कधी जिंदगी फाटली, कोण जाणे!

गझल
वृत्त: भुजंगप्रयात
लगावली: लगागा/लगागा/लगागा/लगागा
*********************************************

कधी जिंदगी फाटली, कोण जाणे!
कुणी ती पुन्हा टाचली, कोण जाणे!!

कधी सैल होते...कधी घट्ट होते!
कुणी जिंदगी बेतली, कोण जाणे!!

कसा घाटमाथ्यावरी पोचलो मी?
कशी वाट मी काटली, कोण जाणे!

कुणाच्याच हातात तलवार नाही....
कुणी मान ही छाटली, कोण जाणे!

कुठे मोल रक्तास उरले कुणाच्या?
कशी माणसे आटली, कोण जाणे!

कुठे चाळ, चाळीतले लोक गेले?
दुकाने कधी थाटली, कोण जाणे!

कशी भरकटू लागली जिंदगानी?
कधी वाट ही लागली, कोण जाणे!

निसर्गातले हे प्रदूषण समजते....
कशी माणसे बाटली, कोण जाणे!

हरेकाकडे फूल माझेच आहे...
फुले ही कुणी वाटली, कोण जाणे!

तशी प्रकृती फारशी ठीक नाही...
कशी सत्तरी गाठली, कोण जाणे!

नुरे एकही आज फांदी फुलांची...
कुणी ही फुले तोडली, कोण जाणे!

क्षणार्धात तुटलीत नाती जिवाची...
पुन्हा ती कुणी जोडली, कोण जाणे!

घडीबंद ते स्वप्न कित्येक वर्षे...
घडी आज का मोडली, कोण जाणे!

मनाच्या घराची सदा बंद दारे!
कुणी शांतता लाटली, कोण जाणे!!

कधी काळजाची वही नेत नाही...
कशी ती तिने वाचली, कोण जाणे!

गुलाबी स्मृती तेवढ्या फक्त उरल्या...
जवानी कधी संपली, कोण जाणे!

पिता बालबुद्धी, तरी पोरटी ही...
कशी जाणती जाहली, कोण जाणे!

तिच्या फक्त टेकूमुळे हा उभा मी!
कशी साथ ही लाभली, कोण जाणे!!

मिळे पुण्यवंतांस सोबत जिवाची!
मला ती कशी लाभली, कोण जाणे!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१