खपली

 भळभळत राही, भरत नाही
 हा जन्म खपली धरत नाही

 तो काळ नुसती भूल देतो
 कां शस्त्रक्रिया करत नाही?

 आणा भले संजीवनी ती
 ही जखम कोणा हरत नाही

 देही? मनी? उपचार कोठे?
 वैद्यांत काही ठरत नाही

 सांगून गेली माय माझी
 हा भोग,बाळा, सरत नाही

 कोणा विचारु 'जन्म कितवा?'
 फेरा पुन्हा की परत नाही?

---------------------- जयन्ता५२