणि त्यामुळे क्षुधाशांतीगृहांना चांगलीच ऊर्जितावस्था आली आहे.,) काही समाजधुरिणांच्या मते आता स्वयंपाकघर ही केवळ शोभेचीच चीज रहाणार,कारण बहुधा नवराबायको दोघेही नोकरीवरून दमून भागून घरी परतल्यावर एकमेकाकडे खाऊ की गिळू म्हणत पाहण्या ऐवजी  बाहेरून आणलेले पदार्थ ज्याठिकाणी खातात त्या जागेलाच ही संज्ञा प्राप्त होणार.
         पण चाणाक्ष स्त्रीवर्गाने ही खरे तर पुरुषाचीच जबाबदारी हे सिद्ध करणे सहज शक्य असताना तसे करण्याचे टाळले ही आश्चर्याचीच गोष्ट. नाहीतर   बल्लवाचार्य हा शब्दच मुळी पुरुषलिंगी आहे त्यामुळे स्वयंपाक ही तर पुरुषाची मक्तेदारी असायला हवी. अगदी अज्ञातवासात पांडव असताना सुद्धा विराटाकडे आचाऱ्याचे काम धर्मराजाने म्हणजे एका पुरुषानेच  केले होते.  अगदी दूरदर्शनच्या इतक्या वाहिन्यांवर पाककलेचे कार्यक्रम सादर करणारे पुरुषच दिसतात.अर्थात निरनिराळ्या वाहिन्या कोणासाठी हे कार्यक्रम प्रसारित करतात आणि हे कार्यक्रम पाहून प्रत्यक्ष स्वयंपाक कोण करणार आहे हे मात्र देवच जाणे ! पण  आश्चर्य म्हणजे आमच्यासारखे सर्वसाधारण पुरुष मात्र स्वत:ला स्वयंपाक येत नाही हे सांगण्यात लाज वगैरे बाळगत नाही उलट काही जण तर अगदी अभिमानानेच सांगताता,"आपल्याला नाही बुवा तसली भानगड आवडत." पण जेव्हां तशी गरज पडते तेव्हां मात्र फटफजिती होण्याची पाळी येते याचा काही काळ तरी अनुभव मला आला.
      मी नोकरीला प्रथम लागलो तेव्हां औरंगाबादला एकटा रहाण्याची पाळी आली तेव्हां  जाणीव झाली की आपल्याला पाकशास्त्राची  तोंडओळख तरी असायला हवी होती. झाली. कारण तेव्हां औरंगाबादमधील होटेल्स खरोखरच केवळ नाइलाज म्हणूनच जेवण्याच्या लायकीची होती.त्यात मांसाहार मला वर्ज्य त्यामुळे तोही प्रश्न उरला नाही  .अगदी नाइलाज म्हणून कोठल्या तरी हॉटेलात मी जेवायला जायचो.माझे दुसरे दोघे खोलीतील जोडीदार नेहनी फिरतीवर असल्यामुळे नियमित खानावळीत जाणे त्याना आवश्यक नव्हते.त्याच वेळी माझा शिकणारा भाऊही माझ्या जोडीस आल्यावर प्रश्न आणखीच बिकट झाला कारण तो आल्यावर दोघांना खानावळीत जाणे त्यावेळी परवडणारे नव्हते. सुरवातीला आम्ही डबा मागवण्याचा प्रयत्न करून पाहिला,कारण वेळेच्या उपलब्धतेनुसार डबा खाणे शक्य व्हायचे. त्यात आमचे रूम पार्टनर पांडे व कुटे असले तर त्यानुसार डब्याच्या सामग्रीत वाढ करणे शक्य व्हायचे पण डब्याचा दर्जा इतका सुमार होता की त्यामुळे सर्वांचीच पोटे बिघडायची.डबा आमच्या कॉलेजच्या मेसमधूनही मागवून पाहिला पण त्यालाही काही फार उत्साहजनकच काय पण कसलीच चव नव्हती.
      त्यामुळे  नंतर आम्ही घरीच स्वयंपाक करण्याचा प्रयत्न केला.त्यात पांडे सर्वात तज्ञ कारण ते बराच काळ एकटे राहिलेले.अजूनही त्यांचे लग्न झालेलेच नव्हते.पण त्याच्या प्राविण्याचा फायदा ते सदैव फिरतीवर असल्यामुळे व औरंगाबादला असतील तेव्हांही कामासाठी बाहेरच असायचे त्यामुळे होण्याची शक्यता नव्हती.तर कुटे यांनी अगोदरच हात वर करून त्यातले आपल्याला काही जमणार नाही असे सांगितले  असल्यामुळे मुख्य भार मी व माझा भाऊ  या दोघांवरच होता. आणि तसे मुख्य जेवणारेही आम्हीच होतो.
      एकदा स्वयंपाक करायचे म्हटल्यावर अक्षरश: संन्याश्याच्या लग्नाला शेंडीपासून तयारी करणेच भाग पडले.त्यामुळे त्यावेळी  पहिल्यांदा आम्ही पितळी कुकर घेतला. प्रेस्टिज अथवा हॉकिन्स कुकर घेतला आणि आमचा स्वयंपाकाचा बेत ओम फस झाला तर इतके पैसे पाण्यात जायचे या विचाराने ! शिवाय त्या वेळच्या आर्थिक परिस्थितीचाही विचार करता पितळी कुकरच घेणे योग्य होते,तो लावायचा कसा याविषयी मी, माझा भाऊ  व कुटे( त्यावेळी फिरतीवर नसल्यामुळे हजर होते.) यांच्यात चर्चा सुरू झाली. कुटे यांच्या मते कुकरमध्ये पाणी घालायचे व कोरडे तांदूळ पातेल्यात ठेवून ते पातेले कुकरमध्ये ठेवून कुकर बंद करायचा व शेगडीवर ठेवायचा कुकरमध्ये घातलेल्या पाण्याच्या वाफेवर पातेल्यातील भात शिजतो.
          मला याविषयी जरा शंका वाटत होती तरी अश्या वेळी दुसऱ्यावर विश्वास ठेवण्याच्या माझ्या स्वभावानुसार मी कुट्यांचे मतच ग्राह्य मानले.पांडे नसल्यामुळे तज्ञ्याच्या अभावी अर्धतज्ञ कुटे यांच्या सल्ल्यानुसार भात कुकरमध्ये लावण्यात आला.कुटे यांच्या बाबतीत आतापर्यंत माझा अनुभव अतिशयोक्तीचा होता. पण या बाबतीत त्यांनी ऊनोक्ती करायचे ठरवले असेल असे वाटले नव्हते, कारण कुकरमधून बरीच वाफ बाहेर पडल्यावर  आम्ही कुकर उघडल्यावर "चौदाशे वर्षे जगून चांगदेव अखेरीस कोराच" तसे बऱ्याच वाफ दवडूनही भात अखेरीस कोरडाच आढळला ! त्यावेळी आम्हा तिघाच्या  डोक्यात प्रकाश पडला की तांदळाच्या पातेल्यातही पाणी घातले पाहिजे.अर्थात ती सुधारणा करताना मात्र जरा अतिशयोक्ती झाल्यामुळे भाताची खीर झाली.
        त्यानंतरचा धडा पोळ्या करण्याचा होता.कणीक भिजवण्याची युक्तीही अशीच पाण्याचे बरेच प्रयोग केल्यावर लक्षात आली.सुरवातीस भरपूर पाणी घालणे आवश्यक आहे ही समजूत होती कारण  सांगकाम्याच्या गोष्टीतील सांगकाम्या पहिल्या वेळी गिरवलेला धडा दुसऱ्यावेळी गिरवताना जसा फजित होतो तीच परिस्थिती आमची झाली होती.भात करताना पाणी कमी पडले ही गोष्ट चांगलीच लक्षात राहिल्यामुळे ती चूक कणीक मळताना करायची नाही हे इतके पक्के ध्यानात ठेवले की सुरवातीस कणकेची लापशीच झाली.
           खरे तर तीच जरा आटवली असती व त्यात तिखट मीठ घातले असते तर भात आणि भाजी दोन्ही करण्याचा त्रास वाचला असता.पण आम्ही तसे न करता त्या लापशीत कणीकच वाढवत बसलो आणि ती पोळ्या करण्याइतकी घट्ट झाली होती तोपर्यंत त्या गोळ्याचा आकार चांगला फूटबॉलएवढा झाला होता.त्याच्या पोळ्या करत बसलो असतो तर सहज एकादा महिना पोळ्या करतच बसावे लागले असते आणि सगळ्या आमच्या वसाहतीतील रहिवाशांना पुरतील इतक्या पोळ्या झाल्या असत्या,  म्हणजे आम्ही करू शकलो असतो, आणि त्यानंतर बाकीचे रहिवासी खाऊ शकले असते  हे अध्याहृत धरले तर ! ती गोष्ट पुढचीच कारण अगोदरच  त्यात एक अडचण होती ती म्हणजे आता पोळ्या लाटायच्या कश्या  (ती गोष्ट भूखंडाचे श्रीखंड लाटण्याइतकी सोपी नव्हती) अर्थात यावर चर्चा सुरू झाली.
    कुटे यानी अगोदरच भाताचा निकाल लावल्यामुळे व धाकट्या भावावर एकदम जबाबदारी टाकणे योग्य नव्हे म्हणून मीच याबाबतीत पुढाकार घ्यायचे ठरवले आणि पोळ्या लाटण्यासाठी अगोदर फूटबॉलच्या चेंडूतला एक छोटा गोळा काढून घेतला मग आई जशी प्रथम पिठीचा शिडकावा पोळपाटावर करते तसाच शिडकावा नाजुक हाताने करून त्या गोळ्यावर लाटणे फिरवायला सुरवात केली व त्यात इतका रंगून गेलो की फिरवता फिरवता गोळा अगदी लाटण्याशी एकरूप झाल्यावर त्याची पोळी म्हणजे एक कणकेची लांबलचक पट्टी तयार झाली आणि ती लाटण्याशी इतकी एकरूप झाली की लाटण्याशी जमलेली तिची गट्टी सोडवता सोडवेना,शेवटी त्यांची एकरूपता ती पट्टी खरडूनच सोडवणे भाग पडले व खरडल्यावर झालेले तुकडे पोळी म्हणून वापरात येणे शक्य नव्हते,यासाठी पोळीची गोळी मधून मधून लाटण्यापासून सोडवून उलटी करून परत तिला पिठीचा थोडा खुराक द्यावा असे ठरले.
      या पद्धतीत आम्ही बरेच यशस्वी ठरलो व जरी आकाराने पोर्तुगाल ,स्वीडन किंवा नॉर्वे अश्या माहीत नसलेल्या किंवा अगदी परिचित म्हण्जे भारताच्या नकाशाशी सदृश आकार पोळपाटावर बनविण्यात आम्ही यशस्वी ठरलो. हे नकाशे भूगोलाच्या उत्तरपत्रिकेत इतक्या सहज पणे काढणे जमले नव्हते याची तेव्हां आठवण झाल्यावाचून राहिले नाही.त्यानंतरची पुढची पायरी म्हणजे तो आकार तव्यावर टाकून भाजून काढणे.अर्थात त्यासाठी त्या आकाराची पोळपाटापासून मुक्तता करणे आवश्यक होते.यावेळी कणकेची गुंडाळी लाटण्यापासून दूर ठेवण्यात आम्ही यशस्वी ठरलो तरी पोळपाटापासून त्या आकाराची मुक्तता करणे आवश्यक होते. यावेळी त्या नकाशाने पोळपाटाशी इतकी घट्ट मैत्री केली होती की त्याना अलग करणे हे "हमारे बसकी बात नही थी " अर्थात याही वेळी लाटण्यापासून कणकेच्या पट्टीची मुक्तता करताना वापरलेला उपायच अमलात आणावा लागला.कारण "सर सलामत तो पगडी पचास" सारखे पोळपाट लाटणे सलामत तो पोळी पचास" ! या फूटबॉलमध्ये पोळी पचासच काय हजारदेखील होण्याची शक्यता होती फक्त त्या कोणी करायच्या हाच प्रश्न होता.तिसऱ्या प्रयत्नात विचित्र आकाराचा का होईना एक तुकडा पोळपाट व लाटण्रे या दोन्हीवरही प्रेम न करणारा आम्हाला मिळाला.अर्थातच त्याची रवानगी तापल्या तव्यावर झाली.इतक्या काळात तवा एवढा खरपूस तापला होता की तो तुकडा त्याच्या सहवासात जाताच कापरासारखा भुरकन जळून गेला तेव्हा तव्याखालील स्टोव्हची आग कमी करायला हवी ही गोष्ट आमच्या लक्षात आली.
  त्यापुढील प्रयोगात पोळपाट लाटणे या दोन्हीशी फारसा लगट न करणारा भारताचा नकाशा बनवण्यात आम्हाला यश आले व तो तव्यावरही सुखाने नांदू लागला त्यामुळे आमचा आनंद गगनात मावेना परंतु तो अधिक काळ तव्यावर फक्त एकाच बाजूने राहू देणे अयोग्य होते हे समजण्याइतके सामान्य ज्ञान आम्ही पैदा केलेले नव्हते व आता त्या तुकड्याची मैत्री तव्याबरोबर झाली होती त्यामुळे त्या दोघांना एकमेकापासून वेगळे करण्यात आमचे हात बरेच भाजून घ्यावे लागले शेवटी त्याला तव्यावर पालथे करून आमच्या कष्टाचे चीज करणारा शेवटचा क्षण म्हणजे आम्ही तयार केलेली पहिली पोळी लाटणे,पोळपाट व तवा या सर्व मित्रमंडळींचा निरोप घेऊन आमच्या ताब्यात आली तेव्हां आमच्या हातात आलेल्या त्या पदार्थास काय नाव द्यावे याविषयीच आमच्या मनात संभ्रम उत्पन्न झाला.त्याच्याकडे पाहून "तुज सगुण म्हणू की निर्गुण रे" या अभंगातील "तुज साकार म्हणू की निराकार रे "या ओळीची आठवण झाली..फूटबॉलच्या काही भागाचे विविध नकाशे बनवून आम्ही त्याचा काही भाग तसाच राखून ठेवला व त्यानंतर भात व पोळी नामक पदार्थांच्या जोडीस काय खाता येईल याचा विचार करू लागलो.
   आता आमटी व भाजी यापैकी एका किंवा दोन्ही पदार्थांची निर्मिती करण्याचा धाडसी बेत आम्ही आखला.   आमटी हा प्रकार तुलनेने सोपा असेल अशी आमची समजूत पण त्यासाठी दाळ शिजवणे ही पूर्वतयारी आवश्यक होती व कुकर लावताना भाताचीच जी दुर्दशा आम्ही केली होती त्यात आणखी दाळीची भर घालण्याची आमची इच्छा नव्हती. दाळीतही पाणी घालावे लागेल इतके ज्ञान मात्र आम्ही संपादन केले होते.आणि ते पुढे उपयोगी पडलेच पण त्यासाठी आता पुन्हा कुकर लावणे आवश्यक होते म्हणजेच आणखी किती वेळ लागेल याविषयी आम्ही अज्ञ होतो त्यामुळे कणिकेचे कडक तुकडे भातासह कसे खायचे याचा विचार आम्ही करू लागलो कारण भाजी करण्यासाठी भाजी आणण्यापासून सुरवात करावी लागली असती.अश्या वेळी "आपण मस्तपैकी पिठले करू "असे उद्गार कुटे यांनी काढल्यामुळे पिठल्यातील ते माहीतगार व्यक्ती असावेत असा आमचा गैरसमज झाला.
   आम्ही वडील धारी माणसे काम करत असल्याने मध्ये बोलणे भावाला योग्य वाटले नसावे.कारण तसे तो घरी राहून आईला मदत करून  थोडासा माहीतगार झाला होता पण त्याने मौन धारण केले होते.सुदैवाने हरभरा दाळीचे पीठ घरात होते.ते तिखट मिठासह पाण्यात मिसळायचे आणि ते पाणी गरम करून अगदी घट्ट करायचे की पिठले झाले अशी माहीतगार कुटे यांची व बिनमाहितगार मी अश्या दोन बुजुर्गांची कल्पना होती. त्याप्रमाणे आम्ही तयारीला लागलो असताना भावाने "त्याला फोडणी पण करावी लागते ना?"असा बॉंबगोळा टाकला. फोडणी हा प्रकार स्वैंपाकात असतो पण तो कोणत्या स्टेजला वापरायचा असतो आणि त्यासाठी काय लागते आणि काय करावे लागते याविषयी आम्ही दोघे माहीतगार अगदीच अनभिज्ञ होतो त्यावर त्याने "आई तापलेल्या तव्यात तेल टाकून त्यात हिंग, जिरे, मोहरी असे पदार्थ टाकते व त्यांचा तड तड असा आवाज आल्यावर त्यावर अगोदर पाणी टाकून मग त्यात हळू हळू गरजेप्रमाणे पीठ मिसळते म्हणजे मग पिठले तयार होते अशी आमच्या ज्ञानात भर टाकली.पिठले काय किंवा आमटी काय किंवा भाजी काय या गोष्टींना चव या फोडणीमुळेच येते. ही माहिती एवढीच आमची पूर्वतयारी होती.
      भावाच्या या सुधारित पद्धतीने मग आमचा पिठले करण्याचा बेत सिद्धीस गेला अर्थातच फोडणीवर पाणी टाकताना त्यातील काही भाग हातावर येऊन हात भाजणे,पीठ टाकताना ते नीट न मिसळता त्याचे गोळे होणे त्यातील काही भागातच तिखटाचे तर काही भागातच मिठाचे अंश सापडणे असे किरकोळ अपघात वगळता गरमागरम पिठले कढईत दिसू लागले व अश्या पाकसिद्धीनंतर आम्ही तिघे त्या तीन पदार्थाचा आस्वाद घेण्यास सज्ज झालो.   
      कुकर असल्यामुळे कुट्यांच्या पद्धतीत सुधारणा केल्यावर त्या सुधारणेचा जरा अतिरेक झाल्यामुळे भात पिठल्याशिवायही खाता येण्याइतका पातळ झाला होता.पण पिठल्यामुळे त्याला बरीच चव आली हे निश्चित.आमची खरी पंचाईत झाली आम्ही तयार केलेले कणकेचे नकाशे पोळ्या म्हणून खाताना.कारण ते अपेक्षेपेक्षा अधिकच कडक झाले होते.परंतु एक पोळ्या सोडल्या तर बाकीच्या स्वयंपाकात आम्ही थोड्याच दिवसात तरबेज झालो. म्हणजे अगदी "आम्ही सारे खवैये " मध्ये भाग घेण्याच्या लायकीचे झालो पण त्यावेळी दुरदर्शन फारच दूर होते आणि त्यामुळे बरेच प्रेक्षक ( की दर्शक) बचावले.