काळ्या किनारीचे सोनेरी पान

इतिहास हा जेत्यांनी, राज्यकर्त्यांनी लिहिलेला असतो. त्यामुळे जेत्यांना नसलेले गुण चिकटवण्यात आणि पराभूतांना नसलेले दुर्गुण चिकटवण्यात इतिहासकारांचे बरेच श्रम खर्ची पडतात. त्यातून जर जेते वा राज्यकर्ते संकुचित, कोत्या, प्रतिगामी विचारांचे असतील तर विचारायलाच नको. राजकारणातील दबाव हे देखील एक कारण असू शकते. आधुनिक इतिहासकारांना मात्र लोकशाहीचे संरक्षण लाभलेले आहे. त्यामुळे अकबराच्या तथाकथित नवरत्नांपैकी एक असलेल्या अबुल फझलसारख्या तथाकथित इतिहासकारांची भाष्ये विश्वासार्ह अशा ऐतिहासिक पुराव्यांवर तपासून घेण्याची वेळ आलेली आहे असे काही मान्यवरांचे मत आहे. मी काही इतिहासाचा अभ्यासक नाही त्यामुळे अबुल फजलच्या विश्वासार्हतेबद्दल मला काहीही ठाऊक नाही.

पानिपत हे ठिकाण गेल्या सहस्त्रकात फारच गाजलेले आहे. इथे लढल्या गेलेल्या तीनही लढायात स्थानिक राज्यकर्त्यांची अपरिमित हानी झाली आणि परकीय आक्रमकांचे विजय झाले. त्यामुळे पानिपतची रणभूमी ही परधार्जिणी आहे असे म्हटले जाते.

पानिपतला पहिली लढाई झाली परकीय मुघल आक्रमक बाबर आणि अफगाण राजा लोदी यांच्यात. या लढाईत बाबर विजयी झाला. लोदी हा अफगाणीच. विकीवर त्याचा पश्तून असा उल्लेख आहे. पण भौगोलिक दृष्ट्या मुघलांच्या मध्य आशियातील जन्मभूमीपेक्षा तुलनात्मक दृष्ट्या जवळचे. म्हणून कदाचित लोदीला असे आडवळणाने का होईना, काही इतिहासकारांकडून हिंदुस्तानी किंवा स्वकीय म्हटले गेले असावे. नाहीतर लोदी हा हिंदुस्थातानातील राज्यकर्ता होता म्हणून पण असेल कदाचित. तिसरी लढाई जी मराठे आणि अफगाण आक्रमक अहमदशाह अब्दाली यांच्यात झाली ती बहुतेक सर्व मराठी भाषिकांना ठाऊकच आहे.

पानिपतची दुसरी लढाई झाली स्थानिक भार्गवकुलीन सम्राट हेमू विक्रमादित्य विरुद्ध परकीय आक्रमक अकबर. होय सरकारप्रणित शालेय अभ्यासक्रमातील मराठी पाठ्यपुस्तकात न्यायी, सहिष्णु, कलासक्त, गुणासक्त वगैरे विशेषणांनी भरपूर, कदाचित वाजवीपेक्षा जास्तच, भलावण केलेला मुघल बादशहा अकबर यांच्यात. या लढाईनंतरच मुघलांचा हिंदुस्तानात जम बसला. म्हणजे हिंदुस्तानी इतिहासाला वळण देणारी अशी ही महत्त्वाची लढाई होती.

अशा या महत्त्वाच्या लढाईतला हिंदुस्थानी सेनापती सम्राट हेमू विक्रमादित्य याचे नामोनिशाणही माझ्या वेळच्या सरकारप्रणित शालेय अभ्यासक्रमातील इतिहासाच्या मराठी पाठ्यपुस्तकात मला कुठे आढळले नाही. ८ ऑक्टोबर १५५६ मध्ये सम्राट हेमूचा राज्याभिषेक झाला आणि ५ नोव्हेंबर १५५६ रोजी त्याचा मृत्यू झाला. म्हणजे महिनाभर देखील तो सम्राटपदावर नव्हता. हा सर्व काळ तो सतत लढाईत गुंतलेला होता. सम्राट म्हणून जनहिताची कामे करण्यास त्याला अवधीच मिळाला नाही म्हणून कदाचित मराठी शालेय पाठ्यपुस्तक लेखकांना त्याची दखल घ्यावीशी वाटली नसेल. पण शाह बहादूरशा जफरचा उल्लेख मात्र मला पाहिल्याचे आठवते. असो. तो इतिहासकारांचा प्रश्न आहे.

काही वर्षापूर्वी मध्य प्रदेशातील पर्यटनस्थळांविषयी माहिती जमवता जमवता मांडू किंवा मांडवगडच्या इतिहासात बाजबहादूरला पराजित करणार्‍या हेमूचे नाव मी प्रथम वाचले. तेव्हापासून माझ्या मेंदूत सम्राट हेमू विक्रमादित्य (१५०१ ते १५५६) या नावाचे कुतूहल शालेय इतिहासलेखकांवर फुरंगटून बसलेले होते. माळव्याचा राजा भोजदेवा बद्दल देखील मी शालेय इतिहासात काही वाचले नाही. वाचले ते केवळ चांदोबासारख्या मासिकातल्या दंतकथातून. धारानगरीतल्या राजा भोजदेवाच्या अनुल्लेखाबद्दल देखील माझ्या मनात एक असंतोष सतत धगधगत आहे. सध्या भोजराजाच्या भोजशालेचे भग्नावशेष धारानगरीतल्या मुस्लिम राज्यकर्त्यांनी बांधलेल्या वास्तूंच्या भग्नावशेषांच्या विळख्यात बव्हंशी दुर्लक्षित राहिलेले अहेत. असो.

राजस्थानातील भार्गव कुलोत्पन्न ब्राह्मण असलेल्या जमीनदार घराण्यातला हेमू हा एक महत्त्वाकांक्षी आणि कर्तबगार पुरुष. बदलत्या राज्यकर्त्यांमुळे जमिनीची मालकी, जमीनदारी संकटात आली. राजा किंवा सुलतान बदलला की याची जहागीर काढून दे त्याला असे कैक वेळा चाले. अशीच एकदा दिल्लीश्वर बदलल्यावर या भार्गवांची जमीनदारी दुसर्‍याला मिळाली. अशा वेळी मग मातब्बर सरदारांचे लांगूलचालन करून जमीनदारी परत मिळवण्याचे प्रयत्न होत. अशातच धर्मांतरे पण झाली असावी. असो. तर मग जमीनदारी गेल्यावर हेमू बनला व्यापारी. व्यापारात नाव कमावले आणि आपला व्यवसाय पण वृद्धिंगत केला.

सैन्याच्या एका विभागाला दाणागोटा पुरवायचे कंत्राट हेमूने मिळवले. प्रथम छोटे कंत्राट, मग मोठे असे करीत हेमू एक अग्रगण्य व्यापारी झाला, व्यापार्‍यांचा दरबारी प्रतिनिधी देखील झाला. मध्यंतरीच्या काळात हेमूने आपल्या तीन पुतण्यांना लष्करी शिक्षण देऊन काही लढायांत महत्त्वाच्या कामगिर्याद देऊन अनुभवही दिला होता. शूर आणि विश्वासू राजपूत, ठाकूर वगैरेंच्या सैन्याच्या खास तुकड्या त्याने भर्ती करून उभ्या केल्या. काही तुकड्यांचे नेतृत्त्व आपल्या पुतण्यांकडे दिले. हेमूला मूलबाळ नव्हते व एका पुतण्यालाच त्याने दत्तक घेतले होते. या खास तुकड्या रसदेच्या वाहतुकीला संरक्षण देत. त्यामुळे लुटारूंकडून वा शत्रुसैन्याकडून रसदेची लूटमार होत नसे.

हुमायुनाचा पराभव करणारा शेरशहा सूर अगोदर मामुली सुभेदारपुत्र होता. तो याचा बालमित्र. कारण दोघांच्या वडिलांचा कौटुंबिक स्नेह. हेमूची व्यापारातली समज, व्यापार्‍यांच्या अडचणी सोडवण्यातली हुशारी, कर्तृत्त्वातली चमक तसेच सचोटी पाहून त्याला प्रथम शहराच्या करवसुली प्रमुखाचे पद मिळाले. नंतर राज्याचा करमंत्री वगैरे झाला. सुलतानाच्या जवळच्या सरदार नातेवाईकांच्या महत्त्वाकांक्षेमुळे सुलतानपद नेहमीच विश्वासघात, खून आणि रक्तपाताच्या धोक्यात असते. सूरींच्या सुलतानपदाला प्रबळ सूर सरदारांपासून अशा उठावाचा किंवा विश्वासघाताचा धोका होता. तसा तो हेमूपासून मात्र नव्हता. त्याच्या या विश्वासार्हतेमुळे हेमू नंतर दरोगा-इ-चौकी म्हणजे गुप्तहेर खात्याचा प्रमुख आणि नंतर मुख्य प्रधान वगैरे झाला.

कुशल व्यवस्थापन आणि खात्रीची, कालबद्ध, सुरक्षित तसेच दर्जेदार मालवहातूक याच्या जोरावर हेमूने बंदुकीच्या आणि तोफेच्या दारूचे कारखाने काढले आणि सुलतानाच्या सैन्याला त्याने योग्य वेळी लढाईच्या योग्य स्थानी अचूक पुरवठा केला. या काळात त्याचा आपसूकच लढाईतल्या डावपेचांचा अभ्यास झाला असावा. मध्यंतरी शेरशहाचा मृत्यू झाला. शेरशाह सूरीचा (मुलगा जलालुद्दीन ऊर्फ इस्लाम शाह याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा) १२ वर्षांचा नातू फिरोज खान सूरी हा गादीवर आल्यानंतर तीन दिवसांतच त्याला सन १५५३ मध्ये (इस्लाम शाहची बेगम बीबीबाई हिचा भाऊ) मुबरीज खान सूरीने (म्हणजे बालसुलतानाच्या कंसमामानेच) ठार केले व आपण सत्तेवर आला. या मुबरीज खानने नंतर आदिल शाह असे नाव धारण केले.

जाता जाता या मुबरीज खान ऊर्फ आदिल शहाविषयी. हा विलासी असा आदिल शाह सूरी श्रेष्ठ शास्त्रीय संगीत गायक होता व तानसेनाने काही चिजा याच्याकडून शिकून घेतल्या होत्या.

मुळात जमीनदार, नंतर व्यापारी असलेला हेमू नक्कीच असामान्य निरीक्षणशक्ती घेऊन असला पाहिजे. निरीक्षणशक्तीला बुद्धिमत्ता आणि कल्पकता यांची जोड देऊन हेमूने पारंपरिक मैदानी, गोलाच्या लढाईत नवनव्या व्यूहरचना, नवनव्या चाली रचल्या आणि तुटपुंज्या पण वेगवान आणि त्वेषाने लढणार्‍या सैन्यबळावर संख्येने मातब्बर असलेल्या प्रबळ सैन्याविरुद्ध लढाया जिंकल्या. वर उल्लेखलेल्या मुबरीज खान ऊर्फ आदिल शाहने काही लढायात हेमूला आपला सेनापती नेमले.

लढाईच्या अगोदरच आघाडीला माफक संरक्षणात तोफखाना आणि गजदळ सर्वात पुढे डावपेचात्मक दृष्ट्या इष्ट जागी आणून ठेवायचे. तोफांच्या मार्‍याने शत्रूच्या आघाडीची हानी करीन शत्रूला रेटायचे आणि शत्रूची आघाडी विस्कळीत झाली की तीत आपले हत्ती घालून आघाडीचा विध्वंस करून शत्रूसैन्याचे मनोबल खच्ची करायचे. लगोलग वेगवान घोडदळाने दोन्ही बाजूंनी पुढे जाऊन हैराण झालेल्या शत्रुसैन्यावर त्याच्या दोन्ही बाजूंनी आणि पिछाडीवरून अनपेक्षित आणि अचानक हल्ला करायचा असे लढाईचे नवे तंत्र त्याने विकसित केले. या चपळ, वेगवान पायदळाच्या काही तुकड्यांचे नेतृत्त्व हेमूच्या पुतण्यांकडे होते. सैन्याच्या हालचाली हेमू सर्वात उंच अशा हत्तीवरच्या अंबारीत बसून नियंत्रित करी.

जाता जाता हेमूचा आणखी एक गुण. हेमूला घोड्यांची आणि हत्तींची चांगली पारख होती. उत्तमोत्तम घोडे आपल्या खास, राखीव अश्वदलात त्याने भर्ती केले होते. हत्ती हा तर हेमूचा लाडका विषय होता. विविध लढायात गजदलाने बजावलेल्या असामान्य कामगिऱ्यां मुळे गजदळ हेमूच्या अधिकच जिव्हाळ्याचे बनले,

हिंदुस्तानी राज्यांचे शासक हिंदु असोत वा मुस्लिम, रजपूत असो वा मराठे वा अफगाणी. एकमेकांचा द्वेष करणे व आपसात लढाया करणे हे चालूच होते. अकबर, बेहरामखान (बैरामखान) वगैरे मातब्बर मुघल शत्रूविरुद्ध हाजीखान, दौलतखान, वगैरे अतिमहत्त्वाकांक्षी, सत्तालोलुप, स्वतःला भावी सुलतान समजणारे आणि एकमेकांचा अतिद्वेष करणारे अफगाणी सुभेदार एकत्र येतच नव्हते.

दयाळू अकबराचे मुघल जेते सरदार पराभूत सैनिकांचे शिरकाण करीत. मारलेल्या सैनिकांच्या मुंडक्यांचा मनोरा रचून विजयाचा जल्लोष करीत. भाल्याच्या टोकावर मुंडकी खोचून घोड्यावरून दौडत आणि पराभूत सेनापतींची मुंडकी तबकातून बादशहाला नजर करीत. मुघलांच्या या क्रौर्याचा त्यांच्या सर्व शत्रूंनी धसका घेतला होता. आपल्याकडे क्रूर समजल्या गेलेल्या अफगाणांनी देखील. परंतु हुमायूं आणि अकबर यांच्या या क्रूर सैन्याविरुद्ध तोपर्यंत २२ लढाया हेमूने एकदाही पराभूत न होता जिंकल्या होत्या. बहुतेक वेळा तुटपुंज्या सैन्यबळावर. केवळ कुशल रणनीतीमुळे आणि निष्ठावंत सैनिकांमुळे आणि गजदळाच्या नावीन्यपूर्ण वापरामुळे. हेमूच्या खास प्रशिक्षण दिलेल्या राखीव सैन्यात निष्ठावंत राजपुतांचाच भरणा अधिक होता.

अशा या क्रूर मुघलांविरुद्ध आता त्यांच्याविरुद्ध सलग २२ लढाया जिंकलेल्या हेमूचे युद्धकौशल्यच आपल्याला वाचवू शकेल अशीही एक भावना अफगाण सूरी सरदारांच्या मनात असावी असा काही इतिहासकारांचा तर्क आहे. परंतु दिल्लीच्या पूरणा किल्ल्यावर राज्याभिषेक होऊन हेमू विक्रमादित्य हा दिल्लीतला चक्रवर्ती सम्राट म्हणून घोषित झाल्यावर (०७ ऑक्टोबर १५५६) मात्र बहुतेक अफगाणी सरदार हेमूच्या बाजूने मुघलांविरुद्ध उभे ठाकले. हेमूने तुटपुंज्या सैन्यबळावर जिंकलेल्या लढायांची पार्श्वभूमी याला कारण होती. यापैकी २२ लढाया या हुमायूं आणि अकबर यांच्या क्रूर मुघल सैन्याविरुद्ध होत्या. हेमूच्या व्यूहरचनेशिवाय आणि उत्स्फूर्त नेतृत्त्वाशिवाय मुघलांसारख्या मातब्बर शत्रूविरुद्ध पराभव अटळ आहे अशी त्यांची धारणा असावी. एकमेकांचा द्वेष करणार्‍या सर्व मातब्बर सूरी सरदारांना हेमू किंवा हेमराय हाच त्यातल्या प्रत्येकाला स्वतःपेक्षा श्रेष्ठ पर्याय वाटला असावा.

पानिपतच्या या लढाईत हेमूच्या रणनीतीची आखणी नेहमीप्रमाणे होती. परंतु रणनीतीच्या अंमलबजावणीत चुका झाल्या. लढाईअगोदर पुढे आणून ठेवलेल्या तोफा, तिरंदाज आणि हत्तींचा ताफा इष्ट स्थळाच्या आणि मुख्य सैन्याच्या फारच पुढे गेला. त्यामुळे मुख्य सैन्याच्या सभोवार जी सुरक्षा मिळते त्या सुरक्षेच्या आवाक्याबाहेर गेला आणि हा ताफा शत्रूच्या हाती पडला. हेमूच्या मुख्य सैन्यातल्या हत्तींना तोंड देण्यसाठी शत्रूने आपले गजदळ आणि गजदळाचे संरक्षक धनुर्धर पुढे आणून ठेवले. तरी हेमूच्या सैन्याने प्रखर शौर्याच्या जोरावर शत्रूला मागे रेटले. बाजूने आणि पिछाडीवरून केलेल्या घोडदळाच्या हल्ल्यामुळे शत्रूसैन्याचा व्यूह पुरता विस्कळित झाला. पराभव डोळ्यासमोर आल्यामुळे शत्रुसैन्यात पळापळ सुरू झाली. हेमूचा विजय नजरेच्या टप्प्यात आला.

त्याकाळी सेनापतीसाठी लढणारे विश्वासू सैन्य आणि भाडोत्री सैन्य यात मोठा गुणात्मक फरक असे. अजूनही तो तसा असेलच. भाडोत्री सैन्य हे विजयानंतर मिळणार्‍या लुटीसाठी आणि जिंकलेल्या मुलुखातल्या बायकामुली उपभोगण्यासाठी भरती झालेले असे. पराभव डोळ्यासमोर आल्यावर आपल्या सेनापतीसाठी लढणारे सैन्य हे सेनापती जिवंत असेपर्यंत जिवावर उदार होऊन शत्रूची अपरिमित हानी करायचे तर भाडोत्री सैन्य जीव वाचवून जमले तर लुटालूट करीतच पळ काढायचे. तरीही सेनापती गारद झाला तर मात्र विश्वासू सैन्य देखील पळ काढून सुरक्षित जागी जाण्याचा प्रयत्न करीत असे.

०५ नोव्हेंबर १५५६. शत्रूसैन्य पळत असतांना अचानक एक बाण हेमूच्या डोळ्यात लागला. आणि आणखी एका बाणाने निशाण पडले. सैन्याच्या हालचाली नियंत्रित करणारा हेमू बेशुद्ध. आपण जखमी झालो तर सेनापतीपदाचे नेतृत्त्व कुणी करायचे याच्या सूचनाच अस्तित्त्वात नव्हत्या. रणनीतीतली ही फारच मोठी त्रुटी म्हणावी लागेल. कदाचित त्याकाळी असे जर घडले तर स्वकीयांऐकीच एखादा सरदार सेनापतीला ठार करून आपणच सेनापती बनत असेल हीही एक शक्यता नाकारता येत नाही. म्हणून कदाचित अशा सूचना निर्माणच झाल्या नसाव्यात. असो. निशाण पडल्यावर हेमूच्या सैन्यात पळापळ सुरू झाली. ही बातमी अकबराच्या पळ काढीत असलेल्या सैन्यात पसरली आणि ते पुन्हा लढण्यासाठी गोळा झाले. आणि विजयाच्या उंबरठ्यावरून हेमूच्या सैन्याचा पराजय झाला. हेमूच्या हत्तीला बेहरामखानाच्या एका सरदाराने हत्तीवरूनच वेढा घालून वळवून अकबराच्या शिबिरात नेले. तिथे हेमूचा शिरच्छेद केला गेला. या लढाईत भाग घेतलेल्या हेमूचे सर्व पुतणे हेमूने दत्तक घेतलेल्या पुतण्यासह मारले गेले. लढाईत भाग न घेतलेला एकच पुतण्या गावात होता तेवढाच वाचला. त्याचे वंशज आजही आहेत.

दयाळू अकबराने हेमूचा इतका धसका घेतला होता की लढाईनंतर कित्येक महिने भार्गव आडनावाच्या प्रत्येक माणसाला अकबराच्या हेरांनी कापून काढले. भार्गव आडनावाचे लोक मग आडनाव बदलून राहू लागले.

एका अत्यल्पकालीन परंतु तेजस्वी पर्वाचा अशा तर्‍हेने अंत झाला. भार्गव हे शीर्षक असलेले एक पुस्तक आमच्या छोट्याशा गावातल्या वाचनालयातून काही महिन्यापूर्वी वाचनात आले. एक बर्‍यापैकी ऐतिहासिक कादंबरी. कथेतील विश्वासार्हता, कादंबरीचे ऐतिहासिक मूल्य काय यावर जाणकारच प्रकाश टाकू शकतील. पण रसनिर्मितीसाठी भावनिक अभिनिवेशाचा मोह टाळण्यात लेखक यशस्वी ठरला आहे. त्यामुळे कथा इतिहासापासून दूर गेलेली नसावी. ऐतिहासिक कादंबरी वाचतांना खटकणारे मुद्दे इथे मला अजिबात जाणवले नाहीत. ऐतिहासिक क्लिष्टता टाळून सोप्या भाषेत विविध घटनांतून रंजक इतिहासकथन असल्यामुळे मला तरी वाचायला कंटाळा आला नाही.

‘मध्ययुगीन भारतातला नेपोलियन’ सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य असे गौरवोद्गार आपले काही इतिहासकार काढतात. (नेपोलियन श्रेष्ठ की हेमू श्रेष्ठ हा वाद मी येथे काढत नाही) अबुल फजल अकबराचा स्तुतीपाठक होता हे आपण समजू शकतो. आपले देशी इतिहासकार, आपले स्वतःला विद्वान म्हणून समाजात मिरवणारे मराठी शालेय पाठ्यपुस्तकलेखककार देखील अकबराचे गोडवे गातात आणि सम्राट हेमू विक्रमादित्याचा साधा उल्लेख देखील करीत नाहीत याची खंत वाटली म्हणून हा पुस्तकपरिचयाचा लेखनप्रपंच.

पुस्तकाचे शीर्षक: भार्गव.
लेखक: काका विधाते,
प्रकाशक: श्याम दयार्णव कोपर्डेकर,
इंद्रायणी साहित्य,
२७३, शनिवार पेठ, पुणे  ४११ ०३०.
प्रथमावृत्ती: २४ जुलै २००२.
पृष्ठसंख्या:६७८
किंमत रु. ४००/-