पाहिला माझा कुणी एकांत आहे?

गझल
वृत्त: मंजुघोषा
लगावली: गालगागा/गालगागा/गालगागा
***************************************

पाहिला माझा कुणी एकांत आहे?
आत, अगदी आत माझ्या शांत आहे!

फक्त मी, अन् देव माझा या ठिकाणी.......
अन्य कोणास्तव कुठे हा प्रांत आहे?

सूर्य ज्ञानाचा तळपतो आत माझ्या........
राहिली ना कोणतीही भ्रांत आहे!

माझियासाठी न ही उलघाल माझी........
मी जगासाठीच चिंताक्रांत आहे!

वाटते दुनियेस मी गझला खरडतो.......
गझल नाही, एक तो वेदांत आहे!

थोपवू खळबळ कशी मी या मनाची?
टाळण्याजोगा न हा आकांत आहे!

मी शिलालेखांप्रमाणे शेर लिहितो.......
शेर नाही, एक तो सिद्धांत आहे!

पायपीटीला कुणी माझ्या न साक्षी.......
फक्त दिसते शिखर पादाक्रांत आहे!

कोण देतो प्रेरणा गझला लिहाया?
खुद्द गझलेने दिला दृष्टांत आहे!
 
त्या विधानाची दखल घेऊ कशाला?
वचन ते खोटारडे धादांत आहे!

याच चिंतेने उडाली पार गाळण........
यायची कोणावरी संक्रांत आहे?

या  टुकारांना किती हा चेव चढतो!
पाहती जेव्हा मला.....मी शांत आहे!!

कल्पनाशक्तीमुळे मज आज दिसतो....
जो उद्या होणार रे, कल्पांत आहे!

मायभूमीची स्मृती छळते  मनाला........
जाणवे हृदयास हा परप्रांत आहे!

बिनसले आहे तुझे नक्कीच काही.......
चेहरा का  आज इतका क्लांत आहे?

धर्मशाळेसारखे हे हृदय माझे......
कैक स्मरणांचा इथे विश्रांत आहे!

केवढी घेशील सखये, तू परीक्षा?
हा न टाहो फक्त, हा प्राणांत आहे!

शुक्रताऱ्यासारखा मी अढळ आहे......
गझलक्षेत्रातील मी विक्रांत आहे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१