वसाहत ते महाबलाढ्य राष्ट्र - ४

यापूर्वीचे भाग - , ,

व्यवसायाने पूर्णवेळ सैनिक नसणाऱ्या बंडखोरांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध युद्ध सुरू तर केले होते पण ते जिंकणे फारच अवघड होते कारण त्या काळात ब्रिटिश सैन्य जगात सर्वोच्च स्थानावर होते. तरी पण काही घटकांमुळे ब्रिटिश सैन्याला तोंड देता येईल असे सामर्थ्य निर्माण झाले होते, हिंमत, नेतृत्व, लढताना आजवर न वापरल्या गेलेल्या रणनीती अन नव्याने बनलेली अमेरिकन अस्मिता. 
१७७६ चे न्यूयॉर्क शहर - वीस हजार लोकसंख्या असलेले हे बेट, बऱ्याच कालावधीपासून बंडखोरांची छुप्या पद्धतीने तयारी सुरू होती. जुजबी पूर्वतयारी झाल्यावर न्यूयॉर्क बेटाच्या एका कोपऱ्यात एक लष्करी ठाणे स्थापन केले गेले. या बंडखोरांचा नेता होता जॉर्ज वॉशिंग्टन. त्याच्या नेतृत्वाखालीच बंडखोरांनी ब्रिटिश सैन्याला बॉस्टनमधून माघार घ्यायला लावली होती. एक वर्षाअगोदर वॉशिंग्टनला अमेरिकन बंडखोर सैन्याचा सरसेनापती म्हणून घोषित करण्यात आले होते.   
Commander In Chief
जोसेफ प्लम्ब मार्टीन - हा न्युयॉर्कमधल्या बंडखोर सैन्याच्या तुकडीमध्ये होता. त्याने १५ व्या वर्षीच बंडखोर सैन्यात प्रवेश मिळवला होता. एका शेतकरी कुटुंबातला असला तरी त्याच्यासारख्या हजारो तरुणांप्रमाणेच तो स्वयंस्फूर्तीने बंडखोरांच्या सैन्यात सामील झाला होता.
२९ जून १७७६ - ब्रिटिश सैन्याची ४५ जहाजे न्यूयॉर्क बेटाजवळील स्टॅटन आयलंडवर दाखल झाली. या जहाजांवर त्या काळात जगात सर्वोत्तम समजले जाणारे ब्रिटिश सैन्य होते व जोडीला त्या काळातील अद्ययावत तोफा व दारुगोळा होता. त्या पाठोपाठ त्याच प्रकारची ३५० जहाजे अटलांटिक महासागरातून अमेरिकेच्या दिशेने मार्गक्रमण करत  होती. आपल्या शक्तिप्रदर्शनाद्वारे बंडखोर सैन्याला धडकी भरवून त्यांना शरण येण्यास भाग पाडण्याचा बेत ब्रिटिश सैन्यातील धुरिणांनी बनवला होता. 1775 Map
२ जुलै १७७६, स्थळ फिलाडेल्फिया - कॉंटिनेंटल काँग्रेसमधील १३ वसाहतींमधील ५० प्रतिनिधी एका तातडीच्या बैठकीसाठी जमले होते. यामध्ये बेंजामिन फ्रँकलिन, थॉमस जेफरसन, जॉन ऍडम्स यांच्यासारखी जहालमतवादी माणसे होती. या बैठकीमध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव चर्चिला जात होता तो पारित झाल्यास त्यावर ब्रिटिश सत्तेकडून देहान्त शासन हेच प्रत्युत्तर असणार होते. यावेळी बंडखोर सैन्याच्या बळाबद्दल शंका व्यक्त करणारेही काही सदस्य होतेच. परंतु त्यांचे प्रमाण पाचास एक असे होते. अखेरीस ४ जुलै १७७६ रोजी या प्रतिनिधींनी जो ठराव पारित केला त्याने अमेरिकेचाच नाही तर संपूर्ण विश्वाचाच इतिहास बदलणार होता. तो ठराव होता द डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडंस. अमेरिकन लोकशाही व्यवस्थेचा तो जन्म होता. 
All men
सर्व माणसे समान असल्याचा हक्क अन सुखी होण्यासाठी प्रयत्न करण्याचा हक्क हे त्या काळातील क्रांतिकारी हक्क होते. स्वातंत्र्याच्या या घोषणेमुळे बंडखोर सैन्यामध्ये नवे चैतन्य पसरले. 
 १२ जुलै १७७६ - दोन ब्रिटिश जहाजांनी अचानक न्यूयॉर्क शहरावर तोफांचा मारा सुरू केला. ३२ हजार ब्रिटिश सैनिक मॅनहॅटन बेटावर पोचण्याच्या तयारीत होते. बंडखोरांची संख्या याच्या निम्म्याच्या जवळपास होती. दारुगोळा व शस्त्रास्त्रांच्या क्षमतेच्या बाबतीत ब्रिटिश सैन्य व बंडखोर सैन्य यांची तुलनाच होऊ शकत नव्हती. हा हल्ला न्यूयॉर्क शहराच्या इतिहासात ९/११ घडेपर्यंतचा सर्वात मोठा हल्ला होता.  
१७ सप्टेंबर १७७६ - एक तास भर ब्रिटिश नौकांवरून जवळ जवळ अडीच हजार तोफा कीप्स बे वरून न्यूयॉर्क शहरावर आग ओकत होत्या. बंडखोर सैन्याच्या तुकड्यांची पुरेशी वाताहत झाल्यावर सुमारे ४ हजार ब्रिटिश सैनिक मॅनहटन बेटावर उतरले. त्यांचे युद्धात सहभागी होण्याच्या अनुभवाचे सरासरी प्रमाण हे अमेरिकन बंडखोर सैनिकाचा सहापट होते.     आपल्या सैन्याची होणारी वाताहत पाहून जॉर्ज वॉशिंग्टनने सैन्याला माघारीचे आदेश दिले. नेटिव्जच्या ज्या रस्त्याने ही माघार घेतली गेली तो रस्ता आज ब्रॉडवे म्हणून ओळखला जातो.
२० सप्टेंबर १७७६ - ब्रिटिश सैन्याने न्यूयॉर्क शहरावर ताबा मिळवला. शहरात जागोजागी आगी लावण्यात आल्या. दोन दिवसांत एक चतुर्थांश ठिकाणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. तीन हजारांहून अधिक बंडखोर सैनिक ब्रिटिश सैन्याच्या हाती पडले.  त्यांना न्यूयॉर्क बंदरात नांगर टाकलेल्या ब्रिटिश बोटींच्या तळघरात साखळदंडांनी जखडून ठेवले जात असे. एचएमएस जर्सी (टोपणनाव Hale) ही यापैकी एक बोट होती. या तळघरांमध्ये घाणीचे व रोगराईचे साम्राज्य होते. जिवंत राहण्यास अत्यंत अवघड असे वातावरण असल्याने सरासरी १० पैकी ९ कैद्यांची सुटका मृत्यूनेच होत असे. बरेचदा मृतदेह दहा दिवसांपर्यंत तेथून काढले जात नसत. रॉबर्ट शेफिल्ड या युद्धकैदी पळून जाण्यात यशस्वी झाल्यामुळे युद्धकैद्यांना दिल्या जाणाऱ्या अमानवी वागणुकीची माहिती अमेरिकनांपर्यंत पोचली. 
हे युद्ध संपेपर्यंत १२ हजार अमेरिकन युद्धकैदी ब्रिटिशांच्या कैदेत मृत्युमुखी पडले. ही संख्या प्रत्यक्ष युद्धातील कामी येणाऱ्या सैनिकांपेक्षा तिप्पट होती. न्यूयॉर्कमध्ये झालेला पराभव जॉर्ज वॉशिंग्टन यांचा सेनापती म्हणून झालेला पहिला पराभव होता. बंडखोर सैन्याची सगळी आशा आता किनाऱ्यापासून लांब असलेल्या अंतर्गत भागावर होती जो ब्रिटिश सैन्यास अनोळखी होता. 
न्यूयॉर्कमधील लढाईच्या सहा महिन्यांनंतर उत्तरेकडील कॅनेडियन भूभागाकडून  आठ हजार ब्रिटिश सैनिकांनी हडसन नदीच्या कडेने दक्षिणेकडे कूच केले. या सैन्याबरोबर जवळजवळ दोन हजार असैनिक व्यक्ती होत्या त्यात नोकरचाकर अन सैनिकांच्या पत्नी किंवा मैत्रिणींचा समावेश होता. सोबत रसदीच्या दोनशे घोडागाड्या होत्या. या सर्व भूभागावर वर्चस्व निर्माण करून न्यूयॉर्क शहरामधील ब्रिटिश सैन्यदलाबरोबर वसाहतींना दोन भूभागांमध्ये तोडण्याचा त्यांचा उद्देश होता. त्यांच्या मार्गावर राहत असलेल्या सर्वसामान्य लोकांना त्याच्यांकडून जाच होत होता. 
या सैन्याबरोबर समोरासमोर दोन हात करण्याऐवजी जॉर्ज वॉशिंग्टनने गनिमी कावा वापरण्याची रणनीती वापरणे सुरू केले. या कामगिरीचे नेतृत्व कर्नल डॅनिअल मॉर्गन याने केले. त्याच्या नेतृत्वाखाली ५०० शार्पशुटर्स होते. त्यांच्याजवळ त्या काळाच्या तुलने अद्ययावत बंदुका होत्या ज्यांचे बॅरल ४० इंच लांब असायचे अन तरीही वजनाने फार जड नसायच्या. या बॅरलच्या आतल्या बाजूच्या रचनेमुळे छऱ्यांच्या आकारातील गोळीला स्वतःभोवती चक्राकार गती मिळत असे. यामुळे लांवच्या अंतरावरील लक्ष्य  अचूकपणे टिपण्याची क्षमता वाढत असे. या बंदुकांचा पल्ला २५० यार्ड इतका होता.
या तुकडीची कार्यपद्धती - घनदाट जंगलात ब्रिटिश सैन्याच्या मार्गात मोठाले वृक्ष पाडून अडथळे निर्माण करायचे जेणेकरून त्यांचे मार्गक्रमण धीम्या गतीने होईल अन गोंधळलेल्या अवस्थेत असताना त्यांना टिपणे सोपे जाईल. ब्रिटिश सैन्याच्या दिमतीला काही नेटिव वाटाडे असत. मॉर्गनचे सैनिक सर्वप्रथम त्यांना टिपायचे. त्यानंतर त्यांनी ब्रिटिश सैन्यातील अधिकाऱ्यांना लक्ष्य करणे सुरू केले. हे तत्कालीन युद्धनियमांच्या विरुद्ध होते पण परिणामकारक होते. ही पद्धत अत्यंत परिणामकारक ठरली, दोन हजार ब्रिटिश सैनिक मारले गेले. 
१७ ऑक्टोबर १७७७ - ब्रिटिश सैन्याने शरणागती पत्करली. ही बातमी युरोपमध्ये पोचताच तत्कालीन फ्रेंच सरकारनेही अमेरिकेच्या बाजूने समुद्री युद्धात उतरून ब्रिटिश नौदलाला लक्ष्य करण्याचा निर्णय घेतला. पण आता वॉशिंग्टनच्या सैन्यासमोर नवेच आव्हान उभे ठाकले. ते म्हणजे हिवाळा. बंडखोरांच्या सैन्याची मोठी छावणी पेनसिल्वेनियातील व्हॅली फोर्ज येथे होती.  हाडे गोठवणारी थंडी असूनसुद्धा ४० दिवसांत ९०० झोपड्यांची उभारणी केली गेली. एका झोपडीत डझनभर सैनिक राहू शकत. वॉशिंग्टनच्या सैन्याची संख्या १२ हजारांवर होती अन कॉंटिनेंटल काँग्रेसकडून त्यांना होणारा रसद पुरवठा त्यामानाने तुटपुंजा होता. अशा अवघड प्रसंगात वॉशिंग्टनचे नेतृत्व सुलाखून निघाले.  
Valley Forge
दुर्दैवाने आव्हानात्मक नैसर्गिक परिस्थितीमुळे सैनिक मोठ्या प्रमाणात आजारी पडू लागले. एक पंचमांश सैनिकांकडे बूटसुद्धा नव्हते. अन्नाची रसद अपुरी पडू लागल्यामुळे रोजचा आहारसुद्धा मर्यादित मिळू लागला. युद्धकाळात शिस्तीने लढत असले तरी हे सैन्य विविध प्रकारच्या लोकांनी बनलेले होते ज्यात गुन्हेगार, गुलाम आदींचाही समावेश होता. त्यांच्यात आता भांडणे उफाळून येऊ लागली. अशा सैनिकांना शिस्त लावण्यासाठी वॉशिंग्टनचे एकच आवाहन असायचे. तुम्हाला स्वातंत्र्य हवे असेल तर सैन्याचे नियम पाळावेच लागतील. त्याच्या नेतृत्वाच्या दराऱ्यामुळे बेशिस्त सैनिक शांत होत असत.
यावेळी दुष्काळात तेरावा महिना म्हणजे या शिबिरात देवीची साथ पसरली. तिचे मूळ होते ब्रिटिशांच्या कैदेतून परतलेले काही सैनिक. अनेक पिढ्या युरोपपासून दूर राहिल्यामुळे अमेरिकेतील माणसांची रोगप्रतिकारशक्ती देवीच्या रोगाला सामोरे जाण्यास सक्षम नव्हती. देवीची लागण होणाऱ्या १० पैकी ४ सैनिक दगावत होते. जॉर्ज वॉशिंग्टन लहानपणी देवीच्या रोगातून बरा झालेला असल्याने त्याला त्याची लागण झाली नाही. या पूर्वानुभवाच्या जोरावर या संकटाला तोंड देण्यासाठी त्याने एक जुगार खेळला. देवीची लागण झालेल्या सैनिकांच्या अंगावरील फोडांमधील पू सुदृढ सैनिकांच्या दंडावर सुरीने जखम करून त्यामध्ये सोडणे. जेणेकरून त्यांच्यामध्ये देवीबाबत प्रतिकार शक्ती निर्माण होईल.सुदैवाने वॉशिंग्टनच्या या प्रयोगास यश मिळू लागले. परंतु यातही काही अपवाद होत. प्रयोग करण्यात येणाऱ्या दर पन्नास पैकी एक सैनिक देवीच्या रोगाला बळी पडत असे. तरी देखील काही आठवड्यांत ही साथ बऱ्यापैकी आटोक्यात आली. 
१७७८ - हिवाळा अन देवीची साथ या दोन आव्हानांना वॉशिंग्टनचे सैन्य पुरून उरले होते. यावेळी वॉशिंग्टनने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. Baron von Steuben या माजी प्रशियन सैन्याधिकाऱ्याला लष्करी प्रशिक्षक म्हणून नेमले. बॅरॉनने अनेक महत्त्वपूर्ण बदल घडवले. सैन्याला शस्त्रांची निगा राखायला शिकवले, नवे लष्करी डावपेच शिकवले जसे बंदुकीचा संगीन म्हणून दुहेरी वापर. छावणीच्या रचनेत सुधारणा करून स्वच्छता राखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना केल्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याने या सैन्यासाठी प्रथमच मिलिटरी मॅन्युअल लिहिले. त्याची सर्वात उल्लेखनीय कामगिरी म्हणजे काही निवडक सैनिकांचा वेगळा गट स्थापून त्यांना आजच्या काळातल्या कमांडोंसारखे प्रशिक्षण दिले.
पेनसिल्वेनियात या घडामोडी घडत असतानाच वॉशिंग्टनचे गुप्तहेर न्यूयॉर्कमधील ब्रिटिश छावण्यांमधून गुप्त माहिती मिळवून वॉशिंग्टनपर्यंत पोचवत होते. याच दरम्यान फ्रेंच नौदलाच्या जहाजांचा काफिला रोड आयलंडजवळ पोचल्याची बातमी न्यूयॉर्कमधील ब्रिटिश अधिकाऱ्यांना लागली. फ्रेंचांना आक्रमण करण्याची संधी देण्याऐवजी त्यांच्यावर समुद्रातच अचानक हल्ला करण्याचा बेत ब्रिटिशांनी बनवला. हि महत्त्वाची माहिती गुप्तहेरांद्वारे वॉशिंग्टनपर्यंत पोचली. ब्रिटिश आरमाराला न्यूयॉर्क बंदरातच थांबवण्यासाठी वॉशिंग्टन शेकडोंच्या संख्येने सैनिकांना न्यूयॉर्कच्या दिशेने पाठवले. या हालचाली पाहून ब्रिटिश आरमार न्यूयॉर्क बंदरातच थांबले अन फ्रेंच आरमार त्यांच्या आक्रमणापासून वाचले. वॉशिंग्टनची ही चाल एकूण युद्धाचे समीकरण बदलणारी ठरली. 
१७ ऑक्टोबर १७८१ - ब्रिटिशांच्या अंदाजानुसार जे युद्ध ६ महिन्यांत संपायला हवे होते ते ६ वर्षे झाली तरी सुरूच होते. ब्रिटिश सैन्य मायदेशातून येणाऱ्या मदतीची वाट पाहून थकले होते अन प्रत्यक्ष ब्रिटनमध्ये या युद्धाविरोधात वातावरण निर्माण झाले होते.  वॉशिंग्टनने आपल्या सैन्याच्या मोठ्या गटाला व्हर्जिनियातील यॉर्कटाउन मध्ये ठाण मांडून बसलेल्या ब्रिटिश सैन्यावर चढाई करण्याचे आदेश दिले. युद्धशास्त्रात पारंगत झालेल्या या सैन्याने अपेक्षेप्रमाणेच ब्रिटिशांचा पराभव केला. यावेळी ब्रिटिशांनी अंतिम शरणागती स्वीकारली अन शांततेची बोलणी सुरू केली. ब्रिटिश साम्राज्यापासून युद्धाद्वारे स्वतंत्र होणारा अमेरिका हा जगातील पहिला देश बनला. अर्थात याची मोठी किंमत मोजावी लागली. सुमारे २५ हजार अमेरिकन लोकांना या युद्धात प्राण गमवावे लागले. 
Yorktown

३० एप्रिल १७८९ - जॉर्ज वॉशिंग्टनने अमेरिकेच्या नव्या राज्यघटनेनुसार अमेरिकेचा पहिला राष्ट्राधक्ष म्हणून शपथ घेतली. 

First President
सर्व चित्रे जालावरून साभार.
स्रोत - हिस्टरी वाहिनीवरील 'अमेरिका - द स्टोरी ऑफ अस' मालिका, विकिपीडिया व जालावर उपलब्ध असलेली माहिती.
अवांतर - डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडंस चा मजकूर व ध्वनीफीत येथे उपलब्ध आहे.  
क्रमशः