ओल....

ओल ...

मनी दाटता सय कोणाची
अंधारुन ते येते सारे
उगाच कुठले कारण नसता
आठवणींची वीज थरारे

चूक बरोबर होते का ते
जाऊनिया क्षण युगे लोटली
विचार आवर्ती सापडता
मेघगर्जना कानी घुमली

भळभळताना जखम उरींची
खोल वेदना चिरीत गेली
टपटपताना अश्रू सारे
विचित्रशी ती आर्त काहिली

नकोच ओझे आठवणींचे
नको लढा तो मनीमानसी
वाहून गेले पाणी तरी का
ओल रहाते जराजराशी .....