पदर

कविवर्य सुरेश भट यांचा आज (14 मार्च) स्मृतिदिन. 
त्यांना विनम्र श्रद्धांजली. 

..............................................
पदर 
..............................................

आणखी थोडेच... थोडे उकर खाली
शोध तार्‍यांचे उद्याच्या नगर खाली !

पालवी वाकून पाही विस्मयाने...
लोळती हे वाळलेले बहर खाली

ह्या समुद्राला मनाच्या थांग नाही...
कोणती आता नवी ही लहर खाली ?

तोंड आकाशात का केलेस काळे?
एकदा माझ्यापुढे ये, उतर खाली!

टेकडीवर भूतकाळाच्या उभा मी...
आठवांचे लुकलुके हे शहर खाली !

'काम नाही जास्त निरखून पाहण्याचे - '
आरसा दरडावतो - 'कर नजर खाली!'

काळ वरचे वर पुढे सरतोच आहे...
मी उभा येथेच, अष्टैप्रहर खाली !

तू किती होतीस कविते खानदानी...
शेवटी पडला तुझाही पदर खाली !

- प्रदीप कुलकर्णी
....................................................
रचनाकाल : 14 मार्च 2014
....................................................